शेकरू ही एक मोठ्या आकाराची खार असून तिला उडणारी खार किंवा झाडावरची खार असेही म्हणतात. तसेच तिला शेकरा, शेकरी किंवा भीमखार अशीही नावे आहेत. इंग्रजी भाषेत तिला इंडियन जायंट स्क्विरल (India giant squirrel) किंवा मलबार जायंट स्क्विरल (Malabar giant squirrel) असे नाव आहे. शेकरू हा स्तनी वर्गातील कृंतक गणाच्या सियुरीडी (Sciuridae – squirrel family) कुलातील प्राणी असून त्याचे शास्त्रीय नाव रॅट्युफा इंडिका (Ratufa indica) आहे. रॅट्युफा  ही प्रजाती मूळची भारतातील असून हा प्राणी वने आणि वनभूमींमध्ये वावरतो. तो दिनचर, वृक्षवासी आणि शाकाहारी आहे. तो मुख्यत: पश्चिम घाट, पूर्व घाट आणि सातपुडा पर्वतरांगांच्या उत्तरेकडे अगदी मध्य प्रदेशपर्यंत आढळतो. समुद्रसपाटीपासून १८०—२,३०० मी. दरम्यानच्या उष्ण प्रदेशांतील पानझडी तसेच अर्धपानझडी वनांमध्ये, नदीकाठच्या प्रदेशांतील गर्द झाडांवर आणि सदाहरित वनांत राहणे तो पसंत करतो. सामान्यपणे त्याच्या अधिवासात घट झाल्याने त्याचा अधिवास खंडीत झाला आहे.

शेकरू (रॅट्युफा इंडिका इंडिका)

भारतीय उपखंडात त्याच्या रॅ. इं. इंडिका (Ratufa indica indica), रॅ. इं. सेंट्रॅलिस (R. i. centralis), रॅ. इं. डीलबाटा (R. i. dealbata) आणि रॅ. इं. मॅक्झिमा (R. i. maxima) अशा उपजाती आढळतात. रॅ. इं. सेंट्रॅलिस  ही आकाराने लहान असलेली जाती भारताच्या मध्य भागात विशेषत: सातपुडा पर्वत आणि पूर्व घाटांत आढळते. रॅ. इं. डीलबाटा  ही जाती गुजरातमध्ये आढळत असून ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. रॅ. इं. मॅक्झिमा  ही जाती पश्चिम घाटांतील घनदाट वनांमध्ये आढळत असून तिचा पाठीचा तसेच शेपटीचा भाग पूर्णपणे काळा असतो.

शेकरूची डोक्यापासून शेपटीपर्यंतची लांबी २५—५० सेंमी. असते; शेपटी जवळजवळ धडाइतकीच किंवा किंचित लांब असते. वजन १.५—२ किग्रॅ. असते. मादी आकाराने आणि वजनाने नरापेक्षा लहान असते. शेकरूच्या रंगात पांढुरका, पिवळसर करडा, फिकट तपकिरी, मातकट लाल, गडद अंजिरी, गडद लाल किंवा काळा अशा विविध रंगांच्या छटा दिसून येतात. पोटाखालचा भाग आणि पुढचे पाय सहसा पिवळसर करड्या रंगाचे असतात. डोके फिकट तपकिरी किंवा तपकिरी असते. मात्र दोन्ही कानांच्यामध्ये एक विशिष्ट पांढरा भाग असतो. उपजातीप्रमाणे या भागाच्या रंगांमध्ये विविधता आढळून येते. पाय रुंद असून नख्या मोठ्या व बळकट असतात.

शेकरू (रॅट्युफा इंडिका मॅक्झिमा )

शेकरू मुख्यत: सकाळी लवकर आणि सायंकाळी अधिक सक्रिय असतो; दुपारच्या वेळी तो विश्रांती घेतो. सामान्यपणे झाडांच्या शेंड्याकडील पानांच्या भागात तो वावरतो आणि क्वचितच जमिनीवर उतरतो. शिकारी प्राण्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी तो आपले घरटे मोठ्या, भरपूर व भक्कम फांद्या असलेल्या झाडांवर, तेही अधिक उंचीवर बांधतो. तो राहात असलेली झाडांची उंची साधारणपणे ११ मीटरपेक्षा अधिक आढळली आहे. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाण्यासाठी तो सहा मीटरपर्यंत लांब उडी मारू शकतो. संकटात असताना संरक्षणासाठी शेकरू पळून जाण्याऐवजी हालचाल न करता झाडाच्या बुंध्याला घट्ट पकडून राहतो. गरुड, घुबड यांसारखे शिकारी पक्षी आणि बिबट्या हे त्याचे मुख्य शत्रू आहेत.

