एक आसनप्रकार. या आसनामध्ये शरीराचा आकार हा आपण एखाद्यास अभिवादन करत आहोत असा असतो, म्हणून या आसनास नमस्कारासन असे म्हणतात.

नमस्कारासन

कृती : आसनपूर्व स्थितीसाठी दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून दोन्ही हात दोन्ही मांड्यांजवळ ठेवून आरामात उभे रहावे. शिथिल स्थितीमधून दोन्ही पाय एकत्र घेताना पायाचे अंगठे, घोटे, गुडघे, मांड्या एकमेकांना स्पर्श करतील अशाप्रकारे सरळ उभे रहावे. पाठीचा कणा सरळ नैसर्गिक आकारात असावा. छाती आणि खांदे व्यवस्थित मागील बाजूस विस्तृत करावे. मान पाठीच्या कण्याला सरळ रेषेत ठेवावी. हनुवटी जमिनीला समांतर ठेवावी व दोन्ही हात कोपरात दुमडून तळहात एकमेकांवर छातीसमोर ठेवून नमस्कार स्थितीत ठेवावे. हात नमस्कार स्थितीत असताना दोन्ही हातांचा मनगटापासून कोपरापर्यंतचा भाग देखील जमिनीला समांतर असावा. अशाप्रकारे सरळ उभे राहून दोन्ही हात जोडून उभे रहावे. जोडलेल्या दोन्ही हातांचा स्पर्श छातीला करू नये म्हणजेच पाठीचा कणा सरळ व छाती विस्तृत राहते. दोन्ही पायांवर शरीराचा भार समान पद्धतीने तोलावा. आता श्वास नैसर्गिक पद्धतीने सुरू ठेवत डोळे सावकाश बंद करावेत व प्राणधारणेचा अभ्यास करावा. प्राणधारणा म्हणजेच श्वासावर लक्ष केंद्रित करणे. आपल्या क्षमतेनुसार आसनाचा अभ्यास करावा.

नमस्कारासनातून बाहेर येण्यासाठी प्रथम सावकाश डोळे उघडावे. छातीसमोर जोडलेले हात हळूवार शरीराच्या बाजूला मांड्यांना लागून सरळ सोडावेत व दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून शिथिल स्थितीत यावे.

मलासन (प्रणामासन)

लाभ : पाठीचा कणा सरळ ठेवून ताठ उभे राहण्याची व चालण्याची चांगली सवय लागते. पाठीचा कणा व त्यास जोडलेल्या नसांमध्ये रक्तप्रवाह सुरळीत राहतो. दोन्ही पायांवर तोल समान राखला गेल्यामुळे कोणत्याही एका बाजूला जास्त भार देऊन उभे राहण्याची व चालण्याची सवय हळूहळू सुधारते. टाचांची दुखणी, गुडघ्यांचा वाकडेपणा हळूहळू सुधारतो. शरीराचा तोल मानसिक एकाग्रतेने सावरला जातो त्यामुळे मानसिक एकाग्रता वाढते. शारीरिक मानसिक स्वास्थ्य लाभते.

पूर्वाभ्यास : ताडासन तसेच दोन्ही पाय एकत्र घेऊन समान तोल राखण्याचा पूर्वाभ्यास नमस्कारासनाच्या आधी करावा.

विविध प्रकार : नमस्कारासन हे बऱ्याच आसनांच्या आधी पूर्वस्थिती म्हणून केले जाते. नमस्कारासन हे दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून पूर्णपणे खाली बसून (मलासन) आणि नमस्कार स्थितीत हात ठेवूनही केले जाते. यास प्रणामासन असेही म्हणतात.

विधिनिषेध : संधीवात, मणक्यांचे आजार असल्यास, मानसिक अस्थिरता असल्यास नमस्कारासनाचा अभ्यास टाळावा.

 

संदर्भ :

  • Swami Satyananda Saraswati, Asana, Pranayama, Mudra, Bandha, Yoga Publication Trust, Munger, 2008.
  • www.yogapedia.com

समीक्षक : नितीन तावडे