हिंदी महासागराच्या किनार्‍यालगतचा परिसर आणि महासागरातील असंख्य बेटे पर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाची आहेत. हिंदी महासागरात असलेली अनेक लहानमोठी बेटे, त्या बेटांच्या तसेच महासागरलगतच्या देशांच्या किनार्‍यावरील सुंदर पुळणी, उबदार हवामान, किनार्‍यावरील आणि बेटांवरील हिरवीगार दाट अरण्ये, तेथील समृद्ध जैवविविधता, दुर्मिळ वन्य प्राणिजीवन, जागृत ज्वालामुखी, कोरीव सागरी कडे, वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक भूदृश्ये, मसालेदार खाद्यपदार्थ, धार्मिक व सांस्कृतिक स्थळे इत्यादी पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. असे असले, तरी एकेकाळी एकाकी असलेली ही स्थळे पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने तशी दुर्लक्षितच राहिली होती; परंतु गेल्या काही दशकांत पर्यटनवृद्धीसाठी हवाई वाहतुकीने प्रमुख ठिकाणांशी ती जोडली गेली असून परिसरात पर्यटन व्यवसायाचा चांगलाच विकास आणि वाढ झालेली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनार्‍यापासून ते आफ्रिकेच्या पूर्व किनार्‍यापर्यंत, तसेच भारताच्या दक्षिण किनार्‍यापासून ते मध्यपूर्वेपर्यंत अनेक लहानमोठ्या बेटांचा विस्तार झालेला आढळतो. ती बेटे आज पर्यटनाच्या दृष्टीने खूपच प्रसिद्ध झाली आहेत. अंदमान व निकोबार बेटे, लक्षद्वीप बेटे, सेशेल्स, पूलाऊ लांगकावी, ख्रिसमस, श्रीलंका, झांझिबार, मालदीव, पूकेत, मॉरिशस, मादागास्कर, रेयून्यों, सोकोत्रा, कॉमोरो (कॉमोरोझ), कोकोस (कीलिंग) ही या महासागरातील पर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाची बेटे आहेत. त्यांपैकी पूलाऊ लांगकावी हे निसर्गसुंदर बेट मलेशियाच्या वायव्येस, अंदमान समुद्रात असून, यूनेस्कोने २००७ मध्ये याला ‘जागतिक भूउद्यान’ (वर्ल्ड जीओपार्क) असा दर्जा दिलेला आहे. ख्रिसमस हे ऑस्ट्रेलियाचे बेट इंडोनेशियाच्या जावा बेटापासून दक्षिणेस ३५८ किमी. वर असून ते पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. भारताच्या आग्नेय टोकाशी असलेल्या श्रीलंकेला तर पाचूचे बेट म्हणून ओळखले जाते. आफ्रिकेच्या पूर्व किनार्‍यावर असलेल्या झांझिबार या टांझानियाच्या बेटाला मसाल्याचे बेट म्हणून ओळखले जाते. येथील

पूलाऊ लांगकावी

झांझिबार  शहरातील ‘स्टोन टाउन’ या जुन्या व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा असलेल्या भागाचा यूनेस्कोने जागतिक वारसास्थळांत समावेश केलेला आहे. मादागास्कर बेटाच्या पूर्वेस ८०० किमी. वर मॉरिशस द्वीपसमूह असून सुंदर पुळणी, निसर्गसुंदर पर्वतीय प्रदेश, आल्हाददायक हवा आणि अनेक संस्कृतींच्या लोकांचे आढळणारे मिश्रण यामुळे ते प्रसिद्ध पर्यटन केंद्र बनले आहे. पुळणप्रेमी पर्यटकांचे तर ते नंदनवन म्हणून ओळखले जाते. भारताच्या दक्षिणेस, कन्याकुमारीपासून ४८० किमी. वर असलेली मालदीव द्वीपसमूहात एक हजारांवर प्रवाळद्वीपे आढळतात. तेही पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असते. अंदमान समुद्रात थायलंडचे पूकेत बेट आहे. ही सर्वच बेटे पर्यटनासाठी विशेष महत्त्वाची असून प्रतिवर्षी जगभरातून असंख्य पर्यटक निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी हिंदी महासागरातील या पर्यटन स्थळांना भेट देतात. त्यामुळे या बेटांना मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळते, किंबहुना त्या बेटांच्या अर्थव्यवस्थेचा पर्यटन हा प्रमुख आधार बनलेला आहे.

