मेष : आयनिकवृत्ताच्या लगत, उत्तरेस असणारा हा एक तारकासमूह आहे. मेष ही राशीचक्रातील पहिली राशी मानली जाते. आकाशात मेष शोधताना त्यातील ठळक तारकांच्या गटाची घोड्याच्या डोक्यासदृश अथवा एखाद्या हॉकी स्टिक सारखी ३ ताऱ्यांनी बनलेली रेखाकृती दिसते.  यालाच अश्विनी नक्षत्र असेही म्हणतात. भरणी नक्षत्र त्याच्या सुमारे १० अंश आग्नेयेस (उत्तर-पूर्वेस) आहे. यातील ३ अंधुक ताऱ्यांचा एक छोटेखानी त्रिकोण नुसत्या डोळ्यांनी पाहता येतो. या ताऱ्यांच्या मांडणीखाली दक्षिणेकडे आयनिकवृत्ताखालीही मेषेचा थोडा भाग आहे. मेषेचे आकाशातील कोनीय क्षेत्रफळ ४४१.३९ चौरस अंश आहे. या व्याप्तीनुसार याचा एकूण तारकासमूहांमध्ये ३९ वा क्रमांक लागतो.

ऑक्टोबर-नोव्हेंबर काळात मेष राशीचे रात्रभर निरीक्षण करता येते.  कारण ३० ऑक्टोबरला मध्यरात्री मेष राशी मध्यमंडलावर (Midnight Culmination) येते. अर्थात रात्रीच्या आकाशात तिचे सर्वाधिक वेळ दर्शन होऊ शकते. मेष राशी पृथ्‍वीवरून पाहताना दक्षिण गोलार्धातील -५९ अंश अक्षांशाच्या उत्तरेकडून नेहमी पाहू शकतो. मात्र दक्षिण गालार्धातील -८० अंश अक्षांशाच्या दक्षिणेकडून (दक्षिण ध्रुवाजवळील प्रदेशातून) मेषेचे दर्शन अशक्य आहे, कारण तिथे ती कायम क्षितिजाखाली राहते.

भारतीय नाव मेष आणि पाश्चिमात्य नाव एरीस या दोघांचा अर्थ मेंढा असाच होतो. नावांच्या अर्थातील असे साधर्म्य सर्व राशींसाठी लागू होते, कारण त्यांची मूळ उत्पत्ती सामायिक आहे. राशी संकल्पना भारतीय नाही. ती मूळ बॅबिलॉनियन संस्कृतीच्या संकल्पनेतून आलेली आहे.

इतिहास व पौराणिक संदर्भ : इ.स.पूर्व १८०० च्या सुमारास वर्षाच्या ज्या कालावधीत सूर्याचे आकाशातील स्थान मेष राशीतील ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर होते, त्यावेळी वसंत ऋतूचे आगमन आणि उत्तरायण प्रारंभ होत असे. हा काळ अनेक संस्कृतींमध्ये नवीन वर्षाची सुरुवात मानला जायचा. त्याला वसंत संपात बिंदू अथवा मेषेचा प्रारंभ बिंदू (First Point of Aries) असे म्हटले गेले, त्यामुळे राशी चक्रात मेष ही पहिली राशी झाली. कालांतराने (इ.स.पूर्व २७ च्या सुमारास) वसंतसंपात बिंदू पृथ्वीच्या परांचन गतीमुळे मीन राशीत सरकला. तरीही कित्येक शतके रूढ झालेले मेषेचे पहिले स्थान आजही तसेच प्रचलित राहिले आहे. पुरातन शिलालेखातील पुराव्यांच्या स्वरूपात आधुनिक मेष राशीचा चित्ररूपी उल्लेख इ.स. पूर्व १३५० ते १००० चा मिळालेला आहे.

ग्रीक पौराणिक कथांनुसार देवांचा राजा झ्यूसकडे एरीस हा पाळीव जादुई मेंढा होता. ज्याची लोकर सोनेरी होती आणि तो आकाशात उड्डाण करू शकत असे. थेस्सेलीच्या राणीकडून तिची सावत्र मुले फ्रिक्सस् आणि हेले यांचा प्रचंड छळ होत होता. त्यांची सुटका करण्यासाठी या मेंढ्याला पृथ्वीतलावर पाठवले गेले. या मेंढ्याच्या पाठीवर बसून दोन्ही मुलांनी आकाशमार्गे प्रयाण केले. प्रवासात दुर्दैवाने हेलेचा तोल गेला व ती समुद्रात पडली. हेलेच्या स्मरणार्थ त्या भागाला ‘Hellespont’ असे नाव दिले गेले. मात्र मेंढ्याच्या पाठीवर बसून फ्रिक्सस् पलीकडे सुखरूप पोचला. म्हणून झ्यूसने सन्मान म्हणून एरिस मेंढ्याला आकाशात  स्थान दिले.

वेदकालीन वाङ्मयात मात्र अशा मेंढ्याची कथा नाही, तर अश्विनीची कथा आहे. अश्विनी नक्षत्रात मेषेच्या तीन ताऱ्यांना ‘अश्वमुख’ मानले जाते.

