पूर्वीच्या काळी ब्रिटिश, डच व पोर्तुगीजांनी मसाल्याचे पदार्थ, रेशीम व इतर आशियाई उत्पादनांचा व्यापार विकसित केला. त्या दृष्टीने त्यांनी हिंदी महासागराच्या किनारी भागांत आणि बेटांवर आपल्या वसाहती व व्यापारी बंदरांची स्थापना केली. हिंदी महासागराच्या भोवतालच्या देशांची स्वातंत्र्योत्तर काळात प्रामुख्याने १९५० च्या दशकापासून आर्थिक प्रगती सुरू झाली; परंतु त्यांचा व्यापार त्यांच्यावर पूर्वी ज्या देशांची सत्ता होती, त्या देशांशी तसाच चालू राहिला. या किनारी प्रदेशातील देशांचे आपापसांतील राजकीय संबंध फारसे सलोख्याचे नसल्यामुळे प्रादेशिक व्यापार मर्यादित राहिला. उदा., भारत-पाकिस्तान, भारत-श्रीलंका. येथील देश या महासागरी मार्गाने प्रामुख्याने कच्च्या मालाची निर्यात करून निर्मित वस्तूंची आयात करतात. हिंदी महासागर व त्यालगतचे काही देश खनिज तेल उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांच्या खनिज तेलाची वाहतूक व व्यापार या महासागरातून चालतो. येथील तेल उत्पादक देश या महासागरी मार्गानेच यूरोप, उत्तर अमेरिका व पूर्व आशियाई देशांकडे खनिज तेल पाठवितात. विसाव्या शतकात या महासागरातून होणाऱ्या खनिज तेल वाहतुकीत मोठी वाढ झाली आहे. त्याशिवाय लोहखनिज, दगडी कोळसा, रबर, चहा यांची वाहतूक या महासागरातून होते. याच महासागरातील मार्गाने ऑस्ट्रेलिया, भारत आणि दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक हे देश जपानकडे लोहखनिजाची निर्यात करतात, तर ऑस्ट्रेलिया हा देश ग्रेट ब्रिटनकडे दगडी कोळशाची निर्यात या मार्गाने करतो. मुंबई, कोलकाता (भारत), दारेसलाम (टांझानिया), दरबान (दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक), पर्थ (ऑस्ट्रेलिया) ही या महासागर किनाऱ्यावरील प्रमुख बंदरे आहेत.

हिंदी महासागरातून होणाऱ्या वाहतुकीचे प्रकार : (१) डाऊ वाहतूक : लहान त्रिकोणाकृती शिडांच्या जहाजांना डाऊ असे म्हणतात. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीपासून मोठ्या प्रमाणावर या जहाजांचा वापर केला जात आहे. डाऊंद्वारे केला जाणारा व्यापार प्रामुख्याने हिंदी महासागराच्या पश्चिम भागात चालतो. आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरे आणि अरेबियन द्वीपकल्पावरील बंदरे तसेच भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील मुंबई, मंगलोर इत्यादी बंदरे यांदरम्यान विविध उत्पादनांची वाहतूक डाऊंद्वारे केली जाते. या जहाजांच्या वाहतुकीसाठी मोसमी वाऱ्यांचा लाभ घेतला जातो. बहुतांश डाऊंची जागा आता मोठ्या व शक्तिशाली जहाजांनी तसेच पर्यायी भूमार्गांनी घेतली असून उर्वरित डाऊ साहाय्यकारी इंजिनांनी सुसज्ज केलेले आहेत.

(२) सुक्या मालाची वाहतूक करणारी जहाजे : हिंदी महासागरातून सुक्या मालाची वाहतूक करणाऱ्या जहाजांमध्ये अलीकडे कंटेनर बसविण्यात आले आहेत. बहुतांश कंटेनरयुक्त जहाजे प्रामुख्याने केप ऑफ गुड होप मार्ग, सुएझ कालवा, तांबडा समुद्र आणि मलॅका सामुद्रधुनीमार्गे वाहतूक करतात. अशा जहाजांच्या वाहतुकीच्या दृष्टीने आफ्रिकेच्या किनाऱ्यावरील दरबान (द. आफ्रिका), मापूतो (मोझँबीक), पोर्ट सूदान (सूदान), जिबूती (जिबूती), तांबडा समुद्रकिनाऱ्यावरील एडन (येमेन), भारतीय उपखंडातील कराची, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता, सिंगापूर, श्रीलंकेतील कोलंबो, ऑस्ट्रेलियातील मेलबर्न, पोर्ट अ‍ॅडिलेड एनफिल्ड व पोर्ट हेडलँड इत्यादी बंदरे महत्त्वाची आहेत. दक्षिण आफ्रिका आणि भारत यांची आपली स्वतःची व्यापारी जहाजे आहेत; तथापि किनाऱ्यावरील इतर अनेक देशांकडे अगदी मोजकी व्यापारी जहाजे आहेत. त्यामुळे अशा देशांना माल वाहतुकीसाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागते. राशिमालवाहू जहाजांद्वारे अवजड सुक्या मालाची वाहतूक केली जाते. अशा जहाजांद्वारे मुख्यतः भारत, दक्षिण आफ्रिका आणि पश्चिम ऑस्ट्रेलियातील लोहखनिज जपान व यूरोपकडे पाठविले जाते. पश्चिम ऑस्ट्रेलियापासून सूंदा सामुद्रधुनीमार्गे दक्षिण चिनी समुद्रातून जपानकडे जाणारा सागरी मार्ग महत्त्वाचा आहे.

(३) तेलवाहू जहाजे : पर्शियन आखातातून निघालेली तेलवाहू जहाजे मुख्यतः दोन दिशांना जातात. त्यांपैकी काही जहाजे उत्तर हिंदी महासागरातून मलॅका सामुद्रधुनीकडे, तर काही आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरून दक्षिणेकडे जाऊन केप ऑफ गुड होपला वळसा घालून पुढे जातात. एडनच्या आखातातून केल्या जाणाऱ्या जहाज वाहतुकीला सोमालियन चाचांचा नेहमीच उपद्रव झालेला आहे. सुएझ कालवा इ. स. १८६९ मध्ये वाहतुकीला खुला झाल्यापासून यूरोप व अतिपूर्वेकडील देश यांदरम्यानचा जवळचा मार्ग उपलब्ध झाला. त्यामुळे खर्चात आणि वेळेतही बचत झाली. या कालव्यामुळे हिंदी महासागर किनाऱ्यावरील बंदरे दक्षिण यूरोप व उत्तर आफ्रिकेतील बंदरांशी जोडली गेली आहेत; परंतु सुएझ कालव्याच्या क्षमतेपेक्षा तेलवाहू जहाजांचे आकार बरेच मोठे झाले असल्यामुळे तेल वाहतुकीच्या दृष्टीने या कालव्याचे पूर्वी असलेले महत्त्व आता कमी झाले आहे. त्यामुळे पर्शियन आखातातून यूरोपकडे तेल वाहून नेणाऱ्या मोठमोठ्या जहाजांना केप ऑफ गुड होप या लांबच्या मार्गाने जावे लागते. तसेच पूर्वेस जपानकडे जाणाऱ्या मोठ्या जहाजांना मलॅका व सिंगापूर सामुद्रधुनीऐवजी लेसर सूंदा बेटांपैकी बाली आणि लाँबॉक बेटांदरम्यानच्या लाँबॉक सामुद्रधुनीमार्गे जावे लागते.

समीक्षक : माधव चौंडे