स्तनी वर्गाच्या मांसाहारी (Carnivora) गणातील हायनिडी कुलातील सस्तन प्राणी. या कुलातील याच्या हायना (Hyena) व क्रोकूटा (Crocuta) या दोन प्रजाती असून पट्टेरी तरस, ठिपकेवाला तरस आणि तपकिरी तरस अशा तीन जाती आहेत. याची काही लक्षणे कुत्रा व मांजर यांप्रमाणे आहेत. तो दिसायला कुत्र्यासारखा असून तोंड, पाय व नख्या कुत्र्याप्रमाणे; तर दातांची ठेवण मार्जार कुलातील प्राण्यांप्रमाणे असते. तरसाचे डोके मोठे असून मुस्कट टोकदार असते. पुढील पाय मागील पायांपेक्षा लांब व मजबूत असून मागील पाय आखूड व कमकुवत असतात. पाठीचा मागचा भाग अरुंद व उतरता असल्यामुळे त्याला कुबड आल्यासारखे वाटते. पायाच्या पंजाला आखूड, बोथट व आत न जाणाऱ्या (Non retractile) चार नख्या असतात. कान टोकदार, ताठ व उभे असून श्रवणक्षमता (ऐकण्याची क्षमता) चांगली असते. त्यांचा अधिवास उष्ण प्रदेशांत असल्यामुळे कानांमार्फत उष्णता बाहेर टाकली जाते. भक्ष्याचे ओझे वाहण्यासाठी मान व खांदे भक्कम असतात. डोळे मोठे व दृष्टी तीक्ष्ण असते. वास घेण्याची क्षमता उत्तम असते. संपूर्ण शरीरावर केस (फर) असतात. मानेभोवतीचे केस दाट व लांब आयाळीसारखे असून डोक्यापासून शेपटीपर्यंत पसरलेले असतात. आक्रमक अवस्थेत पाठीवरील केस ताठ होतात व तो मूळ आकारमानापेक्षा मोठा दिसतो. शेपटी लांब व झुपकेदार असते. मूत्र व विष्ठा टाकून तो आपला प्रदेश निश्चित करतो. तरसाचे दंतसूत्र पटाशीचे दात ३/३, सुळे १/१, उपदाढा ४/४ व दाढा १/१ असे आहे.

पट्टेरी तरस (हायना हायना)
पट्टेरी तरस (हायना हायना) : पिलू.

तरस हा निशाचर प्राणी आहे. तो सर्वाहारी असून लहान प्राणी, कीटक, फळे, खरबूज, खारका इ. खातो. तो गोडे व खारे पाणी पितो तसेच पाण्याविना बरेच दिवस राहू शकतो. तो कुशल शिकारी असून मोठ्या प्राण्याची शिकार कळपाने करतो. गंधक्षमता उत्तम असल्याने मृत प्राण्यांचा माग काढत तो कित्येक किलोमीटरचा प्रवास न थकता करतो. तसेच त्याला उत्तम पोहता येते. मेलेले व कुजलेले प्राणी हे त्याचे मुख्य खाद्य आहे. त्यामुळे त्याला जंगलाचा आरोग्यरक्षक म्हटले आहे. कुजके मांस पुरेसे मिळाले नाही तर तो शेळ्या, मेंढ्या व कुत्री खातो. म्हातारे झालेल्या वाघ, सिंह यांसारख्या मोठ्या प्राण्यांचीही ते कळपाने शिकार करतात. कळपामध्ये ५—८० प्राणी असतात. तरस डोंगरकपारीच्या किंवा ओढ्याजवळच्या घळीत किंवा मोठ्या खडकांच्या आड स्वत: किंवा सायाळीने केलेल्या बिळात राहतो. सिंह व मानव हे त्याचे मुख्य शत्रू आहेत.

पट्टेरी तरस (Striped Hyena) : याचे शास्त्रीय नाव हायना हायना (Hyena hyena) असे आहे. याच्या हायना हा. सायरिका (Hyena hyena syriaca), हायना हा. सुलताना (Hyena hyena sultana), हायना हा. दुबाह (Hyena hyena dubbah) आणि हायना हा. हायना (Hyena hyena hyena) या पाच उपजाती आहेत. पैकी हायना हा. सायरिका  आणि हायना हा. हायना  या जाती भारतात आढळतात.

ठिपकेवाला तरस (क्रोकूटा क्रोकूटा) : नर.

या प्रजातीमध्ये नर व मादी दिसायला सारखेच असून नर मादीपेक्षा थोडा मोठा असतो. त्याची लांबी १००—१३० सेंमी., शेपटी २५—४० सेंमी. आणि खांद्यापासूनची उंची ६५—८० सेंमी. असते. नराचे वजन २६—४१ किग्रॅ. तर मादीचे २६—३४ किग्रॅ.पर्यंत असते. शरीरावरील केस (फर) करडसर व पिवळसर/तपकिरी रंगाची असून गळ्यावर काळ्या रंगाचा चट्टा असतो. शरीर व पायांवर काळ्या रंगाचे उभे पट्टे असतात. पट्टे उन्हाळ्यात अधिक उठावदार तर हिवाळ्यात फिकट होतात. रंग, शरीरावरील पट्टे आणि अंगावरील लांब केस अशा लक्षणांबाबत आर्डवुल्फशी त्याचे साम्य आहे. तो सर्वाहारी आहे. त्याच्या आहारात खरबूज व खारका असल्याने इझ्राएलमध्ये तो उपद्रवी प्राणी आहे.

ठिपकेवाला तरस (क्रोकूटा क्रोकूटा) : मादी.

