पूर्वा फाल्गुनी आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रे : पूर्वा फाल्गुनी आणि उत्तरा फाल्गुनी ही नक्षत्रचक्रातील अनुक्रमे ११ आणि १२ क्रमांकावर असणारी नक्षत्रे आहेत.  सिंह (Leo Constellation) राशीतील झोस्मा (Zosma; Delta Lionis) आणि केर्तान किंवा कॉक्सा (Chertan; Theta Leonis) हे दोन तारे मिळून पूर्वा फाल्गुनी हे नक्षत्र होते. केर्तान हा त्यातील योग तारा आहे.  झोस्मा हा एक पांढरा – निळ्या रंगाचा तारा असून त्याची दृश्यप्रत २.५८ आहे. हा तारा पृथ्वीपासून सुमारे ५८.४ प्रकाशवर्षे दूर आहे. तर केर्तानची दृश्यप्रत ३.३२४ आहे. केर्तान तारा पृथ्वीपासून सुमारे १६५ प्रकाशवर्षे दूर आहे.

सिंह राशीतील सिंहाच्या कल्पित आकाराच्या शेपटीच्या टोकाला असलेला डेनेबोला (Denebola; Beta Leonis) नावाचा तारा हे उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे. एकच तारा असलेल्या या नक्षत्राचा डेनेबोला हाच योग तारा आहे. २.२३ दृश्यप्रतीचा हा तारा पांढऱ्या-निळ्या रंगाचा आहे. तो आपल्यापासून सुमारे ३६ प्रकाशवर्षे दूर आहे. डेनेबोला या शब्दाचा अर्थच सिंहाची शेपूट असा आहे. या नक्षत्रांच्या दरम्यान जेव्हा पौर्णिमेचा चंद्र असतो, त्या महिन्याला आपण  ‘फाल्गुन’ असे ओळखतो.

 समीक्षक : आनंद घैसास