पायरोक्सीन खनिज गटापैकी ऑर्थोपायरोक्सीन उपगटातील हे महत्त्वाचे खनिज असून प्रादेशिक रूपांतरण (Regional Metamorphism) प्रकारातील अति उच्च दाब व उष्णता (Very High Pressure and Temperature) यांच्या साहाय्याने पृथ्वीच्या खोल अंतर्भागात पुनःस्फटित (Recrystallized) झालेल्या ग्रॅन्युलाइट समजक (Granulite facies) गटातील चार्नोकाइट खडकांत ते फेल्स्पार, गारनेट व क्वार्ट्‌झ या खनिजांसह मुख्य खनिजरूपात असतात. हॉर्नब्लेंड या अँफिबोल गटातील खनिजापेक्षा हायपर्स्थीन याची कठिनता अधिक असल्याने ‘हायपर्स्थीन’ हा शब्द ग्रीक हायपर म्हणजे अधिक व स्थेनो म्हणजे सामर्थ्य या शब्दांपासून आला आहे.

त्याची स्फटिक प्रणाली समचतुर्भुजी (Orthorhombic) पायरोक्सीनच्या गटाशी संबंधित आहे. ही खनिजे MgSiO3 – FeSiO3  CaSiO3 या त्रि-अंगी समूहाच्या प्रावस्था (ठराविक दाब व तापमानास तयार झालेली आणि हे तिन्ही घटक विशिष्ट प्रमाणात असलेली खनिजे) दर्शवितात. त्याचे स्थूल रासायनिक संघटन (Mg,Fe)2 Si2O6 असे आहे. हायपर्स्थीनमध्ये Ca चे प्रमाण हे ५० टक्क्यांपेक्षा कमी व Fe चे प्रमाण १३ टक्क्यांहून अधिक असते. हे खनिज एन्स्टाटाइट आणि फेरोसिलाइट यांच्या ‘सांद्र विलयन मालिकेच्या’ (Solid solution series) दरम्यान असलेले मध्यम सदस्य आहे (50% Fe व 50% Mg). हे खनिज सामान्यत: नोराइट, ट्रॅकाइट आणि अँडेसाइट या अग्निज खडकांत आवश्यक खनिज घटक म्हणून आढळतात. हे चार्नोकाइट या रूपांतरित खडकांत महत्त्वाचे खनिज असून काही अवकाशीय उल्कांमध्येही त्यांचे अंश मिळालेले आहेत. 

मॅग्मा थंड होतानाच्या स्फटिकी मालिकाप्रक्रियेत ऑलिव्हीन या प्रथम तयार होणार्‍या खनिजानंतर हायपर्स्थीन हे तयार होणारे दुसऱ्या क्रमांकाचे खनिज आहे. त्यामुळे हायपर्स्थीनचे मोठ्या आकारातील विकसित स्फटिक (क्रिस्टल्स) फारच क्वचित ठिकाणी आढळतात. त्याऐवजी सामान्यत: खडबडीत, ओबडधोबड आकाराच्या कणांच्या रूपात पदरित (lamellar) किंवा तंतुमयपर्णित समूहात (foliated masses) हे खनिज आढळते. ह्याच्या स्फटिकांचा रंग बहुधा हिरवा, राखाडी किंवा तपकिरी असतो. चमक सामान्यतः मोत्यासारखी किंवा विशिष्ट पृष्ठभागावर तांब्याच्या धातूसारखी लाल रंग (किंवा स्केलर) प्रदर्शित करण्यासारखी ओळखली जाते. याचे चमकदार स्फटिक हे रत्न म्हणून वापरतात.

ह्याचे विपत्रण – प्रिझमी, उत्कृष्ट, {110}, विपत्रणपृष्ठाची चमक काशासारखी आणि भंजन – ओबड-धोबड, असमान असते. कस – हिरवट पांढरा असतो. काठिण्य – ५ ते ६,  रेखा – राखाडी, हिरवट पांढरी. वि. गु. – २.५६ आहे. सूक्ष्मदर्शकातून  ध्रुवित प्रकाशात (Polarized light) दिसणारी याची गुलाबी व हिरवट रंगांतील बहुवर्णता ही वैशिष्ट्यपूर्ण आहे.

नैसर्गिक आढळ व उपयोग : अति उच्च दाब व उष्णता असलेल्या पृथ्वीच्या पातालिय अंतर्भागात गिरीजनन प्रक्रिये अंतर्गत ही खनिजे तयार होत असावीत असे भूवैज्ञानिकांचे मत आहे. काहींच्या मते पातालिय अग्निज स्फटिकीकरण प्रक्रियेतही हे खनिज तयार होऊ शकते. तामिळनाडू राज्यात व पूर्व किनारपट्टितील डोंगर रांगातून असलेल्या चार्नोकाइट मालाच्या खडकांतून ते प्रामुख्याने सामान्य खनिज घटक रूपात आढळतात. तसेच छोटा नागपूर, झारखंड येथील डाल्टनगंजच्या जवळ, पट्टीत ग्रॅनाइट (Granite gneisses) खडकांत तसेच मध्य प्रदेशात, मध्य भारतीय विवर्तनी विभाग (Central India tectonic zone) मधील उच्च-दर्जाच्या रूपांतरित ग्रॅन्युलाइट खडकांमध्येही ते आढळतात. हायपर्स्थीनची चांगली कठिणता व धातु चमक असल्याने यांच्या स्फटिकांचा दागदागिन्यातील शोभिवंत खडे म्हणून तसेच शिल्पकारी आणि सजावटींसाठी उपयोग केला जातो. अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या अ‍ॅडिरोंडॅक पर्वत, तसेच कॅनडाच्या लॅब्राडोर आणि क्यूबेकमध्ये हायपर्स्थीन रत्नांचे साठे आढळतात.

समीक्षक : श्रीनिवास वडगबाळकर