चव्हाण, रामचंद्र नारायण : (२९ ऑक्टोबर १९१३ – १० एप्रिल १९९३). महाराष्ट्राच्या सामाजिक – धार्मिक इतिहासाचे साक्षेपी अभ्यासक, विचारवंत व प्रबोधनकर्ते. राना या नावाने ते परिचित आहेत. त्यांचा जन्म वाई (जि.सातारा) येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या आई यशोदाबाई ह्या वाईतील प्रसिद्ध सावकार व जमीनदार कृष्णाजी काळोजी शिंदे यांच्या नात, तर घरजावई म्हणून आलेले नारायण कृष्णाजी चव्हाण हे त्यांचे वडील. बडोदे संस्थानात त्यांचे वास्तव्य राहिल्यामुळे त्यांनी प्रगत विचार ग्रहण केले होते. आध्यात्मिक वाचनाची आवड असलेले त्यांचे वडील वाई पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते होते. वाई तालुका सत्यशोधक समाज (१९२०), ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व, वाई नगरपालिकेचे नगराध्यक्ष (१९२६ ते १९२९), ऑनररी बेंच मॅजिस्ट्रेट (१९२३ ते १९३२), स्कूल बोर्डाचे चेअरमन, प्रार्थनासमाज, ब्राह्मसमाज, शेतीसुधारणा, खरेदी विक्री संघ, राष्ट्रीय काँग्रेस, गांधीजींची हरिजन चळवळ, असहकार आंदोलन, खादीचा प्रचार असा त्यांच्या वडिलांचा सामाजिक कामाचा व्याप राहिला. त्यांच्यापासूनच रानांना सार्वजनिक कार्य व लोकसेवेची प्रेरणा मिळाली.
रानांचे प्राथमिक व इंग्रजी सहावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण वाईमध्ये झाले. शालेय वयातच त्यांना वाचनाचा छंद जडला. घरी इंदुप्रकाश, सयाजी-विजय, केसरी, स्वराज्य ही पत्रे येत असत. त्यांच्या वडिलांनी बहुजनांसाठी काढलेल्या मराठा मोफत वाचनालयाचे व्यवस्थापन १९२५ ते १९३५ पर्यंत त्यांनी सांभाळले. तेथे येणारी मूकनायक, भगवा झेंडा, कैवारी, मजूर, विजयी मराठा, राष्ट्रवीर, दीपमित्र वगैरे पत्रे त्यांच्या वाचनात येऊ लागली. अनुकरणशीलतेमुळे ते सूर्यप्रकाश नावाचे हस्तलिखित मासिक काढू लागले. १९२५ मध्ये दिनकर जवळकरांच्या व्याख्यानांचा परिणाम होऊन त्यांनी रणशूर तानाजी नामक हस्तलिखित मासिक काढले होते. वाईत स्थानिक वृत्तपत्र नसल्यामुळे वाईतील हकीकती समजण्यासाठी वर्तमानसार नावाचे हस्तलिखित पाक्षिक ते प्रसिद्ध करीत. गुरुजनांकडून त्यांची या कामांबाबत प्रशंसा होत असे. व्याख्याने ऐकणे, त्याची टिपणे काढणे, सार्वजनिक कार्यक्रमाची बातमीपत्रे तयार करून वृत्तपत्रांकडे पाठविणे, निवेदने तयार करणे वगैरे कामे ते मनापासून करीत असत. वाईतील ‘राष्ट्रीय युवक संघ’, ‘वाई देश मराठा संघ’ यात त्यांचा सहभाग असे. विद्यार्थीदशेपासूनच त्यांनी वैचारिक लेखनात आवश्यक खरे-खोटे पडताळून पाहण्याची सवय जोपासली. पुढे ती सूक्ष्म वाचनाने वृद्धिंगत झाली. अंधश्रद्धा निर्मूलन, अस्पृशोद्धार, धर्ममार्तंडांची गुलामगिरी, म. फुले, डॉ. आंबेडकर, म. गांधी व हरिजन चळवळ आदी विषय त्यांच्या हस्तलिखित मासिकात असत.
सत्यशोधक आनंदस्वामी व पंढरीनाथ पाटील यांचेकडून फुले चरित्राची प्रत त्यांना १९२६ च्या दरम्यान वाचावयास मिळाली. ब्राह्मणेतर चळवळीतील पुढारी भास्करराव जाधव, केशवराव विचारे, भाऊराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे, वा. रा. कोठारी, जेधे व जवळकर यांना जवळून पाहता व ऐकता आले. त्यांच्यामुळे निष्ठा, त्याग, सामाजिक कार्यातील समर्पण, बहुजनहिताची काळजी यांचा ठसा संस्कारक्षम वयातच त्यांच्यावर उमटला. म. फुले यांचे ग्रंथ, त्यांच्या चरित्राची साधने व संदर्भ जमवून वाचणे व ती जतन करण्याचा छंद त्यांनी जोपासला. तुकारामाची गाथा ते नियमितपणे आवडीने वाचत. पुढे प्रार्थनासमाजाकडे आकर्षित होण्यास संत तुकाराम कारण झाले असे त्यांनी नमूद केले आहे. वाई येथे दि. १५ जानेवारी १९३३ रोजी झालेल्या अस्पृश्यतानिवारण परिषदेच्या सभेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या भाषणाचा परिणाम त्यांच्यावर झाला. वाई प्रार्थनासमाज, ब्राह्मोसमाजाच्या कार्यानिमित्त महर्षी वाईला येऊ लागल्यावर हा सहवास वाढला. १९३४ मध्ये पुण्यास पुढील शिक्षणासाठी गेल्यावर महर्षींशी त्यांचा सहवास व संबंध दृढ झाला. महर्षींचे ब्राह्मजीवन त्यांना जवळून अनुभवता आले. समाजप्रबोधक व उदार धर्मपर ग्रथांचे सूक्ष्म वाचन महर्षींच्या मार्गदर्शनाखाली होऊ लागले. पुणे व मुंबई प्रार्थनासमाजाशी ते जोडले गेले. सुबोधपत्रिका या मुंबई प्रार्थना समाजाच्या मुखपत्रात ते लिहू लागले.
