पर्जन्य, वारा व सौरऊर्जा या वातावरणीय घटकांच्या सागरी पृष्ठभागाशी होणाऱ्या आंतरक्रिया, महासागरी पाण्याचे स्रोत आणि खोल सागरी अभिसरण प्रवाह यांच्या अभ्यासावरून हिंदी महासागरातील जलविज्ञानविषयक वैशिष्ट्यांची माहिती प्राप्त झाली आहे. या सर्वांच्या परिणामांतून हिंदी महासागरात पाण्याचे वेगवेगळे आडवे थर निर्माण होतात. त्या प्रत्येक थराचे तापमान आणि त्यातील पाण्याची लवणता भिन्न असते. परिणामतः भिन्नभिन्न घनतेच्या जलराशी निर्माण होतात. जास्त घनतेच्या जलराशी खालच्या बाजूला व त्यावर हलक्या जलराशी अशी रचना तयार होते. ऋतू, अक्षांश आणि पृष्ठीय अभिसरण प्रवाह यांनुसार पृष्ठीय पाण्याच्या तापमानात तफावत आढळते. पृष्ठीय पाण्याची लवणता ही वर्षण, बाष्पीभवन आणि नद्यांचा पाणलोट यांच्यावर अवलंबून असते. या सर्वांच्या परिणामांतून महासागरी प्रवाह निर्माण होतात. महासागरातील आणि समुद्रातील पाणी स्थिर नसून भरती-ओहोटी, सागरी लाटा आणि सागरी प्रवाह अशा तीन प्रकारच्या हालचाली होत असतात. त्यांपैकी सागरी प्रवाह ही प्रमुख हालचाल होय. सागरी प्रवाह म्हणजे निश्चित दिशेने होणारी सागरजलाची हालचाल. सागरी प्रवाह मार्गाने पाणी एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे वाहत असते. तसेच सागरी प्रवाहांमुळे सागरपृष्ठापासून सागरतळापर्यंतच्या पाण्यात अभिसरण चालू असते.

पृष्ठीय प्रवाह : सागरपृष्ठाशी वाऱ्याचे घर्षण होऊन महासागरी पृष्ठीय अभिसारी प्रवाह निर्माण होतात. हिंदी महासागरातील सागरी प्रवाहांची दिशा येथून वाहणाऱ्या वाऱ्याच्या दिशेला अनुसरून आढळते. मोसमी प्रदेशातील पृष्ठीय अभिसारी प्रवाहांच्या दिशेत ऋतूनुसार दर सहा महिन्यांनी बदल होऊन ते बरोबर विरुद्ध दिशेने वाहू लागतात. त्यामुळे एकमेकांच्या विरुद्ध अशा दोन अर्धबंदिस्त वलयाकार प्रवाहप्रणाली निर्माण होतात. विषुववृत्ताच्या उत्तर भागातील सागरी प्रवाह जुलैमध्ये नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांना अनुसरून ईशान्य दिशेत, तर जानेवारी महिन्यात ईशान्य मोसमी वाऱ्यांना अनुसरून नैर्ऋत्य दिशेत वाहू लागतात. भारतीय उपखंडामुळे येथील प्रवाहप्रणालीचे हे वेगळेपण निर्माण झाले आहे. ईशान्य मोसमी वाऱ्यांच्या काळात अरबी समुद्रात अपसव्य (घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध) दिशेत वाहणारा दुर्बल सागरी प्रवाह, तर बंगालच्या उपसागरात सव्य (घड्याळाच्या काट्याच्या दिशेला अनुसरून) दिशेत वाहणारा प्रबळ प्रवाह निर्माण होतो. याउलट, नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या काळात या दोन्ही समुद्रांतील प्रवाहांची दिशा ईशान्य मोसमी वाऱ्यांच्या काळात असलेल्या दिशेच्या बरोबर विरुद्ध होते. या काळात अरबी समुद्रात उबदार व थंड प्रवाहांच्या दरम्यान भोवरे निर्माण होतात. ईशान्य मोसमी वाऱ्यांच्या काळात श्रीलंकेच्या दक्षिणेस, उत्तर विषुववृत्तीय प्रवाह पश्चिम दिशेने वाहत जातो. पुढे पूर्व आफ्रिकेतील सोमालियाच्या किनाऱ्याजवळ तो दक्षिणेस वळतो आणि त्यानंतर २° द. ते १०° द. अक्षवृत्तांच्या दरम्यान पुन्हा विषुववृत्तीय प्रतिप्रवाह म्हणून तो पूर्वेस वाहत जातो. तसेच या काळात या प्रवाहाच्या खाली सुमारे १५० मी. खोलीवरून विषुववृत्तीय अधःप्रवाह म्हणून पूर्वेस वाहत असतो. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या काळात उत्तर विषुववृत्तीय प्रवाह उलट दिशेत वळून बळकट मोसमी प्रवाह म्हणून पूर्वेस वाहतो. दक्षिणेस १०° द. अक्षवृत्तापर्यंत मोसमी प्रभाव राहतो. अरबी समुद्राच्या पश्चिम भागात सोमाली प्रवाह उन्हाळ्यात आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळून उत्तरेकडे वाहतो, तर हिवाळ्यात त्याची दिशा बरोबर विरुद्ध बनते.

