एक आसनप्रकार. भद्र म्हणजेच जे शुभ आहे, कल्याणकारी आहे. भद्रासन हे ध्यानात्मक स्वरूपाचे आसन आहे. योग साधकांसाठी अध्यात्मिक दृष्ट्या अधिक शुभ, कल्याणकारी असे हे आसन असल्यामुळे या आसनास भद्रासन असे म्हणतात.

भद्रासन

कृती : आसनपूर्व स्थितीसाठी दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून हात शरीराच्या मागील बाजूस ठेवून डोके कोणत्याही एका बाजूला किंवा मध्ये ठेवून शिथिल स्थितीत जमिनीवरील आसनावर बसावे. शिथिल स्थितीतून भद्रासनात येण्यासाठी दोन्ही पाय एकत्र घ्यावे. दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवून व्यवस्थित दंडासन स्थितीत बसावे. आता उजवा पाय गुडघ्यात दुमडून उजव्या पायाची टाच जवळजवळ शिवणीपर्यंत (मूलाधारपर्यंत) येईल आणि गुडघा जमिनीवर राहील अशाप्रकारे ठेवावा. याच पद्धतीने डावा पाय गुडघ्यात दुमडून डावी टाच शिवणीच्या दिशेस व गुडघा जमिनीवर ठेवावा. म्हणजेच दोन्ही पायांचे तळवे बोटांपासून टाचांपर्यंत एकमेकांना स्पर्श करतील. उजव्या हाताने उजव्या पायाचे पाऊल व डाव्या हाताने डाव्या पायाचे पाऊल पकडावे व पाय अधिक शिवणीकडे घ्यावेत व पावले पकडून ठेवावीत. गुडघे जमिनीवर असतील. पाठ सरळ ठेवून हनुवटी जमिनीला समांतर असावी. छाती आणि खांदे मागील बाजूस घेऊन मान आणि पाठीचा कणा एका सरळ रेषेत असावा. आता सावकाश डोळे बंद करून नैसर्गिक श्वास सुरू ठेवावा व प्राणधारणा म्हणजेच श्वासावर लक्ष केंद्रित करावे. आसनाचा अभ्यास आपल्या क्षमतेनुसार करावा.

हे आसन सोडताना सावकाश डोळे उघडावे व हातांची पावलांवरची पकड सोडावी. सावकाश पाय गुडघ्यात सरळ करावे. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून हात मागील बाजूस ठेवून शिथिल स्थितीत बसावे.

भद्रासन

लाभ : हठप्रदीपिकेमध्ये भद्रासनाने सर्व व्याधींचा नाश होतो असे सांगितले आहे. पायांचे स्नायू आणि संबंधित नसांमध्ये रक्तप्रवाह सुरळीत होऊन स्नायू मजबूत होतात. पचनशक्ती वाढते. पाठीचा कणा नैसर्गिक स्थितीत राहण्यास मदत होते. मासिक पाळी संबंधित तक्रारी दूर होतात. प्रजनन संस्थेसंबंधित अवयव सुदृढ होतात, तसेच संबंधित रक्तप्रवाह वाढतो. स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती वाढते. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभते. गरोदरपणात भद्रासन उपयुक्त ठरते.

पूर्वाभ्यास : वृक्षासन, वीरासन, हनुमानासन, मलासन (प्रणामासन) या आसनांचा अभ्यास भद्रासनाचा पूर्वाभ्यास म्हणून करावा.

विविध प्रकार : भद्रासन हे बऱ्याचदा कपाळ पायाकडे टेकवून केले जाते. तसेच पाठीवर झोपून ‘सुप्त भद्रासन’ असेही केले जाते. बऱ्याच योगशाळांमध्ये भद्रासन मागे पाय दुमडून पावलांवर बसून गुडघ्यांमध्ये समोरून अंतर ठेवूनही केले जाते. भद्रासनास हठप्रदीपिकेमध्ये ‘गोरक्षासन’ असेही संबोधिले आहे. बऱ्याच योगशाळांमध्ये भद्रासनास ‘बद्धकोनासन’ असेही म्हणतात.

विधिनिषेध : संधीवात, गुडघ्याच्या तक्रारी, मणक्यांचे आजार, नितंब आणि पाठीचे स्नायू यांच्या तक्रारी असल्यास तसेच पोटासंबंधित गंभीर आजारात भद्रासनाचा अभ्यास टाळावा. शक्यतो योगासनांचा अभ्यास योगशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच करावा.

संदर्भ :

  • Encyclopedia of Traditional Asanas, Ed., Gharote M.L & others, The Lonavla Yoga Institute, Lonavla, 2006.
  • Gheranda Samhita, (English translation), translated by Rai Bahadur Sris Chandra Vasu, Sri Satguru Publication, Delhi, p.13.
  • Haṭhapradīpikā of Svatmarama, edited by Swami Digambarji & Pt. Raghunathashastri Kokaji, Kaivalyadham, S.M.Y.M Samiti, Lonavala, 2018.
  • Iyengar BKS, Light on Yoga, Schocken books, New York, 1966.

समीक्षक : नितीन तावडे