क्रमिक पुस्तकांशिवाय अवांतर वाचनामुळे राना दोनदा मॅट्रिक परीक्षेत नापास झाले. १९३५ मध्ये श्री. शिवाजी मराठा हायस्कूलमधून मुंबई विद्यापीठामार्फत घेतली जाणारी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. सन १९३६-३७ मध्ये सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून प्रथम वर्ष परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली. त्याचवेळी त्यांच्या आईचे निधन झाले. घरी दोन भाऊ व तीन लहान बहिणी होत्या. वडील घरावर तुळशीपत्र ठेवून सार्वजनिक कामात गुंतलेले, शेतमालास भाव नाही, घरजावई म्हणून चालून आलेली सावकारकी त्यांच्या वडिलांनी नाकारल्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली होती. त्यामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडून नोकरी पत्करावी लागली. त्यांचा विवाह चिपळूण (रत्नागिरी) येथील महादेवराव बळवंतराव डांगे यांच्या कन्या इंदिराबाई यांच्याशी महर्षी वि. रा. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राह्मविधीप्रमाणे झाला (१ मे १९३७). परिस्थितिच्या रेट्यामुळे त्यांना विविध नोकऱ्या कराव्या लागल्या. प्रथम पुणे येथे नगरपालिकेच्या शाळेत शिक्षक, इगतपुरी हाऊस टॅक्स कलेक्टर म्हणून लिपिक, देवळाली, नाशिक येथे व त्यानंतर १९४५ पासून सातारा लोकल बोर्डात कारकून म्हणून त्यांनी नोकरी केली.
सरकारी नोकरीत राहून सुद्धा वैचारिक लिखाणाची व वाचनाची कास त्यांनी सोडली नाही, उलट वृद्धिंगत केली. वाईच्या पुनरपि वास्तव्यात १९४५ ते १९५५ पर्यंत ब्राह्मसमाजाचे सचिव व पुढे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. १९५८ मध्ये महर्षी शिंदे यांचे वाईत कायमस्वरूपी स्मारक निर्माण व्हावे म्हणून स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था, कोल्हापूरचे संस्थापक पूज्य बापूजी साळुंखे यांच्या सहकार्याने कुटुंबाची जागा दान देऊन महर्षी शिंदे विद्यामंदिर स्थापन केले. सुलभ लग्नसंस्कार विधी हे पुस्तक प्रकाशित करून वाई पंचक्रोशीतील अनेक विवाह त्यांनी बिनखर्चाने लावले. १९४५ ते १९५६ पर्यंत ते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संपर्कात आले. जोतीनिबंध हे पुस्तक चिकाटीने त्यांनी तर्कतीर्थांकडून लिहून घेऊन जेधे – मोरे यांच्या उपस्थितीत प्रकाशित केले. नंतर तर्कतीर्थांच्याबरोबर बहुजनसमाजाचा इतिहास लिहिण्यासाठी अनेक साधने जमवून तीनशे पानांचे लेखनही केले होते. आचार्य अत्रे यांना ही साधने व लेखन म. फुले बोलपट काढण्यासाठी उपयोगी ठरली.
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रात ज्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक चळवळी झाल्या त्या चळवळींचे व त्यांचे धुरीणत्व करणाऱ्या सुधारकांचा एक अभ्यासक व संशोधक म्हणून त्यांनी जवळजवळ चवदाशे प्रबोधनात्मक लेख लिहिले. प्रस्थापित वृत्तपत्रांनी त्यांना प्रथम स्थान दिले नसले तरी बहुजनसमाजाच्या वृत्तपत्रसृष्टीने त्यांना मानाचे स्थान दिले. त्यांचे बहुतांश प्रबोधनपर लेखन स्फुट स्वरूपात वा प्रासंगिक असून निबंधस्वरूपात आहे. रानांच्या हयातीत सुलभ लग्नसंस्कारविधी (१९४६), सत्यशोधक जोतीराव फुले (१९५२), सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकसार (१९७४), महर्षी शिंदे यांच्या काही आठवणी (१९७५), रा. ना. चव्हाण निवडक वाङ्मय (१९८६), रा. ना. चव्हाण विचारदर्शन (१९८७), भाऊराव पाटील शोध व बोध (१९८७) एवढेच ग्रंथ प्रकाशित होऊ शकले. रानांचे लेखन सामाजिक इतिहासाचा ठेवा असल्याने रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानद्वारा चव्हाण कुटुंबीय त्यांचे लेखन पुस्तकरूपाने जतन करण्याचे काम १९९४ पासून करीत आहे. आजवर ४२ ग्रंथ प्रकाशित करून १४ हजार पानांचा मजकूर अभ्यासकांना व समाजाला उपलब्ध केला आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे दलितमित्र पुरस्कार (१९८३), महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या वतीने गौरववृत्ती (मानपत्र) व १० हजार रुपयांची फेलोशिप (१९८९) यांसह अनेक मानसन्मान त्यांना प्राप्त झाले. पुणे येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- ठोके मो.नि.(संपा), रा.ना.चव्हाण निवडक वाङ्मय,पारख प्रकाशन, बेळगाव,१९८६.