अलीकडच्या काळात या प्रदेशात पर्यावरणीय किंवा पर्यावरणपूरक पर्यटन (ईकोटूरिझम) ही संकल्पना अधिक विकसित व दृढ होत आहे. निसर्गाचा आनंद घेण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखणे, नैसर्गिक संसाधनांचा जाणीवपूर्वक आणि तर्कसंगत उपयोग करणे, सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणाबद्दल संवेदनशीलता ठेवणे, मानवाधिकाराचा आदर, स्थानिक समुदायाचे कल्याण, प्रदेशाचा शाश्वत विकास इत्यादी या पर्यावरणीय पर्यटनाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

जागतिक पातळीवरील पर्यटन व्यवसायात प्रचंड स्पर्धा वाढलेली असताना आपल्या विभागात पर्यावरणीय पर्यटन व्यवसायाचा विकास करण्याच्या दृष्टीने नैर्ऋत्य हिंदी महासागरातील सहा बेटांनी मिळून ‘व्हॅनिला आयलंड्स असोसिएशयन’ या संघाची स्थापना केली आहे (२०१०). प्रत्यक्षात २०१२ मध्ये या संघाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले. रेयून्यों, मॉरिशस, सेशेल्स, मायॉट, कॉमोरो आणि मादागस्कर ही बेटे या संघाची सदस्य आहेत. एकमेकांचे स्पर्धक बनण्यापेक्षा आपला संपूर्ण प्रदेश हे एकच सामुदायिक पर्यटन क्षेत्र म्हणून ते संयुक्त रीत्या व भागीदारीत विकसित करण्याचा निर्णय या संघाने घेतलेला आहे. एकच व्यापार चिन्ह, प्रमाणानुसारी काटकसरी आणि सुलभ व नियमित आंतर-बेटीय प्रवास सुविधा देऊन आपल्या प्रदेशात पर्यावरणीय पर्यटनाचा विकास करणे, ही या संघाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. या प्रदेशात येऊ इच्छिणार्‍या पर्यटकांसाठी वेगवेगळ्या सवलती दिल्या जातात. उदा., प्रवेश सुलभता, आंतर-बेटीय सुलभ वाहतूक सुविधा, मागणीनुसार परिक्रमा सुविधा इत्यादी. परिणामत: या प्रदेशातील पर्यटन व्यवसाय वाढला असून त्यामुळे येथील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि पर्यावरणीय विकासावर सकारात्मक परिणाम झालेले आढळतात; तर दुसर्‍या बाजूला वाढत्या पर्यटन व्यवसायामुळे येथील नैसर्गिक संसाधने, उपभोगाचा आकृतिबंध, सामाजिक जीवनप्रणाली यांवर नकारात्मक परिणाम झालेले आहेत. येथे सर्व प्रकारचे प्रदूषण वाढले आहे. त्यासाठी पर्यटन व्यवसायाचे शाश्वत नियोजन व व्यवस्थापन गरजेचे आहे. तसे झाले, तर पर्यटन व्यवसायाचे सकारात्मक व शाश्वत परिणाम दिसून येतील.

भारताने आपल्या अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यांच्या किनार्‍यांवर, तसेच अरबी समुद्रातील लक्षद्वीप आणि बंगालच्या उपसागरातील अंदमान व निकोबार या द्वीपसमूहांवर विविध सुखसुविधांसह अनेक पर्यटनस्थळे विकसित केली आहेत. या पर्यटन स्थळांना दरवर्षी देश-विदेशांतून असंख्य पर्यटक भेटी देतात.

समीक्षक : नामदेव स. गाडे