उभं -आडवं : साहित्य अकादेमी नवी दिल्लीचा युवा साहित्य पुरस्कार प्राप्त ग्रंथ. प्रत्यक्ष वास्तव आणि सिद्धांत व्यूह याची सांगड घालणारा राहुल कोसंबी यांचा हा पहिला वैचारिक ग्रंथ आहे. शब्द प्रकाशन, मुंबई कडून २०१६ मध्ये प्रकाशित झाला. या विवेचनपर गद्यग्रंथात एकूण २२ लेख आहेत, ज्यात २००७ ते मे २०१६ या कालावधीत लेखकाने लिहिलेले लेख, मुक्तशब्द  या नियतकालिकासाठी लिहिलेले संपादकीय आणि काही शोधनिबंधांचा समावेश आहे.

समाज, साहित्य आणि संस्कृती या बृहद संकल्पनांना मध्यवर्ती ठेऊन केलेले हे लेखन आहे. महाराष्ट्राचा आणि समकालाचा संदर्भ असणार्‍या या लेखांमध्ये जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत भारतात निर्माण होत असणार्‍या सांस्कृतिक उत्पादनाबाबत भाष्य आहे. जातवर्गीय दृष्टिकोनातून समकालाला नव्याने विश्लेषित करण्याचा प्रयत्न यात प्रामुख्याने आहे. तत्कालिक घटना निमित्त असल्या तरीही त्यास इतर लेखकांनी केलेल्या मांडणीचा प्रतिवाद असाही संदर्भ आहे. ‘मोतीराम कटारे यांच्या लेखावरील प्रतिक्रिया’, ‘आनंद तेलतुंबडेंच्या समर्थनार्थ’, ‘भ्रामक विजयोन्माद आणि अपूर्ण क्रांती’, ‘हिंदू डावे’ ,’मॅनहोल मधला माणूस’ हे लेख प्रतिवाद म्हणून लिहिले गेलेले आहेत. लेखकाचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक भान उजागर करणारे लेख भोवताली घडणार्‍या घटितांचे सखोल विश्लेषण करणारे आहेत. शोषितांचे जगणे हे या लेखनाचे केंद्र आहे. अस्वस्थ करणारे वास्तव आणि सैद्धांतिक व्यूह यांची सांगड घातल्याने हे व्यामिश्र भवतालाचा अन्वयार्थ लावणारे लिखाण आहे. याशिवाय,”लोकसभेची निवडणूक आणि राजाची निवड’ आणि ‘कसोटीचा काळ’ हे भारतीय राजकारणातील घडामोडींच्या अनुषंगाने लिहिलेले लेख म्हणजे अनुक्रमे २०१४ ची लोकसभा निवडणूक आणि तत्कालिक सरकारने ६० दिवस पूर्ण करणे या अनुषंगाने केलेले विश्लेषण आहे.

लेखकाची डावी भूमिका या लेखनात स्पष्ट आहे. ज्यात निर्भीडता आणि परखडपणा याचा समन्वय आहे. व्यवस्थेला प्रश्न विचारत वर्तमानाचे विश्लेषण करताना इतिहासाने केलेली कोंडी फोडण्याची कृतीप्रवणता यात अनुस्यूत आहे. विविध ज्ञानशाखांच्या आणि आंतरज्ञानशाखीय परिप्रेक्षातून केलेलं हे विवेचन आहे. जे साहित्य, जातीव्यवस्था, वर्ण आणि वर्णाधिष्ठित समाजरचना, राजकारण, सांस्कृतिक व्यवहार यांचा ऊहापोह करते. देशीवाद, ब्राह्मणीकरण, दलित चळवळी, सेझ आंदोलने, एफ. डी. आय., भारतीयकरण, आरक्षण, जागतिकीकरण, भांडवलशाही या मुद्द्यांची साधक बाधक चर्चा या ग्रंथाच्या विषयांच्या मांडणीत आहे.

दलित चळवळी आणि साहित्यिक यांच्या योगदनाची साक्षेपी चर्चा करणारे लेख या ग्रंथात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजशास्त्रीय योगदानाची चिकित्सा आहे. नामदेव ढसाळ, राजा ढाले, विलास सारंग, आनंद तेलतुंबडे, शरद पाटील यांच्या लेखन आणि कार्याचा मागोवा घेणार्‍या लेखांमध्ये त्यांच्या एकूण योगदानाचा आणि त्यासंदर्भाने उपस्थित होणारे प्रश्न, संज्ञा यांचीही चर्चा आहे. ‘दलित अत्याचार : भारतातील दुर्लक्षित बिभित्सता’, ‘दलित स्त्रियांवरील अदृश्य अत्याचार’, ‘दलित नवमध्यमवर्ग आणि पुरुषसत्ताक दृष्टी’ या लेखांमध्ये दलित मध्यमवर्ग, बलात्कार, जातीय अत्याचार यावर विस्तृत विवेचन हे आकडेवारीच्या अनुषंगाने साधार मांडले आहे. तसेच दलित साहित्य,भाषा, संस्कृती आणि राजकारण याचा ऊहापोह करणारा विस्तृत लेखही यात आहे. पश्चिमात्य आणि पौर्वात्य सिद्धांत आणि लेखक, तत्त्वज्ञानाच्या संदर्भामुळे या लेखांना वेगळे असे संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे.

संदर्भ : कोसंबी, राहुल, उभं-आडवं, मुंबई, २०१६.