प्लेटो व ॲरिस्टॉटल यांचे तत्त्वविचार प्रसृत करण्याचे विल्यम डेव्हिड रॉस (१८७७–१९७१) यांचे कार्य प्रसिद्ध आहे. तसेच त्यांनी मांडलेली ‘प्राइमा-फेसी ड्यूटिज’ म्हणजे वरकरणी कर्तव्ये ही संकल्पना गेल्या शतकात नीतिशास्त्रात मान्यता पावली आहे.

सकृतदर्शनी जी कर्तव्यकर्मे वाटतात, ती वास्तविक नसतात. वरकरणी दिसणारी कर्तव्ये आणि वास्तविक असणारी कर्तव्ये यांत त्यांनी फरक केला आहे. वरकरणी जी कर्तव्ये वाटतात, ती आभासात्मक असतात असे नव्हे. त्यांना सबळ नैतिक समर्थन असते; परंतु त्याहून सबळ कारण व समर्थन वास्तविक कर्तव्याला असते. म्हणून वरकरणी वाटणाऱ्या कर्तव्यापेक्षा (Prima-facie duties) वास्तविक कर्तव्य (Actual Duty) पार पाडणे अधिक महत्त्वाचे असते, असे रॉस स्पष्ट करतात.

उदाहरणार्थ,आपण घरच्यांना काही कबूल करतो, त्याप्रमाणे तजवीज करतो; पण महत्त्वाचे काम निघाल्यास कबूल करूनही तसे जमत नाही. प्रश्न वचनपूर्ती किंवा वचनभंगाचा नसतो, तर त्याहून महत्त्वाचे कर्तव्य पार पाडल्याचा असतो. म्हणजे वरकरणी कर्तव्य पार पाडले नाही, ह्यापेक्षा वास्तविक कर्तव्य पार पाडणे महत्त्वाचे असते. परिस्थितीवशात म्हणा किंवा वास्तविक कर्तव्याचे पारडे जड झाल्यामुळे म्हणा सकृतदर्शनी जे कर्तव्य वाटते, ते तसे वाटून न घेता आतल्या आवाजाची साद ऐकत देशकालमानानुसार प्राधान्यक्रम ठरवावे लागतात. कधी इतरांचा जीव वाचविण्यासाठी, तर कधी सर्वांच्या हितासाठी एका विशिष्ट कर्तव्यकर्मास मुरड घालावी लागते. दुसऱ्या वरचढ कर्तव्याचे पालन बंधनकारक असते. ते कर्तव्यपालन हेच आपले उत्तरदायित्व असते. अर्थात एका वेळी एका आणि एकाच कर्तव्याचे पालन बंधनकारक असते.

ह्या संदर्भात खालील सात प्रमुख तत्त्वांचे प्रतिपादन रॉस करतात.

 • वचनपूर्तीसाठी आपण कटिबद्ध असावे व एकनिष्ठ तसेच सत्यवचनी राहावे (Fidelity).
 • आपल्याकडून चूक झाल्यास ती दुरुस्त करावी (Reparation).
 • इतरांनी आपल्यासाठी जे केले त्याबद्दल कृतज्ञता राखावी व उपकारांची फेड उपकारानी अवश्य करावी (Gratitude).
 • इतरांस शारीरिक किंवा मानसिक इजा पोहोचणार नाही ह्याची खबरदारी घ्यावी (Non-maleficence).
 • इतरांप्रती दया असावी व त्यांचे स्वास्थ्य, प्रगल्भता, सुरक्षितता, सौख्य तसेच कल्याणवृद्धीसाठी प्रयत्नशील असावे (Beneficence).
 • स्वतःतही वरील सद्गुणांची जोपासना करावी (Self-improvement).
 • आपण न्यायी असावे आणि आपलया साधनसंपत्तीचे तसेच आपल्यावरील जबाबदाऱ्यांचे समान वाटप करावे (Justice).

ह्या संदर्भातील निर्णय घेताना आतला आवाज महत्त्वाचा असतो. तो प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. त्याला रॉस प्रातिभज्ञान (Intuition) म्हणतात व नैतिक धारणांची अनेकता मान्य करतात. मात्र भावनिकतावादी तत्त्वचिंतक नैतिकतेला जो भावनिक रंग देतात व तेच रूप मानतात, तसे रॉस मानीत नाहीत; तर ते नीतीची वस्तुनिष्ठता स्वीकारून व्यक्तिगतता अबाधित राखतात. भूमिती किंवा बीजगणितात जशी सुस्पष्ट विधाने असतात, त्यांना अन्य समर्थनाची आवश्यकता नसते, त्याचप्रमाणे नीतिशास्त्रातील वाक्ये स्वयंसिद्ध असतात. मूरने जसे एकेक हात उंचावून बाह्य जगाचे अस्तित्व सिद्ध केले, तसे रॉस यांनीही डॉ. जॉन्सनच्या सुरात सूर मिसळले व “सर, आम्हाला माहीत आहे, आम्ही आमच्या मर्जीनुसार निर्णय घेण्यास मोकळे आहोत आणि इथे विषय संपला!” असे मानले. एकंदरीत, मूरप्रमाणे नीतीस अंतर्ज्ञानात्मक व अनैसर्गिक मानले. कर्तव्य-अकर्तव्याचा प्रश्न जेव्हा जेव्हा उद्भवतो, तेव्हा रॉसच्या मते एक आणि एक कर्तव्य प्रबळ ठरते. त्याला अग्रक्रम देणे भाग पडते. शेली कागनने ह्या संदर्भात ‘प्रो-टॅंटो कर्तव्ये’ असा शब्दप्रयोग करणे अधिक योग्य मानले. येथे भगवद्गीतेतील कृष्णार्जुनसंवादाचा संदर्भ महत्त्वाचा आहे. “किं कर्म किमकर्मेति कवयोδ प्यत्र मोहिताः׀” असे गीतेत सुरुवातीला म्हटले आहे. सर विल्यम डेविड रॉस यांची सुरुवातीची सहा वर्षे त्यांचे वडील जॉन रॉस हे त्रावणकोरच्या महाराजा विद्यालयाचे प्राचार्य असल्याने भारतात गेली होती.

संदर्भ :

 • Kagan, Shelly, The Limits of Morality, Oxford, 1989.
 • McNaughton, David, ‘An Unconnected Heap of Duties?’, Philosophical Quarterly, 1996.
 • Ross, W. D. Foundations of Ethics, Oxford, 1939.
 • Ross, W. D. The Right and the Good, Oxford, 1930.
 • Stratton-Lake, P. Ethical intuitionism : Re-evaluations, Oxford, 2002.
 • https://iep.utm.edu/ross-wd/
 • https://www.youtube.com/watch?v=bMhsc0NbTXQ

समीक्षक : सुमेरू दे गोंडाणो