भोळे, भास्कर लक्ष्मण : (३० सप्टेंबर १९४२ – २४ डिसेंबर २००९). महाराष्ट्रातील विवेकवादी विचारवंत, राजकीय विश्लेषक आणि प्रबोधनाचे भाष्यकार. त्यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील तालखेड येथे झाला. जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षण त्यांनी घेतले. औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालय आणि शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतले. १९६२ मध्ये ते पदवीधर झाले तर तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातून १९६४ मध्ये त्यांनी राज्यशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तत्कालीन नागपूर विद्यापीठात त्यांनी ‘भारतीय शेतकरी कामगार पक्ष : एक अभ्यास – स्वातंत्र्य ते संयुक्‍त महाराष्ट्र’ या विषयावर संशोधन करून आचार्य पदवी प्राप्त केली (१९८२). १९६४ ते १९७० या काळात त्यांनी औरंगाबाद येथील शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयात पदवीस्तरावर राज्यशास्त्र या विषयाचे अध्यापन केले. त्यानंतर १९७० मध्ये ते नागपूर विद्यापीठात राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभागात रूजू झाले. पुढे ते त्या विभागाचे प्रमुख झाले. २००२ मध्ये ते निवृत्त झाले.

नीतिमत्तेच्या कृतिशील राजकारणाचा आणि समाजकारणाचा आग्रह धरणारे, राजकारण, समाजकारण आणि साहित्याविषयीचे गंभीर लेखन भोळे यांनी केले आहे. त्यांच्या साहित्य आणि समीक्षालेखनाला सामाजिक, राजकीय चिंतनाचे विविध आयाम आहेत. राज्यशास्त्राची सैद्धांतिक पुस्तके लिहितानाच त्यांनी गतकालीन आणि समकालीन राजकारणाविषयी गंभीर चिंतन करणारे साक्षेपी लेखन केले. संकुचित जातीयवादाचा, राजकारणातील विधिनिषेधशून्य वर्तनाचा, चळवळीच्या नावावर फसवणुकीचे अर्थशास्त्र मांडणाऱ्यांचा स्पष्टपणे निषेध करीत संविधानाच्या मूलभूत तत्त्वांशी बांधिलकी सांगणारा प्रबोधनाचा आणि प्रगतिशीलतेचा विचार भोळे यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी दिसतो. नवी घटनादुरुस्ती अन्वय आणि अर्थ (१९७७), दुसरे स्वातंत्र्य (१९७७), राजकीय भारत (१९७८), सत्तांतर आणि नंतर (१९७९), आपल्या विकासाची दिशा आणि लोकशाहीचे भवितव्य (१९९३), भारताचे स्वातंत्र्य : पन्नास वर्षांचा मागोवा (१९९८), जात आणि राजकारण (१९९८), विसावे शतक आणि भारतातील समता विचार (१९९९), धर्मनिरपेक्ष लोकशाहीला जमातवादाचे आव्हान (२००१) त्यांच्या या सर्व पुस्तकांमधून आणि विविध नियतकालिकांतील लेखांमधून संविधानाच्या मूलभूत तत्त्वांशी बांधिलकी सांगण्याच्या त्यांच्या भूमिकेचा प्रत्यय येतो. लोकशाहीविचार आणि प्रबोधनमूल्ये यांविषयी अपार आदर व्यक्त करीत भारतातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीची अन्वर्थक चिकित्सा भोळे यांनी केली आहे.

