मूळ नक्षत्र मूळ नक्षत्र हे नक्षत्रचक्रातील १९ वे नक्षत्र आहे. वृश्चिक राशीतील वृश्चिकाच्या (विंचवाच्या) शेपटातील नांगी म्हणजे मूळ नक्षत्र मानतात. या शेपटातील एकंदर ९ तारे मूळ नक्षत्राचे समजले जातात. मूळ नक्षत्राचा योग तारा हा वृश्चिक तारकासमूहातला शौला (Shaula; Lambda Scorpii) हा तारा समजतात. या ताऱ्याला चिकटून लेसाथ (Lesath; Upsilon Scorpii) हा तारा आहे. या दोन ताऱ्यांच्या एकमेकांच्याजवळ असण्यामुळे पाश्चात्य लोकांमध्ये त्यांना ‘मांजरीचे डोळे’ (Cat’s Eye) असे संबोधतात. भारतीय समजुतीप्रमाणे हे दोन तारे म्हणजेच मूळ नक्षत्र होय. तर काहींच्या मते वृश्चिकाची पूर्ण कमानदार नांगी (शेपूट) म्हणजे मूळ नक्षत्र मानले जाते.

शौला हा तारा वृश्चिकातील दुसऱ्या क्रमांकाचा तेजस्वी तारा आहे. त्याची दृष्यप्रत १.६ आहे. वर्णपटीय वर्गीकरणात हा तारा B21V+DA7.9 या गटात मोडतो. याचे आपल्यापासूनचे अंतर अंदाजे ५७० प्रकाशवर्षे आहे. लेसाथ हा तारा २.७ दृश्यप्रतीचा असून, वर्णपटीय वर्गीकरणात B2 IV या गटात मोडतो. हा ताराही आपल्यापासून सुमारे ५८० प्रकाशवर्षे अंतरावर आहे.

वृश्चिकातील मूळ नक्षत्राचा हा भाग बरोबर आकाशगंगेच्या पट्ट्यातच येतो. त्यामुळे आकाशगंगेचे मूळ म्हणजे हेच असावे अशी समजूत होती. प्रत्यक्षात आपल्या आकाशगंगेचे केंद्रस्थानही मूळ नक्षत्राच्या थोडेसे उत्तरेस धनु राशीत आहे. आकाशातील वृश्चिक राशीचे दृष्य मात्र फार सुंदर दिसते. वृश्चिकाच्या शेपटाशीच मूळ नक्षत्रात आकाशगंगेचा पट्टा येत असल्याने विविध तेजोमेघ आणि खुले तारकागुच्छही या नक्षत्राच्या आसपास दिसतात.

समीक्षक : आनंद घैसास