हिमनदीने किंवा हिमानी क्रियेने साचलेल्या डबरीद्वारे निर्माण झालेल्या टेकडीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण भूरूपाला ड्रमलीन म्हणतात. याचा आकार चहाच्या उपड्या चमचासारखा म्हणजे लंबगोलाकार व एक बाजूला निमुळता झालेला असा असतो. हिमनदीने वाहून आणलेल्या रेतीयुक्त गाळाने ड्रमलिन तयार होते. ड्रमलिनाचा मोठा आस हिमनदी ज्या दिशेत वाहते, त्या दिशेत असतो. ड्रमलिनाच्या सुरुवातीच्या बाजूचा उतार काहीसा तीव्र असतो व दुसर्‍या बाजूला तो मंद असतो. सुरुवातीस रुंद असलेले ड्रमलिन पुढील बाजूस सावकाशपणे निमुळते होत गेलेले दिसते. ड्रमलिने सामान्यपणे अंत्य-हिमोढाच्या पाठीमागील बाजूस आढळतात. पर्वतीय भागातील हिमनदी मैदानी भागात उतरून पसरत जाते. त्या ठिकाणी त्यातील हिम साचण्याची जाडी कमी होते आणि हिमनदी वाहण्याची क्षमता वा शक्ती कमी होते. हिमनदीच्या तळालगत असलेला गाळ व जमीन यांत घर्षण होऊन गाळ साचण्यास सुरुवात होते. साचलेले द्रव्य किंवा खळग्यासारखा लहानसा अडथळा अथवा डबरीचे प्रमाण जास्त असलेले हिम यांच्यामुळे ड्रमलिनावर गाळाची गिलाव्यासारखी पुटे एकावर एक अशी साचत जातात. अशा तर्‍हेने ड्रमलिन निर्माण होत जाते. नंतर हिमानी क्रियेद्वारे त्याला आकार प्राप्त होत जातो. लहान ड्रमलिन लहानशा ढिगाएवढे असते. सर्वांत मोठ्या ड्रमलिनांची लांबी २ किमी. वा त्याहून अधिक असू शकते. त्यांची उंची १५ ते ३० मी. किंवा १०० मी. पर्यंत आणि रुंदी ४०० ते ६०० मी. असू शकते. काही ठिकाणी ड्रमलिनांच्या रांगा असतात व त्या एकमेकींना समांतर असतात. सामान्यत: यांचे हजारोंचे समूह आढळतात. पुष्कळदा ते पट्ट्यांच्या स्वरूपात मांडल्यासारखे दिसतात.

अशा प्रकारे ड्रमलिन हा हिमानी क्रियेचा उत्तम पुरावा असून त्याच्यावरून हिमनदीच्या प्रवाहाची दिशाही कळते. तसेच हिमनदीची डबर सपाट प्रदेशांत पुष्कळदा ड्रमलिन व एस्कर यांच्या रूपात साचते. बहुतेक ड्रमलिने मृत्तिकामय असून ती धोंडेमातीची म्हणजे हिमनदीखाली साचलेली मृत्तिका, वाळू, रेती, दगडगोटे यांच्या वैचित्र्यपूर्ण मिश्रणाची बनलेली असतात; तथापि काही ड्रमलिने पृष्ठभागी असलेल्या धोंडेमातीखालील खोल खडकांच्या थरांची (खडकाळ ड्रमलिने) बनलेली असतात आणि इतर जवळजवळ घन खडकांची (रोश मूतॉने) असतात. उष्ण, शुष्क प्रदेशांत ड्रमलिने पुष्कळदा गवताने आच्छादिलेली असतात; तर उच्चतर पर्जन्यवृष्टीच्या प्रदेशांत त्यांच्यावर दाट वने व कुरणे असतात. आर्द्र जलवायुमानाच्या (दीर्घकालीन सरासरी हवामानाच्या) प्रदेशांत ड्रमलिनांवर शेतीही करता येते. खडकाचा गाभा व त्यावर साचलेला द्रव्याचा पातळ थर असे ड्रमलिन खरे नसल्याने त्याला भ्रामक ड्रमलिन म्हणतात.

ड्रमलिन हा शब्द गेलिक भाषेतील ड्रइम (druim) या शब्दावरून आला असून त्याचा अर्थ गोलसर टेकडी वा टेकाड असा आहे. तो प्रथम इ. स. १८३३ मध्ये वापरलेला दिसतो.

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील मध्य विस्कॉन्सिन, मध्य न्यूयॉर्क; वायव्य कॅनडा, नैर्ऋत्य नोव्हास्कोशिया, उत्तर आयर्लंड, स्कॉटलंडची सखल जमीन, उत्तर इंग्लंड येथे शेकड्यांनी ड्रमलिने असून त्यांच्यामुळे पुष्कळदा तथाकथित ‘बास्केट ऑफ एग्ज’ (अंड्यांची टोपली वा दुरडी) भूमिस्वरूप निर्माण होते. याशिवाय दक्षिण जर्मनी, स्वित्झर्लंड इत्यादी यूरोपीय देशांत, तसेच उत्तर अमेरिकेतील पंचमहासरोवरांच्या आसपासच्या भागांतही ड्रमलिने आढळतात. भारतात काश्मीर, राजस्थान व प. बंगालमध्ये ड्रमलिने आढळली आहेत.

समीक्षक : वसंत चौधरी