लॉरेन्झ, कॉनरॅड झाकारियास : (७ नोव्हेंबर १९०३ — २७ फेब्रुवारी १९८९). कॉनरॅड झाकारियास लॉरेन्झ यांचा जन्म व्हिएन्ना या ऑस्ट्रियाच्या राजधानीत झाला. बालपणापासून त्यांना प्राण्यांची फार आवड होती. त्यांचे घर आणि आवार प्रशस्त होते. ते भटकंती करून मासे, पक्षी, माकडे, कुत्रे, मांजरे, ससे असे नाना प्रकारचे प्राणी पकडत आणि पाळत असत. जवळच्या प्राणिसंग्रहालयात जाऊन तेथील आजारी प्राण्यांची देखभाल करण्यात कर्मचाऱ्यांना मदत करत असत. या छांदिष्टपणाला त्यांच्या आईवडिलांनी कधीच आडकाठी केली नाही. परिणामी त्यांनी जंगली बदके आणि यूरोपमधील जॅकडॉ (Corvus monedula) या कावळ्याच्या कुळातील एका पक्ष्याचा अभ्यास लहानपणीच सुरू केला. एवढेच नाही तर या निरीक्षणांच्या दैनंदिनीत नोंदीही केल्या. वयाच्या दहाव्या वर्षी चौफेर वाचनामुळे त्यांची जीवावशेष आणि उत्क्रांती सिद्धांताशी ओळख झाली.
त्यांचे वडील अस्थिरोगतज्ज्ञ आणि त्याचे शल्यविशारद होते. त्यांच्या आग्रहाखातर कॉनरॅड यांनी न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात, वैद्यक अभ्यासक्रमाला सुरुवात केली. परंतु दोन सत्रांनंतर काही कारणाने व्हिएन्नामध्ये पुन्हा येऊन वैद्यकीय पदवी मिळविली. त्यामुळे ते डॉक्टर ऑफ मेडिसीन (एम. डी.) झाले. त्यांनी काही काळ इन्स्टिट्यूट ऑफ ॲनाटॉमीमध्ये शरीररचनाशास्त्राचा साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. आवड म्हणून जोडीला प्राणिशास्त्राचा अभ्यास करून त्यांनी व्हिएन्ना विद्यापीठातून पीएचडी मिळवली.
वैद्यक विद्यार्थीदशेत लिहिलेल्या पक्षी निरीक्षणाच्या त्यांच्या तपशीलवार नोंदी जर्नल फॉर ऑर्निथॉलॉजी या प्रतिष्ठित नियतकालिकात प्रकाशित झाल्या. त्यामुळे त्यांना पक्ष्यांच्या वसाहती पाळून त्यांच्या वर्तणूकीचा अभ्यास करण्यास उत्तेजन मिळाले. या अभ्यासावर आधारित संशोधन निबंधांतून त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली.
लॉरेन्झ प्राणी,पक्षी आणि वर्तनशास्त्र या ज्ञानशाखांचे अभ्यासक होते. ते आधुनिक प्राणिवर्तन विज्ञानाचे (इथॉलॉजी – ethology) जनक मानले जातात. या विज्ञान शाखेत प्राण्यांच्या वर्तनाचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. लॉरेन्झ यांना संशोधनातून विविध प्राण्यांच्या वागणुकीत काही निश्चित आकृतीबंध आढळले. त्या आकृतीबंधांच्या अभ्यासाने संबंधित प्राण्यांच्या उत्क्रांतीवर प्रकाश पडू शकतो हे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्या पूर्वजांचे अन्य प्राणिगटांशी किती निकटसंबंध होते हे देखील अशा आकृतीबंधांतून कळते हे उमगले. प्राण्यांमधील आक्रमकतेचे मूळ कशात आहे याचाही (aggression) त्यांनी अभ्यास केला आणि त्यावर On aggression नावाचा उत्तम ग्रंथही लिहिला. त्यात प्राण्यांच्या आक्रमक सहजप्रवृत्तीचा फार मोठ्या संख्येने प्राणी एकाच भूप्रदेशात एकवटू नयेत यासाठी फायदा होतो असे मत त्यांनी मांडले. असा अभ्यास मानवी वागणूक बदलण्यास फायदेशीर ठरू शकेल असे त्यांना वाटे. माणसाच्या आक्रमक सहजप्रवृत्तीमुळे युद्धे होऊ शकतात. ही पातळी गाठण्यापूर्वी केवळ योग्य शाब्दिक पवित्रे घेऊन वाटाघाटीने प्रश्न सुटू शकतात अशी भूमिका लॉरेन्झ मांडत असत.
