अनुरूपादेवी : (९ सप्टें १८८२- १९ एप्रिल १९५८). ब्रिटीश राजवटीच्या काळातील प्रसिद्ध बंगाली कादंबरीकार, कवयित्री आणि समाजसेविका. त्यांच्या कादंबऱ्या वाचकांमध्ये लोकप्रिय झाल्यामुळे अल्पावधीतच त्यांना ‘उपन्यास सम्राज्ञी’ ही उपाधी प्राप्त झाली होती. त्यांच्या वडिलांचे नाव राय मुकुंददेव मुखोपाध्याय. प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व लेखक भुदेव मुखोपाध्याय हे त्यांचे आजोबा होत. पतीचे नाव शेखरनाथ बंदोपाध्याय होते. आजारामुळे त्यांचे शिक्षण उशिरा आणि घरगुती पद्धतीनेच झाले. आजोबांचा रामायण आणि महाभारत या महाकाव्यांचा चांगला अभ्यास होता. या महाकाव्यांचेच त्यांच्यावर बालवयात संस्कार झाले.

घरातील अनुकूल वातावरणामुळे प्रथमपासून त्यांना साहित्याची आवड होती. मोठी बहिण संस्कृत अभ्यासक होती आणि ती कविता लिहित असे. या सर्व संस्कारांचा अनुरूपादेवी यांच्यावर प्रभाव पडला. त्यांनी संस्कृत आणि हिंदी या भाषांतील साहित्याचा आणि पाश्चात्य साहित्य आणि तत्त्वज्ञान यांचा अभ्यास केला. यामधूनच त्यांच्या साहित्यवृत्तीचा विकास झाला. अनुरूपादेवी यांचे प्रकाशित साहित्य पुढीलप्रमाणे : कादंबरी – तिलाकुठी (१९०६), पोष्यपुत्र (१९१२),बागदोत्ता (१९१४), ज्योतीहारा (१९१५), मंत्रशक्ति (१९१५), रामगड (१९१८),पाथेर साथी (१९१८), रंगशंख (१९१८), महानिशा (१९१९), मा (१९२०), उत्तरायण (१९२३) इत्यादी. बहिण स्वरूपादेवी आणि मैत्रीण निरुपमादेवी यांच्यासमवेत अनुरूपादेवी यांचा लेखनप्रवास सुरू झाला होता. त्याकाळात शरच्चंद्र चतर्जी या महान लेखकाचा प्रभाव आणि बोलबाला बंगाली साहित्यावर होता. बंगाली साहित्यातील त्याकाळातील लेखन हे पुरुषकेंद्री होते. अशावेळी अनुरूपादेवी यांनी स्त्रियांच्या प्रश्नांना प्रमाण आणि मुख्य मानून लेखन केले. बालविवाह, सतीप्रथा, हुंडापद्धती आणि याशिवाय स्त्री जन्माला दुय्यमत्त्व देणारे प्रश्न मांडून त्यांनी कादंबरीलेखन केले. ही बाब बंडखोरीपेक्षा बंगाली साहित्याला नवी दिशा देणारे ठरली. शरच्चंद्र चतर्जी यांच्या काळी लेखक – लेखिकांची जी एक प्रभावळ निर्माण झाली, तीत अनुरूपादेवींचे स्थान बरेच वरचे होते. त्यांच्या साहित्य योगदानासाठी त्यांना कुन्तलीन पुरस्कार, श्री भारतधर्म महामंडळ (१९१९), जगत राणी सुवर्ण पदक (१९२३) इत्यादी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

संदर्भ :