प्राचीन इजिप्शियन वाङ्मयात ‘अमुन-रा’ या देवाशी एरिसचा संबंध जोडला गेलेला आहे.

प्राचीन चिनी खगोल संकल्पनेत गुरांचा बळी देण्याच्या विविध वस्तूंच्या स्वरूपात मेषेतील तारकागट दाखवले जातात.

मेषेतील विशेष तारे:

१) हमाल (अल्फा एरिटीस्): हमाल (Hamal) या नावाचा अर्थ मेंढ्याचे डोके असा होतो. हा मेषेतील सर्वात तेजस्वी तारा आहे. दृश्य प्रत +२.२३ आहे. अंतर ६५.८ प्रकाशवर्षे.

२) शेराटन (बीटा एरिटीस्): अल शेराटन या मूळ अरबी नावाचा अर्थ ‘दोन खुणा’ असा होतो. ज्या हजारो वर्षांपूर्वी वसंत संपात बिंदूचे स्थान दर्शविण्यास वापरात होत्या. यातील एक खूण म्हणजे शेराटन आणि शेजारचा गॅमा तारा ही दुसरी खूण. वैदिक पुराणातील अश्विन् किंवा अश्विनी कुमार म्हणून देखील ही जोडी कल्पिली जाते. दृश्य प्रत +२.६५.

३) मेसार्थिम (गॅमा एरिटीस्): हा द्वैती तारा असून याचा शोध दूरदर्शींच्या प्राथमिक काळात योगायोगाने लागला. रॉबर्ट हुकला इ.स. १६६४ मध्ये एका धूमकेतूच्या निरीक्षणादरम्यान दूरदर्शीतून अचानक २ तारे अगदी जवळजवळ दिसले, जे नुसत्या डोळ्यांनी एकच वाटतात. दोन्ही ताऱ्यांची प्रत थोड्याफार फरकाने एकसारखीच आहे. (+४.५२ आणि +४.५८). यांच्यातील कोनीय अंतर (angular separation) ७ कोनीय सेकंद आहे.

४) भरणी (४१ एरिटीस्): भरणी नक्षत्राचा योगतारा. ज्याचे IAU ने प्रमाणित केलेले नावही आता ‘भरणी’ असेच आहे. दृश्य प्रत ३.६३ आणि अंतर सुमारे १६६ प्रकाशवर्षे.

५) ५३ एरिटीस्:  प्रत ६.१ आणि अंतर सुमारे ७०० प्रकाशवर्षे. याचे पळपुटा तारा (Runaway star) असे वर्गीकरण करण्यात येते. कारण याचा आकाशातील स्थानबदलाचा प्रत्यक्ष वेग ४० किमी/सेकंद आहे. ५३ एरिटीस्, AE Aurigae आणि Mu Columbae हे तिन्ही तारे ओरायन ओ-बी या एकाच तारे निर्मिती क्षेत्राच्या उपगटातून बाहेर फेकले गेले आहेत. ५३ एरिटीसचे असे विलग होण्याचे कारण कदाचित ‘डायनॅमिक इजेक्शन’ असू शकते. ज्यात अनेक ताऱ्यांच्या एकमेकांवरील गुरुत्वीय बलाचा परिणाम काही ताऱ्यांना त्या गटातून निसटून जाण्याएवढी गती देतो.

६) SX एरिटीस् (५६ एरिटीस्): हा एक रूपविकारी तारा आहे. याची सरासरी प्रत +५.७६ आहे पण यात ०.७६ दिवस इतक्या कमी काळात ०.१ प्रतीचा तेजस्वितेतील बदल दिसून येतो. अतिशीघ्र परिवलनामुळे त्याच्या चुंबकीय क्षेत्रात बदल झाल्याने असे होते.

नक्षत्र चक्रातील पहिले नक्षत्र अश्विनी नक्षत्र आणि दुसरे भरणी नक्षत्र ही दोन नक्षत्रे मेषेत येतात. भरणीला उत्तर मक्षिका (Musca Borealis-The Northern Fly) असेही  इ.स. १६१३ साली एक वेगळा तारकासमूह म्हणून कल्पिले गेले होते. पण काळाच्या ओघात ते टिकले नाही.विशेष अवकाशस्थ वस्तू NGC ७७२ – एक सर्पिल दीर्घिका (Spiral Galaxy) जिचा आकार शेजारच्या उपदीर्घिकेमुळे विस्कटला आहे. दृश्य प्रत +१०.३ आणि व्याप्ती ७ x ४ कोनीय मिनिटे.

NGC ११५६- ही एक अशी खुजी दीर्घिका (Dwarf Galaxy) आहे जिच्यातील काही वायू दीर्घिकेच्या इतर वस्तुमानाच्या विरुद्ध दिशेने तिच्या केंद्राभोवती परिभ्रमण करतात. दृश्य प्रत +११.७ आणि व्याप्ती २.६ x १.७ कोनीय मिनिटे.

संदर्भ :

  • तारांगण – प्रदीप नायक, खगोल मंडळ, मुंबई.
  • Annals of the deep sky – Kanipe, Webb
  • Night Sky Observer ‘s Guide ‍- George Robert Kepple and Glen Sanner
  • Digitized Sky Survey

समीक्षक : आनंद घैसास.