पाल, बेंजामिन पिअरी : (२६ मे १९०६ — १४ सप्टेंबर १९८९). बेंजामिन पिअरी पाल यांचा जन्म पंजाबमधील मुकुंदपूर येथे झाला. त्यांनी रंगून (त्यावेळचे ब्रम्हदेश) विद्यापीठाची बी.एस्‌सी. (ऑनर्स) पदवी व एम्‌.एस्‌सी.वनस्पतिशास्त्र (ऑनर्स) पदवी संपादन केली. पदव्युत्तर शिक्षणानंतर नंतर ते अमेरिकेतील केंब्रिज विद्यापीठात रोलँड बिफेन व फ्रँक एंगलडो या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गव्हावरील संशोधन करण्यासाठी गेले. येथे गव्हाच्या वाणावर संशोधन करत असताना त्यांनी हे दाखवून दिले की गव्हासारख्या स्व-परागी पिकात संकरित जोमचा सामुपयोग करणे शक्य आहे. त्यांनी  केलेल्या गव्हावरील संशोधन कामावर वनस्पती अनुवांशिक आणि कृषी या विषयातील पीएच्‌.डी पदवी त्यांना प्रदान करण्यात आली.

ते ब्रह्मदेशातील  म्हावबी येथील सेंट्रल राइस रिसर्च स्टेशन या संस्थेत साहाय्यक भात संशोधक अधिकारी म्हणून रुजू झाले. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये  भारतात  बिहारमधील पुसा येथील इम्पिरिअल ॲग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट (सध्याचे इंडियन ॲग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट ) या संशोधन संस्थेत  ते आर्थिक वनस्पतिवैज्ञानिक या हुद्यावर रुजू झाले. ही संस्था पुढे नवी दिल्ली येथे हलविण्यात आली आणि १९४७मध्ये तिचे नाव भारतीय कृषी संशोधन संस्था (आयएआरआय) असे ठेवले गेले. पाल ह्याच संस्थेतील एम्पेरिअल आर्थिक वनस्पतिविज्ञान व वनस्पतिविज्ञान विभागाचे प्रमुख बनले. पुढे संस्थेच्या संचालक पदावर त्यांची निवड झाली. या पदावर नियुक्त होणारे ते पाहिले भारतीय होते. या हुद्यावर १५वर्षे काम केल्यानंतर पाल यांची इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च (आयसीएआर) या संस्थेचे पहिले महासंचालक म्हणून नेमणूक झाली. या पदावरून ते सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते याच संस्थेत एमेरिटस् सायंटिस्ट या नात्याने संशोधकांना मार्गदर्शन करीत असत.

पाल यांनी आनुवंशिकी आणि वनस्पतींचे प्रजनन या विषयांवर उपयुक्त संशोधन केले. त्यांनी गव्हासंबंधी विशेष संशोधन करून तांबेरा या अतिशय उपद्रवकारक रोगाला प्रतिकार करणाऱ्या गव्हाच्या वाणाचे अधिक उत्पादन देणाऱ्या दाणेदार गव्हाच्या वाणाशी संकर घडवून अधिक उत्पादन देणाऱ्या दाणेदार गव्हाच्या व रोगांना न जुमानणाऱ्या एनपी गव्हाच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पुसा मालिका प्रजातीची निर्मिती केली. त्यांतील एन.पी. ७१०, ७१८, ७६१, ७७०, ७९९ व ८०९ ह्या जाती भारतीय शेतकऱ्यांमध्ये अधिक लोकप्रिय झाल्या. तांबेरा या रोगाच्या तिन्ही प्रकारच्या उपद्रवांना न जुमानणारा व अधिक प्रमाणात उत्पादन देणारा एन.पी ८०९ हा गव्हाचा सुप्रसिद्ध वाण पाल यांनी निर्मिला. एनपी ८०९ खोड पान आणि पट्टे निर्माण करणाऱ्या ताम्बेराचा एकाच वेळी प्रतिकार करू शकणारे जगातील पहिले वाण आहे.

