हृदयाच्या स्नायूंमध्ये रक्ताची गुठळी तयार झाल्याने हृदयाला शुद्ध रक्ताचा पुरवठा होत नाही व हृदयाचे स्नायू त्यांचे काम करणे हळूहळू कमी करतात किंवा बंद करतात. त्यामुळे हृदयामध्ये वेदना होण्यास सुरुवात होते, याला हृद्स्नायु अभिशोष किंवा हृदयविकारचा झटका येणे असे म्हणतात. हृदयरोगाचा झटका आलेल्या रुग्णाच्या आरोग्य सेवा व शुश्रूषा यामध्ये परिचारिकेची भूमिका सुद्धा महत्त्वाची असते. अशा प्रकारच्या उपचारांत साहाय्य करणाऱ्या परिचारिकेची शैक्षणिक अर्हता एम. एस्सी. नर्सिंग इन कार्डिओव्हॅस्क्युलर अँड थोरॅसिक (M.Sc. Nursing in Cardiovascular and Thoracic) असते. या प्रशिक्षणात हृदयाचे आणि श्वसनाचे आजार यांच्या परिचर्येचा विशेष अभ्यास असतो.
हृदयविकारचा झटका आल्यानंतरची तातडीची परिचर्या : हृदयरोग तज्ञाच्या सल्ल्यानुसार आणि आपल्या ज्ञान व कौशल्य यांच्या आधारावर परिचारिका खालील पद्धतीने आपले कार्य करते.
- परिचारिका तातडीच्या शुश्रूषेकरिता आवश्यक सर्व साहित्य एका ट्रे मध्ये व्यवस्थित काढून ठेवते. यामध्ये रुग्णाला जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून हातमोजे, स्वरयंत्राची तपासणी करणारे उपकरण (Laryngoscope), विविध आकाराच्या कृत्रिम श्वासनलिका, श्वासनलिकेच्या आवरणास बधिरता आणण्याकरिता वापरली जाणारी झायलोकेन जेली (Xylocaine Jelly), पिचकारी (Syringe), चिकटपट्टी (Sticking tape), रुग्णाला कृत्रिम श्वास देण्याकरिता ॲम्बु बॅग (Ambu bag), कृत्रिम प्राणवायू देण्यासाठी व श्वासोश्वासाच्या स्वाभाविक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी ऑक्सिजन मास्क व नलिका, रक्तातील साखरचे प्रमाण तपासण्यासाठी ग्लुकोमीटर व पट्टी (Strip), रुग्णाचा रक्त नमुना घेताना तसेच सुई शीरेमध्ये लावताना शीर दिसण्यासाठी बांधले जाणारे उपकरण (Touniquet), विजेरी (Torch), बुजी (शस्त्रक्रियेत वापरली जाणारी पातळ व लवचिक सळई; Bougie), मुखपत्र (Mouthpiece), सुई आणि इतर अत्यंत महत्त्वाची औषधे इत्यादी साहित्यांचा समावेश असतो.
- रुग्ण तातडीच्या रुग्ण सेवा विभागात आल्यानंतर त्याच्या रोगाचे निदान त्वरित व्हावे याकरिता परिचारिका तज्ञांच्या सल्ल्याने त्याच्या काही तपासण्या करते. प्रथमदर्शनी छातीत दुखणे, छातीतून डाव्या हातात आणि खांद्यामध्ये दुखणे, घाम येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, मळमळ/ उलटी होणे, अशा लक्षणांवरून निदान करण्यास मदत होते. आवश्यकतेनुसार विद्युत हृल्लेख काढणे, हृदयाच्या स्नायूंत निर्माण होणाऱ्या द्रवाचे प्रमाण किती आहे इ. तपासण्या परिचारिका करतात.
- रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असल्यास परिचारिका त्याच्या बिछान्याची स्थिती बदलते (डोक्याच्या बाजूने पलंग ४५° मध्ये वर केला जातो) त्यामुळे फुप्फुसांना प्रसरण पावण्यासाठी जास्त जागा मिळते व श्वसनक्रिया स्वाभाविक राखण्यास मदत होते. ऑक्सिजन मास्कद्वारे आवश्यकतेनुसार ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी परिचारिका नियोजन करते.
- अशा रुग्णांना औषधे देत असताना परिचारिका विशेष काळजी घेतात. उदा., दिले जाणारे औषध त्याच रुग्णाला दिले जात आहे का, औषधाची मात्रा – क्षमता, औषध देण्याचा मार्ग, रुग्णावर औषधाचा विपरित परिणाम होतो का इत्यादी. तसेच परिचारिका रुग्णाचे सातत्याने निरीक्षण करून त्याच्या रोगाची लक्षणे, नाडी, रक्तदाब, हृदयाचे ठोके, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण, लघवीचे प्रमाण (urine output) या सर्व गोष्टींची नोंद ठेवते. हृदयविकारचा झटका आल्याने रुग्णाला रक्त पातळ करणारी औषध दिली जातात त्यामुळे इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी रक्तस्राव होण्याची शक्यता असल्याने स्नायूंमध्ये इंजेक्शन देणे टाळतात. परिचारिका दिलेल्या सर्व औषधांची जबाबदारीने नोंद करून डॉक्टरांना कळविते.
