गंगावणे, परशुराम विश्राम : (१ जून १९५६). महाराष्ट्रातील कोकणातील चित्रकथी या लोककला प्रकाराचे सादरकर्ते. पद्मश्री पुरस्काराचे मानकरी. परशुराम गंगावणे स्वत: अशिक्षित असले तरी चित्रकथी या लोककला प्रकारातील त्यांचा अभ्यास सखोल आहे. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील कोकण प्रांतातील कुडाळ या गावी झाला. ते मूळचे पिंगुळीतील गुढीपूरचे. तेथे कलांगण नावाची त्यांची संस्था असून या संस्थेद्वारे ते पर्यटकांसाठी चित्रकथी आणि बोलक्या बाहुल्यांचे खेळ करतात. चित्रकथीचा वारसा त्यांच्या घरी पिढ्यानपिढ्यांचा आहे. त्यांचे दोन चिरंजीव एकनाथ, चेतन आणि कन्या गीता. त्यांचे चिरंजीव त्यांच्या या कला सादरीकरणात मदत करतात.

चित्रकथी परंपरा ही साधारणत: साडेतीनशे वर्षांपूर्वीची असून ठाकर समाजामध्येच ही परंपरा सुरू आहे. ठाकर समाजात ‘क’ ठाकर आणि ‘म’ ठाकर अशा दोन उपजाती आहेत. ठाणे जिल्ह्यात वारली चित्रकलेची परंपरा ठाकर समाजाने जपलेली आहे, तर इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पिंगुळी येथे चित्रकथी परंपरेचे संवर्धन गंगावणे कुटुंबीय करत आहे. चित्रकथीची लोककला राजाश्रय मिळाल्यापासून ठाकर समाजाने चालू ठेवलेली आहे. ठाकरांनी नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून पिंपळाच्या पानांवर चित्रे काढायला सुरुवात केली. सुरुवात करताना यामध्ये  रामायणातील आणि महाभारतातील कथांवरील चित्रे होती. रामायणातील, महाभारतातील कथा या गंगावणे कुटुंबाच्या पद्धतीने सादर होतात. त्या पूर्वी ठाकर भाषेत सादर व्हायच्या. या सादरीकरणातील रामायण-महाभारताच्या कथा रूढ कथेपेक्षा वेगळ्या असतात. पिंपळाच्या पानावरील चित्रे आणि बाहुल्या हे दोन्हीही प्रकार ठाकर समाजामध्ये रूढ होते. १२ बाय १८चा पेपर सुरुवातीला सावंतवाडीच्या खेमराज सावंत महाराजांनी या कुटुंबाला बनवून दिला आणि या अशा पेपरांवर ते चित्रे काढू लागले. राजाने त्यांना आश्रय दिला. हाताने तयार पेपरवर ते चित्रे काढू लागले. अरण्यकांड, सुंदरकांड, बालकांड अशी रामायणातील प्रकरणे पाडून त्यांनी चित्रांच्या पोथ्या तयार केल्या. आज रोजी अशा चित्रांचे बावन्न संच उपलब्ध आहेत.

रात्री दहा वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत एक पेपर ठेवून रात्रभर कथानक सांगितले जाते. प्रत्येक गावामध्ये एक मंदिर असते, त्या मंदिरात नवरात्रीच्या नऊ दिवसात राजाच्या निर्देशाने चित्रकथीचे कार्यक्रम सुरु ठेवले गेले. ही परंपरा आजही कायम आहे. हे कार्यक्रम करताना तंबोरा ही निशाणी असते. वीणा, टाळ, डमरु ही वाद्येदेखील साथीला असतात. तंबोरा घेऊन घरमागणी केली जाते. “आणा गो बाई काहीतरी माउली इला माउलीकडे इलो, हा आणा गे बाई काहीतरी देवाचा निशाणा इलो” असे म्हणत घरोघर जाऊन धनधान्य मागितले जाते. भात किंवा कोकम जे काही असेल, ते सूपभरून महिला दान देतात. दरम्यान राजाश्रय संपल्यानंतर हे सगळे बंद झाले आणि एकेकाळी जे दान म्हणून मिळायचे, त्यातला सन्मान संपला आणि गंगावणे कुटुंबावर भिक्षेकरी होण्याची वेळ आली.काही क्षणी त्यांना सामाजिक मानसन्मानही मिळेनासा झाला होता. नंतरच्या काळात मात्र कुडाळच्या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये चित्रकथी कार्यक्रम करण्याचा मान त्यांना देण्यात आला.

पूर्वी चित्रकथ्यांची दहाबारा घरे होती. आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये ठाकर समाजाची लोकसंख्या साडेचार हजार इतकी आहे. आता सहसा कोणी हे चित्रकथी करत नसल्याने अगदी बोटावर मोजण्याइतके लोक आहेत, जे अजूनही चित्रकथी दाखवतात. आता मुले चित्रकथी दाखवतात, कारण जुने लोक तर आता राहिले नाहीत. परशुराम गंगावणे यांनी त्यांची कला मर्यादित न ठेवता ते लहानांपासून मोठ्यापर्यंत ज्यांना आवड आहे त्यांना शिकवतात. अनेक शिबिरे ते घेतात. अनेक मान्यतेच्या संस्थेत त्यांचे सत्कार झाले आहेत. त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त आहे. पिंगुली गुढीपूर, कुडाळ, सिंधुदुर्ग येथे ते स्थायिक झाले असून चित्रकथीतील त्यांचे कार्य अविरत सुरू आहे.

संदर्भ :

  • खांडगे, प्रकाश, महाराष्ट्रातील प्रयोगात्म लोककला- परंपरा आणि नवता, लोकसाहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र शासन, २०१७.