पाल यांनी जपानमध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय आनुवंशिकी परिसंवादात आपले गव्हावरचे संशोधन सादर केले. रोगांच्या प्रतिकारक्षमतेच्या बाबतीत संकरित गव्हाच्या प्रत्येक प्रकारात जनुकांचे आनुवंशिक लक्षणे निर्देशित करणाऱ्या गुणसूत्रावरील जनुकांचे दोन गट असतात. एका गटाची जनुके रोगाच्या जंतूंशी सरळ सामना करतात, तर दुसऱ्या गटातील जनुके रोगप्रतिकारक क्रियांचे अंतर्निरोधन करतात. गव्हाच्या कोणत्या प्रकारात जनुकांच्या कोणत्या गटाचे आधिक्य आहे ह्यावरच त्या संकरित गव्हाच्या प्रकाराची रोगप्रतिकारक्षमता अवलंबून असते. असा विचार त्यांनी या परिसंवादात प्रविष्ट केला. संकरित वाणाचा  मक्यासारख्या पर परागण पिकाच्या बाबतीतच उपयोग  सामुपयोग करता येतो असे नव्हे, तर गव्हासारख्या स्वपरागित वनस्पतींच्या बाबतीतही संकरीत वाण उपयोगी पडेल  सामुपयोग करता येतो,  असा सिद्धांत पाल यांनी त्या परिसंवादात मांडला. त्याच्या निष्कर्षांमुळे तांदूळ आणि गहू यासारख्या स्वयं-परागित धान्यांमधील संकरित जोमाचा व्यावसायिक संशोधनात पूर्ण वापर करून घेण्यास चालना मिळाली. तांबेरा रोग पसरलेला असतानासुद्धा त्यांच्या वाणाचे उत्पादन वाढले होते. या संशोधनाने प्रभावित होऊन लंडनच्या रॉयल सोसायटीने पाल यांना संसथेचे सदस्यत्त्व  देऊन त्यांचा सन्मान केला.

त्यांनी बटाटा व तंबाखूसारख्या विविध पिकांत आढळून येणाऱ्या संकरित वाणासंबंधी  संशोधन केले. भारतात जनुक-संपत्ती शोधून तिचा संग्रह आणि रक्षण करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या संघटनेने भारतातील ४०,०००च्या वर उपयुक्त वनस्पतींचे प्रकार प्रचारात आणले.

खाद्य वनस्पतींशिवाय पाल यांनी गुलाबाच्या अनेकविध जाती संकरक्रियेने विकसित केल्या. त्यापैकी, द पंजाब बेल, डॉ. होमी भाभा (पांढरा’, दिल्ली प्रिन्सेस आणि बंजारन(लाल) हे गुलाबाचे उल्लेखनीय प्रकार अतिशय लोकप्रिय झाले आहेत. त्यांचे पुस्तक द ब्युटिफुल क्लाइंबर्स ऑफ इंडिया हे १९६० मध्ये तर द रोझ इन इंडिया; हे गुलाबावरील पुस्तक प्रकाशित झाले. त्यांची व्हीट, कॅरोफायटा’, ‘फ्लॉवरिंग श्रबसबुगनविलियाज ही पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. ह्या पुस्तकांशिवाय त्यांचे १६०च्या वर संशोधनात्मक व माहितीपूर्ण लेख शास्त्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत.

पाल यांना कृषि क्षेत्रातील अनेक  पारितोषिके, सन्मानचिन्हे आणि सन्माननीय पदव्या मिळाल्या. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी भारत शासनाने  पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण हे नागरी सन्मान दिले. अनेक भारतीय शासकीय, शैक्षणिक व शास्त्रीय समित्यांचे ते सभासद होते . केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शास्त्रीय सल्लागार समितीचे ते प्रथमपासून सभासद होते.

पाल यांनी संशोधित केलेल्या गव्हाच्या अनेक प्रजातींमुळे गहू उत्पादनात क्रांती झाली. त्यांनी शोधून काढलेल्या गव्हाच्या अनेक वाणांमुळे भारतात गव्हाचे उत्पादन वाढले. राष्ट्रीय कृषी विज्ञान अकादमीने कृषी विज्ञानातील उत्कृष्ट संशोधनास चालना देण्यासाठी सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच डॉ. बी.पी. पाल स्मृती पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार स्थापन केला आहे. त्यांचा गौरव करण्यासाठी पोस्टाचे तिकीट काढण्यात आले.

संदर्भ:

 

समीक्षक: मोहन मद्वाण्णा