पट्टेरी तरसामध्ये विणीचा हंगाम ठराविक नसतो. गर्भावधी ९०—९२ दिवसांचा असून मादीला    १—४ पिले होतात. जन्मत: ती आंधळी असतात. ७-८ दिवसांनी पिले डोळे उघडतात. पिलांचे दात तीन आठवड्यानंतर विकसित होतात. त्यांच्या शरीरावरील फर पांढरी-करडी असून त्यावर काळे पट्टे असतात. नर-मादी दोघे मिळून पिलांची काळजी घेतात. आयुर्मर्यादा नैसर्गिक अधिवासामध्ये सु. १२ वर्षे आणि प्राणिसंग्रहालयात सु. २० वर्षे असते.

ठिपकेवाला तरस (क्रोकूटा क्रोकूटा) : पिलासहित मादी.

ठिपकेवाला तरस (Spotted hyena) : याचे शास्त्रीय नाव क्रोकूटा क्रोकूटा (Crocuta crocuta) असे आहे. त्याचा आढळ दक्षिण आफ्रिकेतील सहारा वाळवंटी प्रदेशांत आहे. तो मनुष्याच्या हसण्यासारखा आवाज काढतो. त्यामुळे त्याला हसरे किंवा हसणारे तरस असेही म्हणतात. तो आफ्रिकन सिंहानंतरचा मोठा मांसाहारी प्राणी आहे. त्याच्या शरीरावरील फर पिवळसर किंवा करडी असून त्यावर काळे ठिपके असतात. याची शेपटीसहित लांबी सु. २ मी. व वजन ५०—८६ किग्रॅ. असते. शेपटी २५—३० सेंमी. लांब असते. खांद्यापासूनची उंची सु. १ मी. असते. तो संपर्कासाठी कण्हणे (Moans), ओरडणे (Yells), फिदीफिदी हसणे (Giggles) आणि मोठ्याने आरोळी देणे (Whoops) याप्रकारचे आवाज काढतो. इतर दोन जातींपेक्षा याचे कान गोलाकार असतात. मादी नरापेक्षा आकाराने मोठी असते. मादीचे बाह्य जननेंद्रिय नरासारखे असून तीमध्ये आभासी शिश्न (Pseudo-penis) असते. ते नरापेक्षा लांबीने कमी आणि जास्त जाड व गोलाकार असल्यामुळे वेगळे ओळखता येते. मूत्रविसर्जन, समागम आणि पिलांना जन्म देणे ही कामे या आभासी शिश्नामार्फत केली जातात. मादीमध्ये टेस्टोस्टेरॉन हॉर्मोनचे (स्रावाचे) प्रमाणही नरापेक्षा ३०% अधिक असल्यामुळे मादी जास्त गुबगुबीत दिसते. तसेच ती आक्रमक असून तिचे प्रभुत्व असते. ही स्तनी वर्गातील एकमेव मादी आहे जिला बाह्य योनिछिद्र नसते. तसेच दोन स्तनाग्रे असतात.

विणीचा हंगाम ठराविक नसतो. गर्भावधी ११० दिवसांचा असून मादीला एका वेळी १ ते २ पिले होतात. जन्मतःच पिले डोळे उघडतात आणि थोड्याच अवधीत एकमेकांवर हल्लाही करतात. त्यामुळे अशक्त पिले मृत्यू पावतात.  त्यांच्या मृत्यूचे हे प्रमाण सु. २५ टक्क्यांपर्यंत आहे.  पिले १२ ते १६ महिन्यांची होईपर्यंत त्यांचे पालनपोषण संपूर्णत: मादीच करते. मादी सु. २ वर्षांनी, तर नर सु. ३.५ वर्षांनी प्रजननक्षम होतात. आयुर्मान सु. २५ वर्षे असते.

तपकिरी तरस (हायना ब्रुनिया)
तपकिरी तरस (हायना ब्रुनिया) : पिलू.

तपकिरी तरस (Brown hyena) : याचे शास्त्रीय नाव हायना ब्रुनिया (Hyena brunnea) असे आहे. ही प्रजाती मूळची इथिओपियन प्रदेशातील आहे. तिचा आढळ दक्षिण आफ्रिकेतील कलहारी व नामीब वाळवंटी प्रदेशात आहे. शरीराचा रंग तपकिरी असून पायावर आडवे काळे पट्टे असतात. नर मादीपेक्षा थोडे मोठे असतात. शरीराची लांबी १३०—१६० सेंमी., खांद्यापासून उंची सु. ९० सेंमी. व वजन ३४—७२ किग्रॅ. असते. कान इतर दोन जातींपेक्षा मोठे व टोकदार असतात. शेपटी लहान व झुपकेदार असते. तसेच शरीरावरील केस (फर) इतर दोन जातींपेक्षा लांब असतात. शक्यतो ते एकएकटे शिकार करतात. आवश्यकता असेल तर लहान कळपाने शिकार करतात. कळपामध्ये ४—१५ प्राणी असतात. विणीचा हंगाम मे-ऑगस्ट असतो. गर्भावधी सु. ९० दिवसांचा असून मादीला १—४ पिले होतात. नर पिलू सु. २ वर्षांनी तर मादी पिलू ३ वर्षांनी प्रजननक्षम होतात. आयुर्मान १२—१५ वर्षे असते.

 

पहा : मांसाहारी गण.

संदर्भ :

  • https://animaldiversity.org
  • https://www.britannica.com/animal/hyena
  • https://animals.sandiegozoo.org

समीक्षक : कांचन एरंडे