मेयर, अर्न्स्ट वॉल्टर :   (५ जुलै १९०४ —३ फेब्रुवारी २००५).

अर्न्स्ट वॉल्टर मेयर यांचा जन्म जर्मनीतील केम्प्टेन शहरात झाला. त्यांचे वडील न्यायाधीश होते. वडलांना निसर्ग विज्ञान आणि  पक्षिशास्त्राची आवड होती.  सुटीच्या दिवशी ते आपल्या दोन्ही मुलाना निसर्गसहलींना नेत असत. त्यातून  वुर्झ्बर्गमधील सर्व स्थानिक पक्ष्यांची ओळख त्यांचे मोठे भाऊ ऑटो यांनी करून दिली. ड्रेस्डेन येथे त्यांचे हायस्कूल शिक्षण झाले.

पक्षिविज्ञानातील त्यांचे पहिले गुरू रुडॉल्फ झिमरमान यांनी त्यांना पक्षिविज्ञानाची गोडी लावली. त्यांच्या पक्षिनिरीक्षणातील व पक्ष्यांच्या अभ्यासावर खूष होऊन त्यांना पक्षी संग्रहालयात स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

ग्रीफ्सवाल्ड युनिव्हर्सिटीत त्यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला. पण एकाच वर्षात त्यांनी आपली शाखा जीवविज्ञानाकडे  बदलून घेतली. पक्षिविज्ञानाचा अभ्यास करताना पक्षी निरीक्षकाबरोबर जाण्याची संधी त्यांना वारंवार मिळत गेली. बर्लिन म्यूझीयममध्ये केवळ सोळा महिन्यात त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळवली तर त्यांना कामाची संधी मिळेल असे सांगितल्यावर डॉक्टर कार्ल झिमर (Carl Zimmer) यांच्याकडे खरेच त्यांनी सोळा महिन्यात डॉक्टरेट पूर्ण केली. केवळ वयाच्या एकविसाव्या वर्षी ते बर्लिन म्यूझीयममध्ये रुजू झाले.

ऑस्ट्रेलिया आणि मलेशियामध्ये वसलेल्या न्यू गिनी व सॉलोमन बेटांच्या समूहावर जाण्याच्या पक्षी निरीक्षण मोहिमेत ते सहभागी झाले. विविध प्राणिजाती भौगोलिक दृष्ट्या कशा विखुरलेल्या असू शकतात याचा अनुभव त्यांना तेथे आला. मुख्यतः पक्ष्यांचे, हजारो जीवावशेष त्यांनी जमवून बरोबर आणले. या सामुग्रीचा अभ्यास करून अनेक नव्या पक्षिजातींचे तसेच  जमवलेल्या ऑर्किड वनस्पतींपैकी अडोतीस जातींचे नामकरण त्यांनी केले. पक्षिवर्गीकरणावर त्यांचे  शंभर शोधनिबंध दर्जेदार वैज्ञानिक नियतकालिकांत प्रकाशित केले. या अभ्यासाचे संकलन करून Birds of the Southwest Pacific हा ग्रंथ प्रकाशित झाला.

जगातील आतापर्यंतच्या शंभर सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञांमध्ये त्यांची गणना होते. ते प्रतिष्ठित हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापकपदी रुजू झाले आणि तेथूनच सेवानिवृत्त झाले. निवृत्त झाले तेव्हा त्यांना ‘अलेक्झांडर अग्गासिझ तुलनात्मक प्राणिशास्त्राचे’ मानद प्राध्यापक हार्वर्ड विद्यापीठ, अशी  उपाधी देण्यात आली. आपल्या प्रदीर्घ अनुभवावर आधारित The Growth of Biological Thought हा ग्रंथ त्यानी सेवानिवृत्त झाल्यानंतर सात वर्षांनी, संगणकाची मदत न घेता स्वतःच्या हाताने लिहून काढला. या पुस्तकात त्यांनी जीवशास्त्राचा इतिहास, त्यातील समस्या आणि संकल्पना यांचा परामर्श घेतला आहे. त्यांनी दोन कीटकशास्त्रज्ञ सहलेखकांबरोबर Methods and Principles of Systemic Zoology  हे पुस्तक लिहिले. त्यात त्यांनी प्राणी वर्गीकरणशास्त्र आणि प्राण्यांच्या प्रजाती, जाती, उपजाती, प्राणिजातींचे नामकरण, उद्भव यांबद्दल मार्गदर्शन केले आहे. Animal Species and Evolution या त्यांच्या पुस्तकात, त्यांनी जीवशास्त्राच्या दृष्टीने प्राणिजाती म्हणजे काय आणि उत्क्रांतीत ‘प्राणिजातीं’ची भूमिका कोणती याचे विवेचन केले आहे. मेयर यांनी लिखाण करताना त्यांचे त्या काळातील जीवरसायन,   शरीरक्रियाशास्त्र , आनुवंशिकताशास्त्र इ. अन्य संबंधित शास्त्रांचे अद्ययावत ज्ञान वापरले.  संदिग्धता वा वाद असणार्‍या मुद्यांवर त्यांनी  सविस्तर विवेचन केले आहे.  जीवशास्त्रीय जाती संकल्पना, जातींचे भौगोलिक वा अन्य कारणांनी विलगीकरण, नाव जातींचा उद्भव, उपजाती, त्यांतील फरक, फरक होण्याची कारणे, जातीसंकर अशा नाना बाबींना स्पर्श केला.