महात्मा जोतीराव फुले, गो. ग. आगरकर, लोकहितवादी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आदी विचारवंतांच्या कार्याचा, लेखनाचा, विचारांचा अन्वय लावण्याचे, त्यांच्या विचारांची चिकित्सा करण्याचे संशोधकाचे कार्य भोळे यांनी आयुष्यभर व्रतस्थपणे केले. डॉ.महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे बहुजनवादी राजकारण, यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य (१९८६), आधुनिक भारतातील राजकीय विचार (१९८७), भारतीय आणि पाश्चिमात्य राजकीय विचार (१९८९), जोतीरावांची समता संकल्पना (१९९०), महात्मा जोतीराव फुले (१९९६), आंबेडकरांचा वैचारिक वारसा (१९९८), आगरकरांचे धर्मचिंतन (२००५), छत्रपती शाहू महाराज (२०१०) आदी पुस्तके आणि विविध नियतकालिकांमधून केलेले विचारवंतांच्या संदर्भातील लेखन यातून भोळे यांनी प्राचीन आणि अर्वाचीन भारतीय राजकीय विचारवंतांचा वैचारिक वारसा, त्यांचे तात्त्विक चिंतन आणि कालसापेक्ष भूमिका यांची सखोल चिकित्सा केली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विचारविश्वात या लेखनाने फार मोलाची भर घातली आहे. त्यांची साक्षेप, संदर्भ: दलित चळवळीचा ही पुस्तके समकालीन राजकारणाची, समाजकारणाची आणि चळवळीच्या मानसशास्त्राची वस्तुनिष्ठ तपासणी करणारी आहेत.

भोळे यांची साहित्यप्रत्यय (२००१), कटाक्ष (२००८), साहित्य अवकाश (२००९) ही तीन साहित्यसमीक्षेची पुस्तके आहेत. साहित्यकृतीचा विचार केवळ सौंदर्यशास्त्रीय अंगाने करण्याऐवजी सामाजिक निकषांच्या कसोट्यावर तपासूनच केला गेला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका त्यांची आहे. साहित्यकृती ही जीवनाचाच एक भाग जर असेल तर तिची समीक्षा जीवनमूल्यांच्या आधारे झाली पाहिजे, समकालीन वास्तव आणि नीतिमूल्यांच्या कसोट्या साहित्यकृतींना लावताना साहित्यकृतींची सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमीदेखील सूक्ष्मपणे विचारात घेण्याची गरज भोळे यांनी प्रतिपादन केली. त्यांचे समीक्षालेखन मराठी समीक्षेला साहित्य आणि समाजजीवन यांच्यातील आंतरसंबंध शोधण्याची नवी दृष्टी देणारे आहे. साहित्य अकादेमी या केंद्रीय साहित्यसंस्थेने भोळे यांनी संपादित केलेल्या एकोणीसाव्या शतकातील मराठी गद्य आणि विसाव्या शतकातील मराठी गद्य या द्विखंडात्मक ग्रंथांचे प्रकाशन केले आहे.

भोळे यांनी अनुवादाचे आणि संपादनाचे फार मोलाचे कार्य केले आहे. महादेव गोविंद रानडे (मूळ लेखक : प्र.ज. जहागीरदार), इस्लामसंबंधी एक आधुनिक दृष्टिकोण (मूळ लेखक : आसफ.ए. ए. फैजी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुभव आणि आठवणी (मूळ लेखक : नानकचंद रत्तू) या ग्रंथांसह कथा आणि कादंबरी यांसारख्या ललित साहित्यकृतींचाही सरस अनुवाद त्यांनी केला आहे. पाकिस्तानी लेखक इंतजार हुसैन यांच्या कथांचा अनुवाद (मोरनामा आणि इतर कथा) आणि ज्युझे सारामगू यांच्या कादंबरीचा अनुवाद (ब्लाइंडनेस) असे ललित साहित्यकृतींचे अनुवादही त्यांनी केले आहेत. सांस्कृतिक, वैचारिक आदानप्रदानासाठी सर्व भाषांमधील सर्व लेखन सर्व भाषांमध्ये पोचले पाहिजे या भूमिकेचे मर्म त्यांच्या अनुवादाच्या कार्याच्या मूळाशी दिसते. भाषांवरील प्रभुत्व आणि समाजजीवनातील समग्र स्थित्यंतरांची सखोल जाण असल्यामुळे भोळे यांनी भाषांतराचे आणि संपादनाचे बहुमोलाचे कार्य केले. संशोधनाची क्षितिजे (डॉ. वि. भि. कोलते अमृतमहोत्सव ग्रंथ), जमातवाद राष्ट्रधर्म आणि धर्मनिरपेक्षता (वसंत पळशीकर यांचे लेख), बदलता महाराष्ट्र (एन. डी. पाटील गौरव ग्रंथ, सहसंपादक किशोर बेडकिहाळ), शतकांतराच्या वळणावर (सहसंपादक : किशोर बेडकिहाळ), एकोणिसाव्या शतकातील मराठी गद्य, खंड १ व खंड २ आदी ग्रंथांचे संपादन भोळे यांनी केले आहे. हे सर्व ग्रंथ संशोधकांना, अभ्यासकांना नित्य उपयुक्त ठरणारे आहेत.

