आसनांची निवड आणि त्यांचा शरीर व मनावरील परिणाम या गोष्टी परस्परांशी निगडित आहेत. साधक आसने दोन प्रकारे करू शकतो – (१) अतिशय प्रयत्नपूर्वक, जोर लावून, खेचून, ताणून, शक्ती खर्च करून आणि (२) कमीतकमी प्रयत्नांनी, शरीर किंचित ताणून, कमीत कमी शक्ती खर्च करून व सहजतेने. दोन्ही प्रकारात साधकाने आसनामध्ये काही काळ स्थिर राहावयाचे असते. दोहोंचे परिणाम भिन्न प्रकारे होतात.

ज्यावेळी आसने खूप शक्ती खर्च करून, जोर लावून व्यायामाप्रमाणे केली जातात तेव्हा अनुकंपी मज्जासंस्था (Sympathetic Nervous system) उत्तेजित होते आणि मानसिक ताण निर्माण होतो. सांध्यांची व स्नायूंची जास्तीची ओढाताण होते. स्नायू एका मर्यादेबाहेर ताणला जात असेल तर प्रतिक्षिप्त क्रियेने तो आकुंचन पावतो. स्नायू तुटू नये, सांध्यांना दुखापत होऊ नये म्हणून ही नैसर्गिक व्यवस्था आहे. साधक कळत नकळत, खूप ओढून, खेचून, ताणून आसने करण्यास प्रवृत्त झाला, तर सक्रिय ताण-प्रतिक्षिप्त क्रियेमुळे स्नायू आकुंचन पावतात. त्यामुळे साधकाचे प्रयत्न व स्नायूंची नैसर्गिक प्रतिकारात्मक आकुंचनाची क्रिया यामध्ये रस्सीखेच निर्माण होते. ताण निर्माण होतो, वेदना होतात, अस्वस्थता, कंप वाढतात. स्नायूंचे काम वाढले की रुधिराभिसरणाचे कार्यही वाढते. प्राणवायूची आवश्यकता वाढल्याने श्वसनगतीही वाढते. थकवा लवकर येतो व शेवटी लवकरच आसन सोडावे लागते.

आसनांचे काही प्रकार

जर आसन शांतपणे, शरीर शिथिल ठेवून, सावकाश, सहजतेने व कमीतकमी प्रयत्नांनी केले तर हृदयाची गती कमी प्रमाणात वाढते. यात स्नायूंचे कार्य कमी होते. संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित केल्यास, मोठ्या मेंदूच्या कार्याचा भार कमी होतो. परानुकंपी मज्जासंस्था (Parasympathetic Nervous system) प्रेरित होते. परिणामत: मानसिक, भावनिक अस्वस्थता, चंचलता व द्वंद्वे कमी होतात. मन शांत होते. यावेळी शरीरात ऋणदाब (Negative pressure) व धन दाब (Positive pressure) आलटून पालटून निर्माण होतात. त्यामुळे वाढीव रक्ताभिसरण त्या त्या भागात कार्य करते. अंत:स्रावी ग्रंथी व इतर ग्रंथींवर याचा परिणाम होतो. त्यांचे कार्य सुधारते. अस्थि संधींवर हलकासा ताण आल्याने व तेथील रक्ताभिसरण वाढल्याने त्यांची लवचिकता वाढते. श्वसनावरही ताण पडत नाही व साधकाची आसनस्थिती जास्त काळ टिकते. या प्रकाराने आसनांचे लाभ अधिक मिळतात.

शरीरसंवर्धनात्मक आसनांमध्ये अंतिम अवस्थेत काही काळ शांतपणे स्थिर राहिल्यावर त्यांच्या विशिष्ट रचनेमुळे त्या त्या सांध्यांवर, स्नायूंवर इष्ट ताण पडतो. या आसनांमध्ये मुख्यत: मेरुदंड (पाठीचा कणा), पोट व छाती यावर परिणाम अधिक होतो. मेरुदंड सशक्त होतो. पोटातील मृदू स्नायूंचा ताण योग्य स्तरावर राखला गेल्याने भावनांचा व मानसिक घडामोडींचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. पचनसंस्थेचे कार्य सुधारते. शीर्षासन, विपरीत करणी यांसारख्या ज्या आसनांमध्ये खाली डोके वर पाय अशी अवस्था असते त्यामध्ये मेंदूला ताज्या रक्ताचा पुरवठा उत्तमरीतीने होतो. रक्तदाबावर नियंत्रण येते. झोप योग्य प्रमाणात लागते. मानसिक थकवा येत नाही. दिवसभर उत्साह वाटतो.

विश्रांतीकारक आसनांमध्ये चित्त निवांत होते. गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध काम करावे लागत नसल्याने हृदयगती, रक्तदाब, श्वसनगती वाढत नाही. अशा ताणविरहित अवस्थेत प्राणधारणा उत्तम तऱ्हेने साधता येते. त्यामुळे मज्जासंस्थेसही विश्रांती मिळते. सभोवतालच्या वातावरणाचाही विसर पडतो. ताणतणाव नाहीसे होतात व मन:शांती मिळते. क्रोध, चिडचिड इत्यादी दूर होतात.

ध्यानात्मक आसनांमध्ये गुडघे व कटिप्रदेश मिळून शरीर त्रिकोणाकृती होते. त्यामुळे ध्यानासाठी लागणारी मनो-शारीरिक स्थिरता, दृढता मिळते. मेरुदंडाचे चारही नैसर्गिक बाक नीट संभाळले जातात.

भगवद्गीतेमध्ये म्हटल्याप्रमाणे, मस्तक, मान व शरीर एका सरळ रेषेत ठेवणे ही स्थिती नीट साधली जाते (“समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिर: |” ६.१३). शक्तीचा कमीत कमी अपव्यय होतो. शांतता, प्रसन्नता व आनंद यांचा सुखद अनुभव येतो.

आसने केल्यास शरीरातील असमतोल, अस्थिरता, कंप, सांध्यांमध्ये होणाऱ्या वेदना, शरीराची थरथर आणि मनाची अस्थिरता, ताणतणाव, अशांतता इत्यादी दूर होतात. थोडक्यात आसनांमुळे आरोग्य सुधारते.

आसनाची पुनरावृत्ती ३-४ वेळा केल्यास हृदयाची गती वाढलेली दिसते. या प्रकारात उष्णता जास्त वाढते. शक्तीचा विनाकारण अपव्यय होतो. फायदा एवढाच की शरीराची लवचिकता वाढते.

रुग्णाने, योगशास्त्राच्या अभ्यासकाने आणि साधकाने आपली गरज व क्षमता ओळखून आसने निवडावीत म्हणजे त्याचा शारीरिक, मानसिक व भावनिक विकास योग्य रीतीने होईल. तसेच उच्च योगसाधनेच्या दृष्टीने वाटचाल निर्विघ्न होईल. व्यक्तिमत्व, दृष्टिकोन व विचारांची ठेवण यात सकारात्मक प्रगती होईल.

पहा : आसन.

समीक्षक : साबीर शेख