What Evolution Is या त्यांच्या पुस्तकात, तीन प्रकारच्या वाचकांचा परामर्श त्यांनी घेतला आहे. डार्विन-समर्थक परंतु अधिक पुरावे शोधणारा एक वाचकगट होता. उत्क्रांती झाली पण डार्विन यांचे प्रतिपादन पूर्णतः योग्य नाही असे मानणारा दुसरा गट होता. दैवी निर्मितीवर श्रद्धा ठेवणारे पण शत्रूपक्षाचे म्हणणे ऐकून घेण्याची तयारी असणारे वाचक तिसऱ्या गटात होते.

विज्ञानप्रसारासाठी पुस्तके लिहिण्याखेरीज त्यांनी प्रामुख्याने पक्षिशास्त्र, वर्गीकरणशास्त्र, भौगोलिक प्राणिविज्ञान, उत्क्रांतिशास्त्र या ज्ञानशाखांमध्येही संशोधन केले. सजीवांच्या ‘जाती’ या मूलभूत संकल्पनेबद्दल जगभरच्या जीवशास्त्रज्ञांमध्ये सुस्पष्टता आणि एकवाक्यता यावी यासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली. त्यांना ‘जाती संकल्पनेबद्दल एकवाक्यता यावी म्हणून किती प्रयत्न करावे लागले असतील हे समजायला एक  उदाहरण उपयोगी पडेल. ते म्हणजे – ‘जातीच्या थोडेफार फरक असणाऱ्या निदान २६ संकल्पना आहेत. यात भर म्हणजे लैंगिक पुनरुत्पादन होणाऱ्या पक्ष्यांसारख्या सजीवांतील जाती संकल्पना जीवाणूंसारख्या अलैंगिक पुनरुत्पादन करणाऱ्या जीवांना लागू पडत नाहीत.

जीवशास्त्रातील सर्वात प्रतिष्ठित मानले जाणारे तीनही पुरस्कार अर्न्स्टना मिळाले आहेत. त्यापैकी पहिला आहे – मानव्य क्षेत्रात, नैसर्गिक विज्ञानात, सांस्कृतिक क्षेत्रात अद्वितीय काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा इंटरनॅशनल बाल्झन पुरस्कार. दुसरा पुरस्कार इंटरनॅशनल प्राईझ फॉर बायॉलॉजी, जो जीवशास्त्रात उत्कृष्ट मूलभूत संशोधनासाठी प्रदान करण्यात येतो. त्यांना गौरवणारा तिसरा पुरस्कार म्हणजे रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसने बहाल केलेला क्राफूर्ड पुरस्कार.

मेयर यांच्यामुळे घडलेली सर्वात महत्वाची घटना म्हणजे मेंडेल आणि डार्विन यांचे काम एकत्रित विचारात घेतले गेले. या दोन जीवशास्त्रज्ञांचे विचार एकमेकांना किती पूरक आहेत हे त्यांच्या लक्षात आले. त्या दोन विचारधारांचा समन्वय  करून उत्क्रांतीची एक एकात्मिक उपपत्ती त्यांनी मांडली. ही एकात्मिक उपपत्ती मूर्त रूपात आणण्यासाठी  थिओडोसियस डॉबझान्स्की (Theodosius Dobzhansky), रोनाल्ड फिशर (Ronald  A. Fisher), जेबीएस हाल्डेन (J.B.S.Haldane) अशा अनेक जीवशास्त्रज्ञ, गणितज्ञ, रसायनशास्त्रज्ञांचा त्यात समावेश होता.

अल्पशा आजारानंतर वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांचे निधन झाले .

संदर्भ: 

समीक्षक : मोहन मद्वाण्णा