मुखोपाध्याय, सुभाष : (१२ फेब्रुवारी १९१९ – ८ जुलै २००३). सुप्रसिद्ध बंगाली साहित्यिक. त्यांचा जन्म कृष्णा नगर, बंगाल प्रेसिडेन्सी इथे झाला होता. ते आपल्या समकालीन सुकांत भट्टाचार्य यांच्या प्रमाणे किशोरावस्थेपासूनच श्रमिक आंदोलनात सक्रीय होते. ते सामाजिक न्यायाप्रती प्रतिबद्ध होते. पदवी प्राप्त केल्यावर ते औपचारिकरित्या १९४१ मध्ये कम्युनिस्ट पार्टीमध्ये सामील झाले होते. त्यांनी क्रांतीचे गुणगान करणारी गीते, कविता आणि गद्यलेखन केले. १९४० मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह पदातिक  प्रकाशित झाला होता. अनेक समीक्षक या काव्यसंग्रहाला आधुनिक बंगाली कवितेच्या विकासातील मैलाचा दगड मानतात. १९४० चे दशक हे विश्वयुद्ध, दुष्काळ, फाळणी, सांप्रदायिक दंगे यांनी व्यापलेले होते. सुभाष यांनी त्यावेळची कवीपरंपरा तोडली आणि सामान्य माणसाला जाणवणारी निराशा, अपेक्षाभंगाचे दु:ख याला आपल्या कवितेतून वाट करून दिली होती. ते आयुष्यभर बंगाली लोक, बंगाली संस्कृती, याची पाठराखण करीत राहिले. ते अँटी- फासीवादी रायटर्स आणि आर्टिस्ट असोसिएशन या संघटनांच्या नेत्यांपैकी एक होते. मार्च १९४२ मध्ये सोमेन चंदा या लेखक मित्राच्या हत्येविरुद्ध आवाज उठवणाऱ्यामध्ये ते प्रमुख होते. १९८२ पर्यंत ते कम्युनिस्ट पार्टीशी संबंधित होते. त्यांनी राजकीय कैदी म्हणून तुरूंगवास देखील भोगला होता. १९५१ मध्ये तुरुंगातून सुटून आल्यावर त्यांनी मजुरांसाठी एक नियतकालिक काढले होते. १९५१ मध्येच त्यांनी गीता मुखोपाध्याय यांच्याशी लग्न केले होते. त्याही प्रसिद्ध लेखिका होत्या. त्यांना तीन मुली होत्या.तर एक मुलगा त्यांनी दत्तक घेतला होता. १९८२ मध्ये त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला आणि ते आनंद बाजार पत्रिका  या नियतकालीकाशी जोडले गेले होते. तोपर्यंत मार्क्सच्या सिद्धांतावर आधारित  भूतेर बेगार  हा रोजनबर्ग यांच्या पत्रांचा अनुवाद आणि परिचय  संपादन इतकेच त्यांचे योगदान होते.

पहिला काव्यसंग्रह पदातिक  प्रकाशित झाल्यावर एक जनकवी म्हणून उदयाला आलेले सुभाष मुखोपाध्याय यांच्या अग्निकोण (१९४८), जत दुरेई जाई (१९६२) आणि काल मधुमास (१९६९) या काव्यसंग्रहातून त्यांची सशक्त अभिव्यक्ती समोर आली. जनजीवनात सहभागी होणाऱ्या या कवीला काळाचा प्रवक्ता बनण्याचे श्रेय काल मधुमास या संग्रहाने दिले. अग्निकोण  या दुसऱ्या कवितासंग्रहात कवीने लाखो लोकांचे, अग्नीच्या ज्वाळांचे, अंध:काराचे आवरण भेदण्याचे, जमीन सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी स्वप्न पाहिले आहे. चिरकुट  (१९५०) मध्ये बंगाल मधील दुष्काळाचे चित्रण केले गेलेय. या कविता त्यांनी तुरुंगात असताना लिहिल्या होत्या. धर्मेर कल  (१९९१) या कविता संग्रहात स्वप्न आणि निराशा, वासना आणि तृष्णा, हास्य आणि कारुण्य,  सुख आणि दु:ख  यांचे परस्पर संतुलन आहे. त्याची मांडणी जरी भिन्न प्रकारे केली गेली असली तरीही या अभिव्यक्तीतही दीन दुबळ्या वर्गाचीच वकीली केलेली आहे. त्यांच्या जत दूर जाई  या काव्यसंग्रहातून विचार, अनुभूतींचा प्रभाव स्पष्टपाने जाणवतो. त्यांचे इतर प्रमुख काव्यसंग्रह आहेत – काल मधुमास  (१९६६), ऐ भाई  (१९७१), छेले गेछे बने  (१९७२), एकटु पा चालिऐ भाई (१९७९), जल सईने (१९८१) हे होत. ५० वर्षापेक्षा जास्तकाल ते कविता लिहित होते. त्यांच्या कवितेतून मानवतेविषयी आपुलकी असणारे भावूक ह्रदय आपल्याला भेटत राहते. देशविदेशात अनेकवेळा साहित्यिक कारणासाठी प्रवास करणारे सुभाषदा आपल्या देशातील अत्यंत लोकप्रिय कवींपैकी एक होते. उपरोध, म्हणी- वाक् प्रचाराचा उपयोग, गद्यात्मक शब्दावलीचा आकस्मिक प्रयोग, सहज स्वाभाविक संवाद शैली आणि प्रतिमांचा योग्य उपयोग या सगळ्या गोष्टी त्यांच्या कवितेत आढळतात. १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांची कविता काहीशी व्यक्तिगत झाली होती. ते कवितेतून आत्मनिरीक्षणे ही नोंदवू लागले होते.

कवितेबरोबरच कादंबरी, प्रवासवर्णन, अनुवाद इत्यादी अनेक साहित्यप्रकारात त्यांची जवळजवळ ५० पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीत प्रतिभा आणि सामाजिक जाणीव यांचे अद्भुत सामंजस्य आहे. त्यामध्ये  ४ कादंबऱ्या, १४ कवितासंग्रह, ४ प्रवासवर्णने, ७ लहान मुलांसाठीची पुस्तके आणि १२ अनुवादित ग्रंथ आहेत. अनुवादात निजाम हिकमत आणि पाब्लो नेरुदा यांच्या कविता आहेत. लेखकाच्या रचनावैविध्याचा परिचय यातून होतो. १९६० च्या दशकात त्यांनी संदेश  या बंगाली मधील लहानमुलांच्या मासिकासाठी सत्यजित राय याच्या बरोबर संपादनात सहकार्य केले होते.

जत दुरेई जाई (कविता संग्रह) साठी साहित्य अकादमी पुरस्कार (१९६४), आफ्रो-एशियाई लोटस पुरस्कार (१९७७), कुमारन् आशन पुरस्कार (१९८२), आनंद पुरस्कार (१९८४) आणि कबीर सन्मान (१९८७) प्राप्त झालेला आहे. भारतीय साहित्यातील त्यांच्या अतुल्य योगदानाबद्दल त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते (१९९१).

८ जुलै २००३ मध्ये त्यांचे कोलकाता इथे निधन झाले.

संदर्भ :

  • http://sahitya-akademi.gov.in/library/fellowship_pdf/Subhas%20Mukhopadhyay.pdf