मघा नक्षत्र : नक्षत्र चक्रातील मघा हे १० वे नक्षत्र. मघा, पूर्वा फाल्गुनी आणि उत्तरा फाल्गुनी या तीन नक्षत्रांचा सिंह राशीत समावेश होतो. मघा नक्षत्रात एकूण ६ तारे आहेत. कोणी ५ तारे आहेत असे मानतात. त्यापैकी चार मुख्य तारे मघा (Regulus; Alpha Leonis), अल्जीबा (Algieba; Gamma Leonis), अधफेरा (Adhafera; Zeta Leonis) आणि इटा लिओनिस (Eta Leonis) यांचा एक समांतरभुज चौकोन होतो. या समांतरभुज चौकोनाच्या उत्तरेस चौथ्या प्रतीचे दोन तारे आहेत अल्जेनुबी किंवा रास इलेज्ड ऑस्ट्रॅलिस (Algenubi or Ras Elased Australis; Epsilon Leonis)आणि रसलस (Rasalas; Mu Leonis). हे ६ तारे मिळून एखाद्या कोयत्यासारखी आकृती तयार होते. त्यात गॅमा, झीटा, म्यु आणि इप्सिलॉन मिळून कोयत्याचे पाते तर इटा आणि अल्फा म्हणजे कोयत्याची मूठ समजतात. यातला सगळ्यात तेजस्वी तारा कोयत्याच्या मुठीत असून ‘मघा’ असे त्याचे भारतीय नाव आहे. मघा ताऱ्याची दृश्यप्रत १ असून तोच मघा नक्षत्राचा योग तारा आहे. मघा नक्षत्रातील बाकीचे तारे सुमारे ३ दृश्यप्रतीचे आहेत. मघा किंवा रेग्युलस हा तारा द्वैती तारा आहे. त्यांना अजूनही एक जोडीदार आहे. त्यामुळे त्याला त्रैती तारा असेही म्हणतात. मघा तारा बरोबर आयनिकवृत्तावर आहे. त्याच्या जोडीतील मुख्य तारा पांढऱ्या रंगाचा असून त्याचा जोडीदार निळ्या रंगाचा आहे. रेग्युलस आपल्यापासून सुमारे ७७.५ प्रकाशवर्षे दूर आहे. या ताऱ्याबद्दल असेही कळले आहे, की हा तारा आपल्यापासून दर सेकंदाला २४ कि. मी. या वेगाने दूर जातो आहे. अल्जीबा (Gamma Leonis) हा तारा सुद्धा द्वैती तारा आहे. त्यातील मुख्य तारा २.६ दृश्यप्रतीचा असून सोनेरी पिवळ्या रंगाचा राक्षसी तारा असून त्याचा जोडीदारही त्याच्या सारखाच फक्त ३.६ दृश्यप्रतीचा तारा आहे. हा तारा आपल्यापासून १२६ प्रकाशवर्षे दूर आहे. अल्जेनुबी हा तारा पिवळा राक्षसी तारा असून तिसऱ्या प्रतीचा तारा आहे. तो २५१ प्रकाशवर्षे दूर आहे. अधफेरा तारा पांढरा राक्षसी तारा असून ३.६५ दृश्यप्रतीचा आहे. तो आपल्यापासून २६० प्रकाशवर्षे दूर आहे.
मघा म्हणजे Regulus या नावाचा एक रोमन लष्कर प्रमुख होता. त्याचे नाव या ताऱ्याला दिलेले आहे. त्याच्यासंबंधी रोमन पुराणात एक कथा येते. तसेच पूर्ण सिंह राशीबद्दल आणि त्यासोबत नाईल नदीबद्दल इजिप्शियन वाङ्मयात एक कथा येते. ग्रीक वाङ्मयात हर्क्युलिसची आव्हाने आणि सिंहाच्या सोबत त्याच्या युद्धाची सिंह राशीबद्दल एक मिथककथा आहे.
मघा या राशीमध्ये जेव्हा पौर्णिमेचा चंद्र असतो, त्या भारतीय महिन्याला ‘माघ’ असे म्हणतात. माघ महिना हा थंडीचा महिना म्हणून ओळखला जातो.
समीक्षक : आनंद घैसास.