मॉल्ट्के, हेल्म्यूट योहानस लूटव्हिख फोन (धाकटा) : (२५ मे १८४८–१८ जून १९१६). प्रसिद्ध जर्मन सेनाधिकारी व जर्मन जनरल स्टाफ प्रमुख. मॉल्ट्केचा जन्म उत्तर जर्मनीतील मेक्लनबुर्कजवळील जर्सडॉर्फ येथे एका जमीनदार घराण्यात झाला. मॉल्ट्के हा ॲडॉल्फ फोन मॉल्ट्के आणि डॉरिस ऑगस्टाइन फोन फ्रोवँ यांचे दुसरे अपत्य, तसेच जर्मनीच्या सर्वोच्च लष्करीपदावर असणारे हेल्म्यूट कार्ल बर्नार्ड फोन मॉल्ट्के (थोरला) (२६ ऑक्टोबर १८००–२४ एप्रिल १८९१) यांचा पुतण्या. त्यामुळे त्याच्यावर लष्करी शिष्टाचार, शिस्त, धाडसी वृत्ती यांचे संस्कार लहानपणापासूनच होते. हँबर्गजवळील ॲल्तॉना येथे त्याचे शालेय शिक्षण झाले. आपल्या चुलत्यांच्या प्रभावामुळे त्याने वयाच्या २२व्या वर्षी लष्करी प्रशिक्षण घेण्याचे ठरविले.

मॉल्ट्के हा जीवनात स्वच्छंद जगू इच्छिणारा होता. तरुणपणापासून ते जीवनाच्या अखेरपर्यंत त्याने साहित्य, संगीत, इतिहास, कला, निसर्गसहवास यांचा व्यासंग जोपासला होता. पाश्चात्त्य धाटणीचे सोलो हे वाद्य तो कौशल्यपूर्वक वाजवीत असे. मॉल्ट्केच्या जुन्या घरामध्ये संगीताच्या मैफली भरत असत. त्याची संगीतकार, साहित्यिक यांच्यात सातत्याने ऊठबस असे. जर्मन संगीतकार आणि व्हायोलिनवादक योझेफ योहाकिम (१८३१–१९०७) याच्याशी त्याची मैत्री होती.

मॉल्ट्के १८६९ मध्ये लष्करात दाखल झाला. सुरुवातीला त्याला आपल्या चुलत्याप्रमाणे लष्करी तेज दाखविता आले नाही. १८७५–७८ मध्ये त्याने युद्ध अकादमीमध्ये सहभाग घेतला. जर्मन सम्राट कैसर विल्यम दुसरा याचा मॉल्ट्केवर प्रभाव होता व विल्यमशी त्याचे चांगले संबंध होते. चुलते हेल्म्यूट कार्ल बर्नार्ड फोन मॉल्ट्के (थोरला) यांच्या मृत्यूनंतर जर्मन सम्राट विल्यमचा तो साहाय्यक अधिकारी बनला. पुढे त्याने आपल्या कर्तृत्वावर लष्करातील कर्नल (१८९५), गार्ड इन्फंट्री दलाचा प्रमुख (१८९८), ब्रिगेडिअर जनरल (१८९९), मेजर जनरल (१९००) अशी पदे मिळविली. १९०६ मध्ये तो जर्मन लष्कराचा सर्वोच्च अधिकारी, चीफ ऑफ द इम्पीरिअल जर्मन जनरल स्टाफ, या पदावर विराजमान झाला.

श्लीफेन योजना : मॉल्ट्केपूर्वी जनरल आल्फ्रेड फोन श्लीफेन (१८३३–१९१३) हा जर्मन जनरल स्टाफ प्रमुख होता. श्लीफेनने युद्धपूर्व कालातील जर्मनीला (१८९१–१९०६) फ्रान्स व रशिया यांच्याविरुद्ध दोन युद्ध आघाड्यांवर एकाचवेळी लढाव्या लागणाऱ्या युद्धाची योजना आखली होती. हीच श्लीफेन योजना (१९०६) होय. या योजनेनुसार रशियाच्या आघाडीवर सुरुवातीला बचावात्मक डावपेच वापरून, फ्रेंचांचा पराभव झाल्याबरोबर त्या आघाडीवरील जर्मन सेना पूर्व आघाडीवर त्वरेने पोहोचवून रशियाचा धुव्वा उडवायचा, ही श्लीफेनची द्विआघाडी युद्धयोजना होती;

