धूसर झालं नसतं गाव : साहित्य अकादमी नवी दिल्लीच्या युवा पुरस्काराने सन्मानित रवी कोरडे या कवीचा कवितासंग्रह. लोकवाङ्मय गृह प्रकाशन, मुंबई यांचेकडून २०१३ मध्ये तो प्रकाशित झाला. या संग्रहात एकूण ४९ कविता आहेत. कृषी जीवनाची झालेली पडझड या केंद्रवर्ती जाणीवेसह वर्तमानकाळातील ग्रामसंस्कृतीचे स्थित्यंतर, कृषक समाजाचा कारुण्याचा स्वर, रूपकाच्या माध्यमातून आलेले गाव, वारकरी असणाऱ्या शेतकरी बापाच्या अंतर्मनात सलणारी बोच, मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त अल्पभूधारक कोरडवाहू शेतकऱ्यांच्या जीवनाचे  संयत दर्शन, कवीचे बालपण, त्याच्या आजूबाजूचा भवताल, भवतालातली माणसं, शेत, शिवार, भूमी या सर्वांना युगानुयुगे लगडलेली माती अशी विविधांगी आशयसूत्रे या संग्रहातून येतात. ‘स्व’शोधनाचा पार ओलांडून ही कविता  सामान्य जनांची, समूहाची भाषा अभिव्यक्त करते.

गावाची झालेली पडझड, उघडं बोडखं पडलेलं गाव, ग्रामसंस्कृतीचा मोडून पडलेला सांगाडा तरीही काळया मातीशी इमान राखणाऱ्या आणि मातीशी घट्ट नाळ जोडून राहिलेल्या माणसांचे प्रतिनिधित्व ही कविता करते. समकालाला कवेत घेत अतिशय संयत भाषेत येणार हे चित्रण समकालाला व्यापून राहीलं आहे. कुठेही, कसलाही आक्रोश न करता संयमितपणे येणार स्वगत सर्वव्यापी आहे. पूर्वजांनी कफल्लक होत सोसलेल्या कृषक जीवनातील दुःखाचा आलेखही या कवितेत मांडलेला आहे.

या कवितेत काबाडकष्ट करणारे आई, वडील, आजी, चाचा यांची व्यक्तिचित्रे नातेसंबंधाच्या भावनांचा पट अलवार उलगडतात. वारकरी संप्रदायातील भक्ती परंपरेचे अनोखे रूपक या कवितेतून प्रत्ययास येते. जमीनच विठ्ठल आणि शेतकरी हाच त्या जमिनीचा वारकरी संबोधत हा अनुबंध या कवितांत मांडला आहे. या कवितेचे महत्त्वाचं वैशिष्ट्ये म्हणजे आपल्या अनुभवविश्वासोबत एकनिष्ठ राहणारी, सूक्ष्म चिंतनशीलतेची लय पकडलेली ही कविता रचनेची, रूपसौंदर्याची, काव्यभाषेची सखोल जाणीव घेऊन प्रकटते. पाण्याचं मडकं बांधलं कणसाला, तुझ्या शाळेतूनच बापा माझ्या शाळेचे वाट, दुभती गाय, कुणबी कुळातल्या जन्माची तहान, हरिपाठाच्या वहीने जड झालेला खिसा, मी पुरता परागंदा आणि धूसर झालं नसतं गाव ही कवितेची शीर्षके सुचक आणि अर्थपूर्ण आहेत. कवितांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमांचा वापर केला आहे.

निसर्गाशी सांधा जोडून राहणारी ही कविता निसर्गातील प्रतिक, प्रतिमांतून आपल्याशी संवाद साधते. या कवितेत पाऊस आपलं स्वतंत्र अस्तित्वरूप घेऊन प्रकटतो. या संग्रहातील कविता मातीशी घट्ट नाळ जोडलेली, निसर्गाशी एकरूप झालेली, निसर्गाशी संवाद साधणारी, निसर्ग मैत्रीच्या खाणाखुणांची दर्शन घडवणारी आहे. जागतिकीकरणामुळे जगण्याची बदललेली परिभाषा, गावकुसावर झालेले परिणाम, आधुनिक युगातील प्रगत तंत्रज्ञानामुळे शेतीमध्ये झालेले वारेमाप प्रयोग, केवळ नफेखोरीच्या उद्देशामुळे शेती संस्कृतीवर झालेल्या परिणामाबाबत ही कविता चिंता व्यक्त करते.  स्वतःच्या आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या विस्थापनाचे अनुभव मांडतांना समग्राला वेढून असणाऱ्या गावाचे ‘धूसर होणं ‘ ह्या सामाजिक, सांस्कृतिक स्थित्यंतराचे अधोरेखित ही कविता प्रतिपादित करते.

संदर्भ :

  • कोरडे रवी, धूसर झालं नसतं गाव, लोकवाङ्मय गृह प्रकाशन, मुंबई, २०१३.