दक्षिण गोलार्धात व्यापारी वाऱ्यांच्या प्रभावामुळे दक्षिण अटलांटिक व दक्षिण पॅसिफिक प्रमाणेच हिंदी महासागरातही भोवऱ्यासारखे चक्राकार सागरी प्रवाह आढळतात. १०° द. ते २०° द. अक्षवृत्तांदरम्यानच्या आग्नेय व्यापारी वाऱ्यांच्या प्रभावक्षेत्रात पूर्व-पश्चिम दिशेत जाणारा ‘दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह’ आढळतो. पश्चिमेस वाहत गेल्यावर मादागास्कर बेटाजवळ या प्रवाहाच्या दोन शाखा बनतात. त्यांपैकी एक शाखा मादागास्कर बेटापासून उत्तरेस गेल्यानंतर दक्षिणेस वळून आफ्रिकेची मुख्यभूमी आणि मादागास्कर यांदरम्यानच्या मोझँबीक चॅनेलमधून मोझँबीक नावाने दक्षिणेस जाते. दक्षिण आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळ प्रबळ व अरुंद (सुमारे ९५ किमी.) बनलेला हा प्रवाह अगुल्हास नावाने ओळखला जातो. त्यानंतर आफ्रिकेच्या दक्षिण टोकाजवळ तो पूर्ववाही होऊन ४५° द. अक्षवृत्ताच्या दक्षिणेस ‘अंटार्क्टिक परिध्रुवीय प्रवाहा’ला मिळतो. दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहाची दुसरी शाखा मादागास्कर बेटाच्या पूर्व किनाऱ्याजवळून दक्षिणेस जाऊन पुन्हा ती वक्राकार दिशेत पूर्वेस वळून ४०° ते ४५° द. अक्षवृत्तांदरम्यान ‘दक्षिण भारतीय प्रवाह’ या नावाने वाहते. उत्तर विषुववृत्तीय व दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहांच्या दरम्यान पश्चिम-पूर्व दिशेत वाहणारा ‘विषुववृत्तीय प्रतिप्रवाह’ आढळतो. हिंदी महासागराच्या पूर्व भागात प्रवाहप्रणाली अविकसित आहे; परंतु ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनाऱ्याजवळ दक्षिण भारतीय प्रवाहातूनच पुढे आलेला प्रवाह ‘पश्चिम ऑस्ट्रेलियन प्रवाह’ या नावाने उत्तरेस वाहत जातो. तेथे काही अंशी भोवऱ्याच्या स्वरूपात हा प्रवाह वाहतो. फक्त ‘अंटार्क्टिक परिध्रुवीय प्रवाह’ महासागराच्या पृष्ठभागावर पोहोचतो. अगुल्हास प्रवाहाचा विस्तार सुमारे १,२०० मी., तर सोमाली प्रवाहाचा विस्तार सुमारे ८०० मी. खोलीपर्यंत असतो. इतर प्रवाह ३०० मी. पेक्षा अधिक खोलीपर्यंत पोहोचू शकत नाहीत. इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सभोवतालच्या सागरी भागातून पॅसिफिक महासागरातील पाणी हिंदी महासागरात येते, तर हिंदी महासागरातील पाणी आफ्रिकेच्या दक्षिणेकडून अटलांटिक महासागराकडे वाहत जाते.