तथापि श्लीफेननंतर सेनाप्रमुख झालेल्या मॉल्ट्केने पहिल्या महायुद्धामध्ये फ्रान्स व रशियाला चोख लष्करी उत्तर देण्यासाठी या योजनेत पुढील फेरफार केले : १. हॉलंडची तटस्थता भंग न करता, बेल्जियममधून जर्मनीच्या दोन सेनांनी फ्रेंच आघाडीच्या डाव्या बगलेवर हल्ला करणे, २. ॲल्सेस-लॉरेन प्रदेशात मर्यादित माघार घेणे आणि ३. पूर्व आघाडीवर माघार न घेता, पूर्व प्रशियाच्या पूर्व सीमेवरच रशियाच्या चढाईला विरोध करणे. या योजनेत केलेले फेरफार हीच मॉल्ट्केच्या लष्करी कारकिर्दीमधील मोठी घोडचूक ठरली. या फेरफाराचे परिणाम पुढीलप्रमाणे झाले : १. बेल्जियमच्या ल्येझच्या दुर्गसमूहापुढे जर्मनांची आगेकूच मंदावली व तिथे दोन जर्मन सेना गुंतून पडल्या, २. ॲल्सेस-लॉरेन येथे सु. ५ लक्ष जर्मन सेना गुंतून पडली आणि ३. पूर्व प्रशियात दोन लक्ष आणि इतरत्र दोन लक्ष जर्मन सैन्य संरक्षणात्मक युद्धात गुंतून पडले. हेच जर्मनीच्या पराभवाचे मूळ कारण ठरले. ४. रशियाच्या सैन्याची आगेकूच थांबविण्यासाठी मॉल्ट्केने पश्चिम आघाडीवरून बऱ्याच तुकड्या पूर्व आघाडीवर पाठविल्या. त्यामुळे पश्चिम आघाडीवर सैन्यबळ कमकुवत झाले.

श्लीफेन योजनेनुसार एकाचवेळी वादग्रस्त प्रदेश ॲल्सेस-लॉरेन घेऊन पुढे सरकत एका तुकडीने पॅरिस जिंकून घ्यायचे होते. परंतु मॉल्ट्केच्या निर्णयानुसार जर्मन लष्कराच्या डाव्या तुकडीने फ्रान्सविरुद्ध बचावात्मक पवित्रा घेतला आणि डाव्या व उजव्या बाजूचा नियोजित आराखडा फसला. डाव्या बगलेतील सैन्याला चढाई करायला सांगणे उचित होते. उजव्या बगलेतील सैन्याला पूर्ण चढाई करून फ्रेंचांची डावी बगल मारून काढायला पाहिजे होती. परंतु मॉल्ट्केचा हा डाव फसला. फ्रेंच आणि ब्रिटिश सैन्याने जर्मनीच्या उजव्या बगलेतील सैन्याचा पराभव केला; कारण या सैन्याचा मॉल्ट्केशी संपर्क तुटला. तसेच हे सैन्य फ्रान्सच्या खंदकीय बचावात्मक फळीत अडकले आणि त्यांचा झपाट्याने पुढे जायचा प्रयत्न फसला. त्यामुळे पुढे चार वर्षे सातत्यपूर्ण खंदक युद्ध (Trench Warfare) सुरू राहिले. अशा प्रकारे श्लीफेन योजनेची पुनरावृत्ती अपयशी ठरली.

मॉर्न मोहीम आणि मॉल्ट्केची पदच्युती : मॉर्न ही फ्रान्समधील एक नदी. पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाल्यानंतर ६ सप्टेंबर १९१४ रोजी पॅरिसपासून सु. ४८ किमी. अंतरावर असलेल्या या ठिकाणी फ्रेंच जनरल मिशेल झोझेफ मोनुरी (१८४७–१९२३) याने जर्मन सैन्याच्या उजव्या बगलेच्या तुकडीवर मारा केला आणि ब्रिटिश सैन्यानेसुद्धा जर्मन सैन्यांची कोंडी केली. अखेर या पहिल्या मॉर्न मोहिमेमध्ये युद्धाचा निकाल फ्रेंच मित्रपक्षांच्या बाजूने लागल्याने जर्मन सम्राट कैसर विल्यमने मॉल्ट्केला पदच्युत केले आणि त्याच्या जागी एरिख फोन फाल्कनहाइन (१८६१–१९२२) याची जर्मन जनरल स्टाफ प्रमुख म्हणून नेमणूक केली (१४ सप्टेंबर १९१४). मॉल्ट्केला त्याच्या कामगिरीबद्दल पोअर ला मेरिट, ऑर्डर ऑफ द रेड ईगल, नाईट कमांडर ऑफ द रॉयल व्हिक्टोरियन ऑर्डर आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.  प्रत्यक्ष लढाईच्या डावपेचात मॉल्ट्के कमजोरच ठरला

बर्लिन येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ :

  • Keegan, John; Wheateroft, Andrew, Whoʼs Who in Military History, New York, 2003.
  • Meyer, Thomas H. Ed. Light For The New Millennium, East Sussex (U.K), 1997.
  •  Mombauer, Annika, Helmuth Von Moltke and the Origins of the First World War, Cambridge, 2001.

समीक्षक – अरुण भोसले

प्रतिक्रिया व्यक्त करा