- उलटी, जास्त घाम, लघवी अशा कारणांमुळे रुग्णाच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झालेले असते त्यामुळे रुग्णाच्या शरीरिरातील द्रवाचे आवश्यक तेवढे प्रमाण राखण्याकडे परिचारिका लक्ष देते.
- हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तिला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत किंवा नंतर जे प्रथमोपचार केले जातात त्याला सीपीआर (Cardio Pulmonary Resuscitation) म्हणतात. रुग्णाची नाडी अचानक बंद होणे किंवा हृदयाचे ठोके बंद होणे अशी लक्षणे आढळल्यास सीपीआर पद्धत अवलंबली जाते. यात रुग्णाचा प्रतिसाद पाहून वैद्यकीय मदत मागवली जाते. रुग्णाकडून प्रतिसाद मिळेपर्यंत त्याला छातीवर दाब देवून (chest compression) व तोंडाद्वारे श्वास पुरविला जातो. सीपीआर देण्याची पद्धत, प्रक्रिया व तत्त्वे यासंदर्भातील सर्व माहिती परिचारिकेस असणे आवश्यक असते.
- या सर्व वैद्यकीय प्रक्रियेमध्ये संमतीपत्रकावर नातेवाईकाची स्वाक्षरी घेणे खूप महत्त्वाचे असते. तसेच रुग्ण व नातेवाईकांना मानसिक आधार देणे व त्यांचे समुपदेशन करणे गरजेचे असते. दिलेली औषधे, केलेल्या चाचण्या, रुग्णासंर्भातील सर्व लक्षणे या सर्व गोष्टींची नोंद ठेऊन अहवाल तयार करण ही परिचारिकेची जबाबदारी असते.
हृदयविकारचा झटका पुन्हा येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी पुढील बाबींवर लक्ष देणे फार गरजेचे आहे.
- आहार (Diet) : आहारात फळे, पालेभाज्या, डाळी, कडधान्य, कमी चरबी (fat) किंवा चरबी नसलेले पदार्थ, चरबी नसलेले दूध, सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल, मोहरीचे तेल,शेंगदाण्याचे तेल, बदाम, अक्रोड,जवस, मासे इत्यादींचा समावेश असावा. तर, प्रतिदिन ६ ग्रॅम पेक्षा जास्त मीठ सेवन करू नये, जंकफूड (Junk food), अंड्याचा पिवळा भाग, चरबीचे मटन, बटर लावलेले चिकेन, बटर, चीज, आइस्क्रिम, बेकरीमध्ये तयार केलेले पदार्थ, खोबर्याचे व पाम तेल, तळलेले पदार्थ इत्यादींचे सेवन करू नये.
- व्यायाम (Exercise) : लठ्ठपणा कमी करावा, दररोज व्यायाम करावा, रोज ३० मिनिटे तरी चालावे, व्यायाम केल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते तसेच कोलेस्टेरॉल (cholesterol) ची पातळी कमी होते.
- सिगरेटचा वापर बंद करावा. रक्तदाब व रक्तातील साखरेचे प्रमाण कमी/नियंत्रित असावे.
सारांश : हृदयरोगचा झटका येणे ही चिंतेची बाब आहे तरी वेळच्यावेळी शारीरिक तपासण्या करून घेतल्यास आपण आजार होण्यापासून वाचवू शकतो. रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यापासून ते त्याला डिस्चार्ज मिळेपर्यंत परिचारिका त्याची काळजी घेतात. तज्ञांच्या सल्ल्यानुसार परिचारिका औषध देणे, श्वासनलिकांतर्गत नलिका (endotracheal tube) टाकण्यासाठी मदत करणे, नोंदी व अहवाल तयार करणे, सीपीआर देणे इ. सर्व बाबींची जबाबदारी परिचारिका अचूक रीत्या पार पाडत असते त्यामुळे तातडीच्या रुग्ण सेवा विभागात परिचर्येचे खूपच महत्त्वाचे योगदान आहे.
संदर्भ :
- Lippincott Williams & Wilkins, Handbook of Diseases, 3rd ed. 2004.
- Black J. M, Hawks J. H. Text book of medical surgical nursing, 8th ed., vol-1, Elsevier, India, 2009.
समीक्षक : राजेंद्र लामखेडे