रायबोसोम हे एक पेशीअंगक (Cell organelle) असून प्रथिन संश्लेषणात (Protein synthesis) त्याचा महत्त्वाचा सहभाग आहे. १९५५ साली जॉर्ज ई. पालादे (George Emil Palade) यांनी रायबोसोमचा शोध लावला. त्यांनी त्याचे वर्णन “पेशीद्रवामधील अंतर्द्रव्य जालिकेशी निगडीत लहान कण” असे केले. इतर शास्त्रज्ञांबरोबरच्या संशोधनातून त्यांना रायबोसोमचे प्रथिन संश्लेषणातील कार्य आढळून आले. रायबोसोमवरील संशोधनासाठी १९७४ साली त्यांना नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आले.

रायबोसोम

रचना : प्रत्येक रायबोसोममध्ये एक मोठा उपघटक व एक छोटा उपघटक (Subunit) असतो. रायबोसोम पेशीद्रव्यात विखुरलेले दिसतात. काही ठिकाणी ते अंतर्द्रव्य जालिकेला (Endoplasmic reticulum) जोडलेले असतात. थोडक्यात दोन्ही ठिकाणी ते प्रथिन संश्लेषणात भाग घेतात. रायबोसोम्स चिकटलेल्या अंतर्द्रव्य जालिकेला खडबडीत अंतर्द्रव्य जालिका (Rough endoplasmic reticulum) असे म्हणतात.

आभासी केंद्रकी (Eukaryotic cells) किंवा अकेंद्रकी पेशींमध्ये (Prokaryotic cells) ७०S रायबोसोम्स आढळतात, ज्यांचे छोटे उपघटक ३०S व मोठे उपघटक ५०S असतात. केंद्रकी पेशींमध्ये मात्र ८०S रायबोसोम्स असून त्यांचे ४०S व ६०S असे उपघटक असतात. यातील ‘S’ हे एकक स्वेडबर्ग या स्विस वैज्ञानिकाच्या नावावरून दिले गेलेले आहे. यास ‘स्वेडबर्ग एकक’ (Svedberg unit) असे म्हणतात. पेशींचे भाग द्रावणामध्ये अती तीव्र वेगाने फिरवले असता ते परीक्षा नळीच्या तळाशी ज्या वेगाने साचत जातात, त्या वेगावरून हे एकक ठरवले जाते. एक स्वेडबर्ग एकक (Sunit) म्हणजे १०−१३ सेकंद होय. जैवरेणूंचा अतिद्रुत अपकेंद्रित्र यंत्रात (Ultracentrifuge) परीक्षा नळीच्या तळाशी साठत जाण्याचा वेग मोजता येतो. हे साठत जाणे जैवरेणूच्या रेणूभारावर व किती गुरुत्वाकर्षण बल रेणूवर परिणाम करते यावर अवलंबून असते. हरीतलवक (Chloroplasts) व तंतुकणिका (Mitochondria) यांमध्येही ७०S रायबोसोम असतात. ७०S व ८०S रायबोसोम्समध्ये आढळणारे प्रमुख फरक खालील तक्त्यामध्ये नमूद केले आहेत.

तक्ता : ७०S व ८०S रायबोसोम्समध्ये आढळणारे प्रमुख फरक

कार्य : रायबोसोमचे मुख्य कार्य प्रथिन संश्लेषण आहे. प्रथिन संश्लेषणाच्यावेळी अनेक रायबोसोम एका संदेशवाही आरएनए धाग्यावर (Messenger RNA; mRNA) एकत्र येतात. संदेशवाही आरएनए व रायबोसोमच्या संयुक्त रचनेला पॉलीसोम (Polysome) अथवा पॉलीरायबोसोम (Polyribosome) म्हणतात. ही यंत्रणा जुळणी केंद्रासारखी (Template) असते. या ठिकाणी स्थानांतरी आरएनए (Transfer RNA; tRNA) रायबोसोममधील आर-आरएनए यांच्या साहाय्याने अमिनो अम्ले एकत्र जुळवून प्रथिनांची निर्मिती होते. थोडक्यात अचूकपणे अमिनो अम्लापासून प्रथिन बनवण्यात रायबोसोमचा महत्त्वाचा सहभाग आहे.

केंद्रकी पेशीतील रायबोसोम

स्थानांतरी आरएनए-अमिनो अम्ले संयुक्त रचना (tRNA-amino acid complex) आणि संदेशवाही आरएनए (mRNA) यांच्यामधील आंतरक्रिया व जनुकीय संकेत यांचे रूपांतर प्रथिनांमध्ये होते. ह्या महत्त्वाच्या प्रक्रियेचा समन्वय रायबोसोम्सद्वारे साधला जातो. एवढेच नव्हे तर पॉलीसोममधून जाणाऱ्या संदेशवाही आरएनए (mRNA) न्यूक्लिएझ विकरांच्या (Nucleases enzyme) प्रक्रियेने नष्ट होण्यापासून संरक्षण करण्याचे कामही रायबोसोम चोखपणे पार पाडतात. रायबोसोममुळे नव्याने तयार झालेल्या प्रथिनांच्या साखळीचे/शृंखलेचे अपघटन (Lysis) करणाऱ्या विकरांपासून संरक्षण करणे साध्य होते. काही विषाणूंमध्ये डीएनएऐवजी आरएनएमुळे प्रथिने बनवली जातात. २००९ मध्ये भारतीय वंशाचे वेंकटरामन रामकृष्णन् (Venkatraman Ramakrishnan) यांना रायबोसोमची रचना आणि कार्य यांच्या शोधाबद्दल रसायन विज्ञानातील नोबेल पारितोषिक थॉमस स्टाइज् (Thomas A. Steitz) आणि अदा योनाथ (Ada E. Yonath) यांच्याबरोबर विभागून देण्यात आले.

पहा : अंतर्द्रव्य जालिका, जनुकीय संकेत, पेशीअंगके, प्रथिन संश्लेषण.

संदर्भ : 

                      समीक्षक : रंजन गर्गे