खोल पाण्यातील अभिसरण प्रवाह : पृष्ठीय सागरी प्रवाहांच्या प्रभावाखाली पाण्याची मंद व अनियमित हालचाल आढळते. पर्शियन आखात व तांबडा समुद्र यांमधील अधिक लवणतेचे पाणी अरबी समुद्रमार्गे हिंदी महासागराला येऊन मिळते. हे पाणी पृष्ठीय कमी लवणतेच्या पाण्याखाली जाऊन  सुमारे ६०० ते १,००० मी. खोलीच्या दरम्यान उत्तर भारतीय उच्च लवणमय मध्यस्थ जलभाग तयार होतो. या थराचा विस्तार पूर्वेस बंगालच्या उपसागरात तसेच दक्षिणेस मादागास्कर व सुमात्रा बेटांपर्यंत असतो. या थराखाली सुमारे १,५०० मी. खोलीपर्यंत अंटार्क्टिक मध्यस्थ जलराशी;  तर १५०० ते ३,००० मी. खोलीदरम्यान उत्तर अटलांटिक खोल सागरी प्रवाह (प्रवाहाच्या उगमस्थानावरून दिलेले नाव) आढळतो. सुमारे ३,००० मी. पेक्षा अधिक खोलीवर अंटार्क्टिक तलजलराशी आढळते. हा थंड व दाट थर अंटार्क्टिक परिध्रुवीय प्रदेश या उगमस्थानापासून हळूहळू उत्तरेकडे सरकतो. हा मार्ग जवळजवळ ऑक्सिजन न्यूनतेचा पट्टा बनतो. अटलांटिक व पॅसिफिक महासागरांप्रमाणे हिंदी महासागरात तळपाण्याचे स्वतंत्र स्रोत नाहीत.

ऊर्ध्वगामी प्रवाह : ऋतूनुसार वाहणाऱ्या मोसमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे हिंदी महासागरात निर्माण होणारे ऊर्ध्वगामी प्रवाह हा हंगामी आविष्कार आहे. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या काळात सोमालीजवळचा किनारा, अरबी समुद्राचा किनारा आणि जावा बेटाच्या दक्षिण भागात ऊर्ध्वगामी अभिसरण प्रवाह आढळतात. यांची सर्वाधिक तीव्रता ५° ते ११° उ. अक्षवृत्तांच्या दरम्यान असते. येथील पृष्ठीय उबदार पाण्याची जागा सुमारे १४° से. तापमानाच्या पाण्याने घेतली जाते. ईशान्य मोसमी वाऱ्यांच्या काळात भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ प्रबळ ऊर्ध्वगामी अभिसरण प्रवाह निर्माण होतात. याच काळात ५° द. अक्षवृत्ताजवळ मध्यस्थ महासागरी ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतो. या अक्षवृत्ताच्या उत्तरेकडील उत्तर विषुववृत्तीय प्रवाह आणि दक्षिणेकडील विषुववृत्तीय प्रतिप्रवाह हे दोन प्रवाह एकमेकांच्या विरुद्ध दिशेत वाहतात.

समीक्षक : नामदेव स. गाडे