सुब्बा राव, आय. व्ही. : (२० डिसेंबर १९३४ – १४ ऑगस्ट २०१०). भारतीय मृदाशास्त्रज्ञ व कृषिशास्त्रज्ञ. त्यांचे संपूर्ण नाव इदुपुगांती वेंकट सुब्बा राव असे आहे.

सुब्बा राव यांचा जन्म पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील तनुकु शहराजवळील पलासपुडी या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी आंध्र विद्यापीठातून कृषिशास्त्र विषयात एम. एस्‌सी. पदवी व नवी दिल्ली येथील इंडियन इन्स्ट‍िट्यूट ऑफ ॲग्रिकल्चरमधून (आयआयए) पीएच.डी. प्राप्त केली. तेथेच त्यांनी प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिक दर्शक (डेमॉन्सट्रेटर) या सर्वांत कनिष्ठ पदावर काम करायला सुरुवात केली. तसेच त्यांनी तेथे संशोधन विभागाचे संचालक व विद्यापीठाचे कुलगुरूपदही भूषविले.

सुब्बा राव यांचे वनस्पतींच्या पोषणासंबंधीचे मुख्यतः जमिनीत असणाऱ्या नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, मॉलिब्डेनम अशा मूलद्रव्यांवरील काम आपल्या देशातील पिकांचे उत्पादन वाढविण्यास उपयोगी पडले. संशोधन विभागाचे संचालक असताना त्यांनी भाताचे दोन नवे संकरित वाण,  एपीएचआर – १ आणि एपीएचआर – २, शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. ही दोन वाणे सु. चार ते साडेचार महिन्यात तयार होतात. या वाणातून कमी बियाणे वापरून दर हेक्टरी साधारण सव्वा टन उत्पादन मिळते. जुन्या वाणांपेक्षा ते किमान ३५ % जास्त असते; त्यामुळे भाताचे नवे वाण उपलब्ध करून देणाऱ्या देशांत प्रथमच जगात चीन खालोखाल भारताचा दुसरा क्रमांक लागला.

सुब्बा राव यांनी हैद्राबादमधील आचार्य एन जी रंगा कृषी संस्थेतही कुलगुरू पदावर कार्यरत होते. दहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून ते निवृत्त झाले. तेथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने इंडियन नॅशनल काँग्रेस आयोजित केली. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ एज्युकेटर्स फॉर वर्ल्ड पीस या स्वयंसेवी संस्थेने त्यांना भारताचा सहस्त्रक पुरस्कार दिला. त्याशिवाय त्यांना पद्मश्री पुरस्कार, नॉर्मन बोरलॉग पुरस्कार, आशुतोष मुखर्जी असे पुरस्कार देण्यात आले आहे.

सुब्बा राव कुशल प्रशासक होते. चक्री वादळे, पूर, दुष्काळ अशा नैसर्गिक आपतींतून कमीतकमी नुकसान होऊन मार्ग कसा काढता येईल हे त्यांनी अनेक कठीण प्रसंगी दाखवून दिले. ए एन जी आर ॲग्रिकल्चरल विद्यापीठाला आयसीएआरची सर्वोत्कृष्ट संस्था हा पुरस्कार मिळविण्यात आणि आयसीएआरची सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी संस्था असे पुरस्कार मिळविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. विविध प्रतिष्ठित वैज्ञानिक नियतकालिकांतून त्यांचे सुमारे १६० शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.

सुब्बा राव यांचे हैद्राबाद (तेलंगणा) येथे कर्करोगाने निधन झाले.

कळीचे शब्द : #कृषिशास्त्रज्ञ #मृदाशास्त्रज्ञ

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा

 


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.