शेकरू पूर्णपणे शाकाहारी प्राणी असून तो प्रामुख्याने फळे खातो. फळांशिवाय त्याच्या आहारात फुले, बिया आणि झाडाची साल असते. सर्व कृंतक गणातील प्राण्यांचे पटाशीचे दात सतत वाढतच राहतात. त्यानुसार शेकरूचेही पुढील दात वाढतात. पटाशीच्या दातानंतर वरच्या आणि खालच्या जबड्यामध्ये पोकळी असते. पुढच्या दातांनी कुरतडलेली फळे या पोकळीमध्ये गालफडाच्या साहाय्याने धरून तो भराभरा खातो. त्याच्या काही जाती मांसाहारी असून ते कीटक तसेच पक्ष्यांची अंडी खातात.

सामान्यत: शेकरू एकट्याने किंवा जोडीने राहतो. शेकरू अनेक फांद्या आणि भरपूर पाने यांपासून मोठे गोल आकाराचे घरटे तयार करतात; मोठ्या शिकारी प्राण्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी ते बारीक फांद्यांवर घरटे बांधतात. उन्हाळ्यात पानगळीच्या वनांमध्ये झाडांची पाने गळून गेली की त्यांची घरटी दिसू लागतात. एकाच वनांमध्ये ते एकापेक्षा अधिक घरटी बांधतात आणि विश्रांतीसाठी एक, तर पिलांसाठी दुसरे असा घरट्यांचा वापर करतात.

शेकरू

शेकरू लपून वावरत असल्याने सहसा तो दिसून येत नाही. बहुधा फांद्यांमधून लोंबणाऱ्या लांब शेपटीमुळे त्यांचे आस्तित्व जाणवते. किचऽकिचऽऽ आवाजावरून त्याच्या वावरण्याचा अंदाज बांधता येतो. धोक्याच्या क्षणी ते एकमेकांना सावध करतात.

प्रजनन काळात नर मादीसाठी एकमेकांशी सक्रियपणे स्पर्धा करतात. नर-मादीची जोडी अधिक काळ टिकते. शेकरूचा प्रजनन कालावधी आणि गर्भावधी यांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. मलेशियात प्राणिसंग्रहालयात त्याने मार्च, एप्रिल, सप्टेंबर आणि डिसेंबर या काळात पिलांना जन्म दिल्याची नोंद आहे. याचा प्रजनन कालावधी वर्षभर किंवा एका वर्षात बऱ्याच वेळा असतो. गर्भावधी साधारण २८ ते ३५ दिवसांचा असून मादीला एकावेळी १ ते २ किंवा क्वचित ३ पिले होतात. शेकरूचे आयुर्मान सुमारे २० वर्षांचे असते.

शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा ‘राज्य प्राणी’ आहे. इंटरनॅशनल यूनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर (IUCN) या संस्थेने शेकरू या प्राण्याचा समावेश ‘कमी धोक्याची’ (Least Concern) जाती यामध्ये केला आहे. परंतु, जंगलतोडीमुळे शेकरूचे आधिच मर्यादित असलेले अधिवास कमी होत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस या प्राण्यांची संख्या कमी होत आहे. विशेषत: शेकरूच्या संवर्धनासाठी महाराष्ट्रातील भीमाशंकर हे अभयारण्य संरक्षित करण्यात आले आहे. याशिवाय दाजीपूर व राधानगरी या अभयारण्यातही त्याचे वास्तव्य आढळून येते. शेकरूमुळे बीजप्रसारासारखे महत्त्वाचे कार्य होण्यास मदत होते, त्यामुळे त्याला पारिस्थितिक संस्थेतील (Ecosystem) महत्त्वाचा घटक मानला जातो.

पहा : भीमाशंकर अभयारण्य.

संदर्भ :

  • https://a-z-animals.com/animals/indian-giant-squirrel/
  • https://animaldiversity.org/accounts/Ratufa_indica/
  • https://animalia.bio/indian-giant-squirrel

समीक्षक : विजय लाळे