ओपेनहायमर, जूलियस रॉबर्ट : (२२ एप्रिल १९०४ – १८ फेब्रुवारी १९६७). दुसऱ्या महायुद्धात वापरल्या गेलेल्या अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी एक. ज्यू वंशाचे अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. आण्विक शस्त्रास्त्रे विकसित करण्याचे उद्दिष्ट असलेल्या मॅनहटन प्रकल्पाचे ते प्रमुख होते. विज्ञानाचे शिक्षक आणि प्रवर्तक असलेल्या ओपेनहायमर ह्यांनी सैद्धांतिक भौतिकशास्त्राच्या संशोधनाला चालना दिली.

ओपेनहायमर ह्यांचे शालेय शिक्षण न्यूयॉर्क ह्या त्यांच्या जन्मगावी झाले. ओपेनहायमर ह्यांना इंग्रजी साहित्य आणि खनिजशास्त्रामध्ये विशेष रस होता. शाळेच्या शेवटच्या वर्षांत ओपेनहायमर ह्यांना रसायनशास्त्रांत विशेष गोडी निर्माण झाली. हॉर्वर्ड विद्यापीठांतून रसायनशास्त्र व भौतिकशास्त्राची पदवी संपादन करून पुढील शिक्षणासाठी ओपेनहायमर यूरोपला गेले.

केंब्रिज येथे रदरफोर्ड ह्यांच्याबरोबर तर गटिंगेन येथे मॅक्स बॉर्न ह्यांच्याबरोबर काम करण्याची संधी त्यांना लाभली. त्यांनी मॅक्स बॉर्न ह्यांच्या मार्गदर्शनाखाली गटिंगेेेन विद्यापीठाची पीएच्.डी. ही पदवी संपादन केली. ह्या दरम्यान ओपेनहायमर ह्यांचे सुमारे डझनभर शोधनिबंध प्रसिद्ध झाले. बॉर्न-ओपेनहायमर अ‍ॅप्रॉक्झिमेशन हा त्यापैकीच एक.

ओपेनहायमर ह्यांना कॅलटेक व हॉर्वर्ड विद्यापीठांत संशोधनासाठी युनायटेड स्टेट्स नॅशनल रिसर्च शिष्यवृत्ती मिळाली. एक वर्षातच ते लायडन विद्यापीठात व्याख्याने देण्यासाठी गेले आणि त्यानंतर त्यांनी स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे पाऊली ह्यांचेबरोबर पुंजगतिकी आणि अखंड वर्णपंक्ती ह्यावर संशोधन केले. नंतर ते कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून रुजु झाले. बर्कलेमधील आपल्या या कार्यकाळांत त्यांनी भौतिकशात्रज्ञांची एक पिढी घडविली.

विश्वकिरण, सैद्धांतिक खगोलशात्र, केंद्रकीय भौतिकी, पुंज विद्युतगतिकी, पुंज क्षेत्रीय सिद्धांत, वर्णपंक्तिदर्शन इत्यादी शाखांमधे ओपेनहायमर ह्यांनी संशोधन केले.

आपल्या संशोधन निबंधांतून ओपेनहायमर यांनी वर्तविलेले अनेक अंदाज पुढे खरे ठरले.  न्यूट्रॉन, मेसॉन व न्यूट्रॉन तारा हे त्यापैकीच. खगोलशास्त्राच्या आपल्या संशोधनांतून त्यांनी न्यूट्रॉन ताऱ्याच्या वस्तुमानाला कमाल मर्यादा असते हे दाखवले. गुरुत्वाकर्षणावरील आपल्या शोधनिबंधातून त्यांनी कृष्णविवराच्या अस्तित्वाचा अंदाज वर्तवला होता.