भोळे यांच्या मृत्यूनंतर ग्रंथनिविष्ट नसलेल्या त्यांच्या लेखनाची समाजविमर्श, शेतकरी कामगार पक्ष, प्रास्ताविके, परामर्श, आधुनिक महाराष्ट्रातील विचारवंत ही पाच महत्त्वाची पुस्तके प्रकाशित झाली. समाजविमर्श या पुस्तकात प्रबोधनाची संकल्पना, भारतीय प्रबोधन, धर्म, राष्ट्रवाद, स्त्री प्रश्न, आरक्षण, सामाजिक सांस्कृतिक चळवळी, शेतकऱ्यांचे प्रश्न, सामाजिक परिवर्तन आदी विषयांवरील परखड, चिकित्सक असे मौलिक चिंतन आहे. आधुनिक महाराष्ट्रातील विचारवंत या पुस्तकात विचारवंतांवर बारा लेख आहेत. महाराष्ट्रातील समाजसुधारणा आणि सांस्कृतिक व विवेकवादी विचारांच्या ऐतिहासिक लेखनात या पुस्तकाने साक्षेपी, समतावादी आणि विद्वेषरहित विचारांची मौलिक भर घातली आहे.

भोळे यांच्या एकूण लेखनाची मूल्यवत्ता अधोरेखित करणारे विवेचन ज्येष्ठ विचारवंत राजा दीक्षित यांनी पुढीलप्रमाणे केले आहे, “बुद्ध-मार्क्स यांना एकत्र आणत आणि म. जोतीबा फुले, म. वि. रा. शिंदे, म. गांधीजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समन्वय साधत लोकशाही समाजवादाच्या व सर्वांगीण समतावादाच्या मार्गाने जाण्याचा ठोस विचार ते मांडत राहिले. हा कृतक समरसताभाव नव्हता. भास्कर भोळे यांचा समन्वयवाद म्हणजे एक ढोबळ सरमिसळ नव्हती, तर ती एक संश्लेषक, सर्जनशील व निर्भेळ अशी परिवर्तन- दृष्टी होती. व्यक्ती, घटना, संस्था, विचारधारा यांच्याकडे ते ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहू शकत असत. त्यामुळे एकारलेला, अभिनिवेषी व विद्वेषी सूर त्यांच्या मांडणीत उमटत नसे. असहमती व्यक्त करताना वा टीका करताना सुद्धा त्यांचे ऐतिहासिक भान जागृत असल्याने स्पष्टता ठेवून सुद्धा ते विघातक टोके गाठत नसत. संवादभंगाच्या भिंती’ पार करण्याची त्यांची दृष्टी फार मोलाची होती. त्यांचा सर्व लेखन-संवाद त्यांनी इतिहासाचार्य वि. का. राजवाड्यांप्रमाणे प्रतिज्ञापूर्वक मायमराठीतून केला. यात कोठेही अन्य भाषांचे अज्ञान, स्वभाषेचा दुरभिमान वा अभ्यासक्षेत्रीय पलायनवाद नव्हता. ती एक जाणीवपूर्वक स्वीकारलेली बांधिलकी होती. खरे तर त्यांची भाषाविषयक जाण, जाणीवा आणि योगदानावर एक संशोधन प्रकल्प होऊ शकेल. प्रा.भास्कर भोळे यांचे वर्णन अगदी थोडक्यात करायचे झाल्यास त्यांना एक ‘विवेकशील पुरोगामी प्रबोधनकर्ते’ असे संबोधता येईल.”