लॉरेन्झ यांनी नुकत्याच अंड्याबाहेर पडलेल्या बदक पिल्लांच्या शेजारी बसून मादी बदक जसे आवाज करते तसे आवाज काढले. भ्रूणावस्थेत असे आवाज काढणारा प्राणी आपली आई असे त्या पिल्लांच्या मेंदूमध्ये ठसले जाते. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर पिले मातेच्या मागोमाग जातात. सहा फूट उंचीचा, धिप्पाड लॉरेन्झ ‘क्वॅक, क्वॅक ss क्वॅक’ आवाज, सुरुवातीला उकिडवा बसून सरकत आणि नंतर उभा राहून चालताना काढे. त्यांच्या आवाजाच्या दिशेने बदक पिल्लांची रांग चालत जाई.
प्राण्यांतील सहजात संस्करण (इम्प्रिंटिंग, imprinting) या संकल्पनेचा अभ्यास केल्याबद्दल लॉरेन्झ यांना निकोलास टिन्बरजेन [Nikolaas Tinbergen] आणि कार्ल वॉन फ्रीश [Karl von Frisch जर्मन उच्चार ] या शास्त्रज्ञांबरोबर 1973 सालाचे शारीरक्रियाशास्त्र वा वैद्यक विषयाचे नोबेल पारितोषिक विभागून दिले गेले.
लॉरेन्झ यांच्या मते अशी वर्तणूक त्या प्राणीजातीचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी उपयोगी असते. मादी बदक पाठोपाठ येणाऱ्या पिल्लांना खाद्य शोधणे व शिकारी पक्ष्यापासून संरक्षण कसे करायचे याचे शिक्षण देते.
प्राण्यांच्या – सहजप्रवृत्त आणि बिंबवण्याचे संस्कार झाल्यावरच्या – वर्तणुकीचा लॉरेन्झ यांचा गाढा अभ्यास होता. तो लक्षात घेऊन त्यांची व्हिएन्ना विद्यापीठात तुलनात्मक शरीररचना आणि प्राणी मानसशास्त्राचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली. दुस-या महायुध्दामध्ये ते जर्मन सैन्यात डॉक्टर म्हणून काम करत असताना त्यांना रशियात अटक झाली. युद्धकैदी म्हणून काही काल व्यतीत केल्यानंतर पुन्हा ते ऑस्ट्रियात परतले. सुदैवाने शेवटची काही वर्षे त्यांना आपल्या आवडत्या प्राण्यांच्या संगतीत, पुस्तके वाचणे, लिहिणे यात घालविता आली.
लॉरेन्झ ऑस्ट्रियातील अल्टेनबर्ग येथे मूत्रपिंडाच्या विकारामुळे मृत्यूमुखी पडले.
संदर्भ :
- https://www.nobelprize.org/prizes/medicine/1973/lorenz/biographical/
- https://www.simplypsychology.org/Konrad-Lorenz.html
- https://www.britannica.com/biography/Konrad-Lorenz
- https://www.nobelprize.org/prizes/medicine/1973/lorenz/lecture/
- https://www.marxists.org/reference/subject/philosophy/works/ge/lorenz.htm
समीक्षक : मोहन मद्वाण्णा