त्यांनी मांडलेल्या बॉर्न-ओपेनहायमर अ‍ॅप्रॉक्झिमेशन ह्या शोधनिबंधात रेणूंमध्ये असलेल्या अणूची केंद्रके आणि इलेक्ट्रॉन ह्यांच्या गतीचा स्वतंत्रपणे विचार करावा, असे ओपेनहायमर यांनी मांडले. ह्याचा उपयोग पुंज भौतिकीमध्ये इलेक्ट्रॉनच्या स्थितीसापेक्ष आणि अणू केंद्रकांच्या स्थितीसापेक्ष रेणूंचे तरंगफल (molecular wave-function) काढण्यासाठी होतो.

मॅनहटन प्रकल्पात सहभागी होण्यासठी त्यांना निमंत्रित करण्यात आले. ह्या प्रकल्पातील त्यांचे योगदान मोलाचे ठरले. दुसऱ्या महायुध्दादरम्यान लॉस अ‍ॅलमॉस प्रयोगशाळेचे ते संचालक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांनी पहिल्या अणुबॉम्बची योजना तयार केली आणि १६ जुलै १९४५ रोजी ॲलामोगोर्डो, न्यू मेक्सिको येथे त्याची यशस्वी चाचणीही घेतली.

ओपेनहायमर संस्कृत भाषा शिकले आणि त्यांनी संस्कृत भाषेतून लिहिलेल्या भगवत गीतेचे वाचनही केले होते. अणुबॉम्बच्या यशस्वी चाचणीचे वर्णन त्यांनी गीतेमधल्या पुढील श्लोकाने केलं होतं :

दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता |

यदि भा: सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मन: ||

जनरल अ‍ॅडव्हाझरी कमिटी ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी कमिशनच्या प्रमुखपदी ओपेनहायमर बिनविरोध निवडून आले. ह्याच दरम्यान त्यांनी इन्स्टिट्यूट फॉर अ‍ॅडव्हान्स स्टडी, प्रिन्सटन ह्या संस्थेच्या संचालकपदाची सुत्रेही स्वीकारली.

दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बमुळे झालेल्या संहाराने उद्विग्न होउन त्यांनी हायड्रोजन बॉम्ब बनविण्यास विरोध केला. ह्या विरोधामुळे अ‍ॅटॉमिक एनर्जी कमिशनच्या संचालक पदावरून त्यांना बडतर्फ करण्यात आले. त्यांना देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्नही झाला. पण चौकशीनंतर ओपेनहायमर ह्यांना निर्दोष ठरविण्यात आले.

शिक्षक व संशोधक ह्या दुहेरी भुमिकेतून भौतिकशास्त्राला त्यांनी दिलेले योगदान, लॉस अ‍ॅलमॉस येथील प्रयोगशाळा आणि अणुबॉम्ब विकसनाच्या प्रकल्पाचे त्यांनी केलेले प्रभावी नेतृत्व ह्यासाठी अमेरिकन सरकारने ओपेनहायमर ह्यांना एन्‍रीको फेर्मी पुरस्काराने सन्मानित केले.

शास्त्रीय संशोधनांचा अयोग्य वापर मानवी समाजाची फार मोठी हानी करू शकतो, ह्या जाणीवेतून आयुष्याच्या उत्तरार्धात ओपेनहायमर ह्यांनी ॲल्बर्ट आइन्स्टाइन, बर्ट्रंड रसेल आणि इतर नामवंतांसमवेत वर्ल्ड अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट्स अ‍ॅन्ड सायन्सेस या संस्थेची स्थापना केली.

आपल्या कारकीर्दीत ओपेनहायमर ह्यांना अनेक मान सन्मान मिळाले. त्यात मेडल ऑफ मेरिट, फ्रेंच सरकारचा लिजन ऑफ ऑनर हा लष्कराचा सर्वोच्च किताब, रॉयल सोसायटी, लंडनचे परदेशी सदस्य हे सन्मान आहेत. त्यांच्या सन्मानार्थ एका लघुग्रहाला ‘६७०८५-ओपेनहायमर’ हे नाव देण्यात आले आहे; तर चंद्रावरील एक विवरही ओपेनहायमर ह्यांच्या नावाने ओळखले जाते.

ओपेनहायमर यांचे प्रिन्सटन येथे घशाच्या कर्करोगाने निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : हेमंत लागवणकर