गुजरातमधील समुद्री चाच्यांचे पुरातत्त्वीय स्थळ. खंबातच्या आखातात गोघा या प्राचीन बंदराजवळ सु. १० किमी. अंतरावर असून तेथे समुद्री चाच्यांची गढी आहे. या बेटाची लांबी सहा किमी. असून हे बेट खासगी मालकीचे आहे; तथापि बेटावर मानवी वस्ती नाही.

पिरम बेट, गुजरात.

इ. स. पहिल्या शतकातील पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी (Periplus Maris Erithrei) या ग्रंथात या बेटाचा उल्लेख ‘बेओनेस’ (Baeones) असा आहे. परंतु पिरम बेटावरची नियमित वस्ती मध्ययुगात झालेली दिसते. हे बेट चौदाव्या शतकापर्यंत दिल्लीच्या सुलतानांच्या ताब्यात होते. १३२५ मध्ये मोखाडाजी गोहिल या राजपूताने बेटावर किल्ला बांधला व बंड करून स्वतंत्रपणे कारभार करायला सुरुवात केली. मध्ययुगीन इतिहासकारांनी या मोखाडाजीचा उल्लेख ‘समुद्री चाचा’ (Pirate) असा केला आहे. मुहम्मद बिन तुघलकाने १३४७ मध्ये त्याचे बंड मोडून त्याचा नायनाट केला आणि गढीच्या भिंती पाडून टाकल्या; तथापि मोखाडाजीची स्मृती मौखिक परंपरेत टिकून आहे. आजही पिरम बेटाजवळून जाणारे हिंदू नाविक या मोखाडाजीला काहीतरी अर्पण केल्याशिवाय पुढे जात नाहीत. सन १३४७ नंतर दीर्घकाळ पिरम बेट ओसाड पडले होते. अठराव्या शतकाच्या मध्यात सुरतच्या मुल्ला मुहम्मद अली या व्यापाऱ्याने बेटावर पुन्हा एकदा गढी बांधली असल्याचा उल्लेख मिळतो. १८६५ मध्ये जुन्या गढीच्या दगडांचा वापर करून ब्रिटिशांनी सध्या अस्तित्वात असलेले दीपगृह बांधले.

पुरातत्त्वीय अवशेष, पिरम बेट, गुजरात.

राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानामधील पुरातत्त्वज्ञांनी पिरम बेटावर सागरी पुरातत्त्वीय संशोधन केले. भरती-आहोटीच्या क्षेत्रात त्यांना विविध पुरातत्त्वीय अवशेष मिळाले. त्यात भिंतीचे दगड, दरवाजांच्या दगडी खोबणी आणि पश्चिमेच्या बाजूस शिल्पांचे तुकडे व मंदिराचे दगड यांचा समावेश होता. केवळ किल्लाच नव्हे तर संपूर्ण बेटाला वेढणारी संरक्षक भिंत आढळली. या बेटाच्याजवळ असलेल्या गोघा या प्राचीन बंदराजवळ आणि हतब या ऐतिहासिक पुरातत्त्वीय स्थळाजवळ समुद्रात अनेक दगडी नांगर मिळाले होते. परंतु पिरम बेटापाशी नांगर किंवा नौकांचे कोणतेही अवशेष मिळाले नाहीत. त्यावरून असे दिसते की, या बेटापाशी नौका नांगरण्यासाठी योग्य जागा नसावी व त्याचा नियमित बंदर म्हणून वापर नव्हता. कदाचित ते फक्त चाचे लोकांचे आश्रयस्थान असावे.

 

 

संदर्भ :

  • Gaur, A. S. ‘Piram Island: Pirates Fort in the Gulf of Khambatʼ, Journal of Indian Ocean Archaeology, 5: 111-114, 2008.
  • Keller, Sara & Pearson, Michael N. Eds., Port Towns of Gujarat, Primus Books, Delhi, 2015.

                                                                                                                                                                                        समीक्षक : श्रीनंद बापट