महाराष्ट्रातील मध्ययुगीन सागरी पुरातत्त्वीय स्थळ. हे स्थळ रत्नागिरी जिल्ह्यात वाशिष्टी नदीच्या उत्तर किनाऱ्यावर मुखापाशी असून येथे प्रामुख्याने मध्ययुगीन अवशेष मिळाले आहेत. दाभोळ हे चौदाव्या-पंधराव्या शतकापासून पर्शियन आखात व भूमध्य सागराच्या परिसरातील बंदरांशी व्यापारासाठी वापरात होते. दाभोळ बंदराच्या सुरक्षिततेसाठी किल्ला बांधला गेला होता. या किल्ल्याचे अवशेष चंडीकादेवी मंदिराजवळ आहेत. विजापूरच्या अदिलशाही कालखंडात या बंदराचा उपयोग हज यात्रेला जाण्यासाठी केला जात असे, अशी मौखिक परंपरा आहे. तसेच दाभोळ बंदर १४ व्या शतकापासून वापरात होते व येथून लोक मक्केला जात असल्याचे उल्लेख पंधराव्या शतकातील पोर्तुगीज लेखक बार्बोसा याने केले आहेत.
दाभोळ खाडीतील गाळ काढताना २००३ मध्ये तेथे दगडी नांगर आढळून आले. त्यातील एका नांगराच्या भोकात लाकडाचे अवशेष मिळाले. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानच्या (NIO) पुरातत्त्वज्ञांनी या नांगराचा सखोल अभ्यास केला. हे नांगर ‘इंडो-अरबʼ प्रकारचे असून असे नांगर सौराष्ट्र किनाऱ्यावर द्वारका, बेट द्वारका, विसावाडा आणि मियानी या ठिकाणी मिळालेल्या नांगरांप्रमाणे आहेत. बसॉल्ट दगडाचा सर्वांत मोठा नांगर २३५ सेंमी. लांब तर ३८ सेंमी. रुंद आहे. लाकडाचे रेडिओकार्बन कालमापन केल्यावर ते ६५४ ते ५२४ वर्षांपूर्वीचे असल्याचे निष्पन्न झाले व दाभोळ बंदर चौदाव्या-पंधराव्या शतकात वापरात होते याला पुरातत्त्वीय आधार मिळाला.
वाशिष्टी नदीच्या मुखाजवळ २००३ मध्ये केलेल्या पुरातत्त्वीय सर्वेक्षणात सध्याच्या धक्क्याच्या जवळ जुन्या धक्क्याचे अवशेष दगडी रचनांच्या स्वरूपात मिळाले.
दाभोळ येथे लोयळेश्वराच्या मंदिरात ब्रिटिश काळातील एका लोखंडी नांगराची पूजा केली जाते. स्थानिक मच्छीमार या नांगराला लोयळी असे म्हणतात.
संदर्भ :
- Gaur, A. S.; Sundaresh; Tripati, Sila & Vora, K. H. ‘Radiocarbon dates of the medieval period stone anchors from Dabhol, west coast of Indiaʼ, Current Science, 96 (2) : 299-302, 2009.
- Joshi, Sachin, A Study of Defence Architecture and Geopolitical Significance of Coastal and Hinterland Forts on the Konkan Coast, Maharashtra, Unpublished PhD. Thesis, Deccan College, Pune, 2014.
- Sundaresh; Gaur, A. S.; Tripati, Sila; Gudigar, P. & Bandodker, S. N. ‘Stone anchors from Bet Dwarka Island, Gujarat coast, India : Significance to historical period maritime activitiesʼ, Bulletin of the Australasian Institute for Maritime Archaeology, 26: 43-50, 2002.
- दाभोळ किल्ल्याचे अवशेष, छायासौजन्य, डॉ. सचिन जोशी.
समीक्षक : सचिन जोशी