भोळे यांचे एक वैशिष्ट्य असे की त्यांनी मराठी भाषेचा कृतिशील कैवार घेतला. आपल्या मराठी लेखनात अर्थाला नख न लागू देता त्यांनी परभाषेतील संज्ञा संकल्पनांचे मराठीकरण करून उपयोजन केले. परभाषेतील संज्ञा संकल्पना मराठी भाषेत आणून त्या लेखनातून लोकव्यवहारात रुजवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. याची प्रचिती राजकीय सिद्धांत आणि विश्लेषण या पाठ्यपुस्तकाद्वारे सहज येते. पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन क्षेत्रातील अभ्यासकांसाठी अभ्यासक्रमाधारित उपयुक्त पाठ्यपुस्तकांसह संदर्भग्रंथ, संशोधनग्रंथ, समीक्षा, संपादने, पुस्तिका, भाषांतरीत ग्रंथ वगैरे मिळून भोळे यांची सुमारे साठ पुस्तके प्रकाशित झाली असून विविध नियतकालिकांतून, ग्रंथांतून प्रकाशित झालेल्या असंकलित लेखांची संख्या फार मोठी आहे. या साऱ्या लेखनातून भोळे यांनी महाराष्ट्राचे विचारविश्व समृद्ध केले आहे. इंग्रजी भाषेत चालणाऱ्या वैचारिक व्यवहाराला पूर्णपणे बाजूला सारून मराठी भाषेत हा व्यवहार समर्थपणे कसा करता येऊ शकतो, याचा आदर्श घालून देऊन भोळे यांनी वि.का.राजवाडे, लक्ष्मणशास्त्री जोशी आणि य. दि. फडके यांची परंपरा पुढे चालविली आहे. आज उभा महाराष्ट्र त्यांच्याकडे एक साक्षेपी, निर्भिड व परिवर्तनवादी विचारवंत म्हणून पाहतो आहे, असे अन्वर्थक उद्गार राजेंद्र व्होरा यांनी त्यांच्या लेखनाबद्दल काढले आहेत. भोळे हे राजकारण, समाजकारण आणि साहित्याचे चिंतनशील भाष्यकार आणि समीक्षक होते. महाराष्ट्राच्या प्रबोधनपर्वाचे भाष्यकर आणि कृतिशील विचारवंत असणाऱ्या भोळे यांचे समग्र लेखन महाराष्ट्राच्या विचारविश्वाची श्रीमंती होय आणि प्रबोधनाच्या चळवळीचे बळ होय.

महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषद (नाशिक,१९९०), विचारवेध संमेलन, सोलापूर (१९९८) जनसाहित्य संमेलन, अमरावती या संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. युगांतर पुरस्कार, साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे दोन पुरस्कार, महाराष्ट्र फाउण्डेशनचा गौरव पुरस्कार, प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषद वाङ्मय पुरस्कार आदी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे साक्षेपी भाष्यकार असणाऱ्या भोळे यांनी शालेय इतिहास – नागरिकशास्त्रापासून राज्यशास्त्राच्या पदव्युत्तर पातळीपर्यंतच्या मराठीतील पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीसह राजकारण, समाजकारण आणि साहित्य आदी ज्ञानक्षेत्रांत मौलिक असे लेखन केले आहे. विवेकवादी, विज्ञाननिष्ठ लोकशाहीवादी विचारपरंपरेचे ते साक्षेपी अभ्यासक होते. मराठी राजकीय, वैचारिक लेखनपरंपरेत त्यांचे सारे लेखन मौलिक असे आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहासात आणि वैचारिक लेखनाच्या इतिहासात भोळे यांच्या समग्र लेखनाची महत्ता आणि मूल्यवत्ता फार मोठी आहे.

नागपूर येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • बेडकिहाळ, किशोर, साप्ताहिक साधना, ०२ जानेवारी २०१०.
  • भोळे, भा.ल., आधुनिक महाराष्ट्रातील विचारवंत (प्रस्तावना – राजा दीक्षित), पुणे,२०१९.
  • व्होरा, राजेन्द्र, साप्ताहिक साधना, १९ जानेवारी २००८.

 

                        समीक्षक : किशोर बेडकिहाळ