रॉबर्ट हूक यांनी ५० पट मोठी प्रतिमा देणाऱ्या सूक्ष्मदर्शकाखाली बूच वृक्षाच्या बाह्य सालीचा (Cork) पातळ काप पाहिला. त्यांना त्यात अनेक पोकळ आयताकृती कोठड्यासारखे आकार दिसले. ही रचना त्यांना मधाच्या पोळ्याप्रमाणे वाटली, त्यामुळे त्यांनी या आकारास ‘Cell’ (पेशी) असे नाव दिले. एका चौरस इंचामध्ये (त्यावेळी प्रचलित असलेले मापन परिमाण) १,२५९,७१२,००० पेशी असतात, हे त्यांनी प्रत्यक्ष मोजून दाखविले.

रॉबर्ट हूक यांनी सूक्ष्मदर्शकाखाली पाहिलेला बूच वृक्षाच्या बाह्य सालीचा पातळ काप

अणु हा जसा सर्व निर्जीव पदार्थांचा मूलभूत घटक असतो, त्याप्रमाणे सर्व सजीवांचा मूलभूत घटक पेशी हा असतो. जीवाणूंसारखे काही सजीव केवळ एकाच पेशीचे बनलेले असतात; तर मानवी शरीर हे असंख्य पेशींच्या समूहाने तयार झाले आहे. प्राण्यांप्रमाणेच वनस्पती देखील पेशींनी बनलेल्या आहेत. बहुपेशीय मानवी शरीर सुमारे ३७ लाख कोटी पेशींचे बनलेले असते. त्यांच्यावर सोपवलेल्या कार्यानुसार पेशींचे आकारमान तसेच त्यांची रचना वेगवेगळी असते. जीवशास्त्रामध्ये “पेशीद्रवाभोवती पटलबद्ध आवरण असलेले सूक्ष्म आकाराचे सजीवांचे स्वयंपूर्ण एकक,” अशी पेशीची जीवशास्त्रीय व्याख्या आहे. पेशीमध्ये असलेल्या द्रवास पेशीद्रव म्हटले जाते.

पेशीआवरण व पेशीद्रव यांशिवाय पेशी जीवित राहू शकत नाही. या पेशीआवरणातून आवश्यक असलेले पोषक पदार्थ आत ओढून घेतले जातात, तसेच टाकाऊ उच्छिष्ट पदार्थ बाहेर टाकले जातात. पेशीमध्ये स्वतंत्रपणे बदल करण्याचे सामर्थ्य आहे. सजीव व निर्जीव यांमधील नेमका फरक हा पेशीच्या बदलक्षम असण्याने ‘जिवंत’ राहण्याच्या क्षमतेत आहे. पेशी विवृत प्रणाली (Open system) व्यवस्थेचे भाग आहेत. पेशीबाह्य माध्यमातून पेशीमध्ये येणाऱ्या रेणूंमधून ऊर्जा निर्मिती होते. निर्माण झालेली ऊर्जा कार्य समाप्तीनंतर पुन्हा माध्यमात विसरीत होते. पेशी स्वत:च्या शरीरात आलेल्या जैवरेणूपासून ऊर्जा निर्मिती करते. आपल्याला आवश्यक असलेले जैव रेणू स्वत: तयारही करते. स्वत:च्या आवश्यक रेणूच्या प्रतिकृतीही बनवते.

मायकोप्लाझ्मा हा सर्वांत लहान एकपेशीय सजीव आहे. त्याच्या पेशीचा व्यास ०.२ μm (मायक्रोमीटर) असतो. (१µm = १ × १०-३ मिलीमीटर). मायकोप्लाझ्माचे वस्तुमान १०-१४ ग्रॅम हे एकूण ८,०००,०००.००० हायड्रोजन अणुभाराएवढे असते. मानवी पेशीचे वस्तुमान मायकोप्लाझ्माहून चार लाख पटींनी अधिक असते. असे असले तरी मानवी पेशीचा सरासरी व्यास २० μm भरतो (मानवी शुक्राणू पेशीचे शीर्ष ५.१ μm व शेपूट ५० μm लांबीचे असते, तर चेतापेशी संपूर्ण शरीराच्या लांबीची म्हणजे १.५ मीटर असू शकते). एका टाचणीच्या टोकावर दहा हजार मानवी पेशी सामावतात. बहुपेशीय सजीवांच्या पेशीमध्ये विविधता असते; उदा., मानवी चेतापेशी व त्वचा पेशी. एकसारख्या एकपेशीय सजीवापासून बहुपेशीय सजीवामधील विविध पेशी बनण्यास अब्जावधी वर्षे लागली आहेत.

सूक्ष्मदर्शकाखाली ज्या पेशीमध्ये केंद्रक दिसत होते, त्यांना केंद्रकी पेशी व ज्या पेशीमध्ये केद्रकाच्या ठिकाणी केंद्रकाऐवजी अस्पष्ट केंद्रकासारखा आकार दिसत असेल अशा पेशींना अकेंद्रकी किंवा असीम केंद्रकी म्हणतात. जीवाणू पेशीमध्ये केंद्रक नसतो. परंतु, केंद्रकाच्या ठिकाणी केंद्रकाभ (केंद्रकासारखा भाग) असतो. वनस्पती व प्राणी यांच्या पेशींमध्ये केंद्रक असते.

केंद्रकी पेशी अधिक गुंतागुतीची असते. त्याचप्रमाणे पेशीची रचना जवळ जवळ एकच असली तरी केंद्रकी पेशीमध्ये वनस्पती पेशी व प्राणी पेशी असे आणखी दोन प्रकार केले आहेत. वनस्पती पेशी हरित लवकांच्या साहाय्याने कर्बोदकांचे रेणू निर्माण करतात. वनस्पती पेशी व वनस्पती पेशींनी साठवून ठेवलेल्या अन्नावर प्राणी पेशी अवलंबून असतात. आभासी केंद्रकी पेशीमध्ये तुलनेने कमी पेशी अंगके असतात. त्यामुळे त्या केंद्रकी पेशीहून लहान आकाराच्या असतात. केंद्रकी पेशीतील पेशी अंगके म्हणजे तंतुकणिका, अंतर्द्रव्य जालिका, रायबोसोम, लयकारिका, गॉल्जी पिंड, पेशीभित्तिका, केंद्रकी वगैरे. या पेशीअंगकांव्यतिरिक्त केवळ वनस्पती पेशीमध्ये हरीत लवक हे एक अंगक असते. म्हणजेच प्राणी पेशीमध्ये हरीत लवक नसते.

पेशीपटल हे पेशीद्रव्याचे आवरण आहे. पेशीचे आकारमान जेवढे मोठे तेवढे पेशीपटलाचा पृष्ठभाग अधिक मोठा असावा लागतो. पेशीतील सूक्ष्म तंतूंच्या साहाय्याने पेशीचा आकार कायम राहतो. पेशीतील रेणूंची सुलभ हालचाल पेशीतील आधार रेणूमुळे होते. पेशीद्रवात सुमारे दहा हजार प्रकारचे रेणू असतात. हे रेणू पेशीस आवश्यक सामग्री तयार करणे व नको असलेल्या रेणूंचे विघटन करण्याचे कार्य करतात.

पहा : कोशिका (पूर्वप्रकाशित नोंद), प्राणी पेशी, वनस्पती पेशी.

संदर्भ :

  • www.brooklyn.cuny.edu/bc/ahp/LAD/C5/C5_ProbSize.html

समीक्षक : रंजन गर्गे