एक आसनप्रकार. वक्र म्हणजे वळविलेला किंवा पीळ दिल्याप्रमाणे डावीकडे किंवा उजवीकडे फिरविलेला. या आसनात मेरुदंडास पीळ दिला जातो म्हणून या आसनास वक्रासन असे म्हणतात. मत्स्येंद्रासन किंवा अर्धमत्स्येंद्रासन ही आसने करायला कठीण आहेत. पाठीच्या कण्याला वळविण्याचा सराव व्हावा, त्याची लवचिकता वाढावी, प्रौढांनाही करता यावे व मत्स्येंद्रासनाचे काही लाभ मिळावे म्हणून स्वामी कुवलयानंद यांनी हे आसन १९४० च्या दरम्यान विकसित केले. किरणटीका  या ग्रंथातील ५४ व्या श्लोकात वामदक्षिण-वक्रासन या नावाचाउल्लेख असला तरी मेरुदंड वळविण्याबद्दलची कृती त्यात दिलेली नाही. मत्स्येंद्रासन किंवा अर्धमत्स्येंद्रासन या कठिण आसनांना पर्याय व सोपी कृती यांमुळे आता वक्रासनाला सर्वदूर मान्यता मिळाली आहे.

वक्रासन

कृती : जमिनीवरील आसनावर दंडासनात पाठ ताठ ठेवून बसावे. उजवा पाय गुडघ्यात दुमडून त्याचे पाउल डाव्या गुडघ्याजवळ ठेवावे व गुडघा उभा ठेवावा. उजवा हात पाठीमागे नेऊन जमिनीवर ६ ते ९ इंच अंतरावर हाताचा पंजा ठेवावा. डावा हात उजव्या गुडघ्याच्या पलिकडे नेऊन हात खाली टेकत असेल तर टेकवावा; नसेल तर अधांतरीच ठेवावा. पाठीच्या कण्याला यावेळी उजवीकडे थोडा पीळ बसतो. तो आणखी वाढविण्यासाठी डोके उजवीकडून फिरवून मागे बघावे. स्थिर व शांतपणे या आसनांत १५ सेकंद ते १ मिनिट बसावे. आसन सोडताना डोके सरळ करावे. डावा हात काढून घ्यावा व सरळ बसावे. उजवा पाय खाली जमिनीवर सरळ ठेवावा. आता हीच कृती डाव्या पायाने सुरू करून पाठीच्या कण्याला डावीकडे पीळ द्यावा.

लाभ : या आसनात मेरुदंड डावीकडे व उजवीकडे हातापायांच्या आधारे वळविला जातो. डोकेही वळविले जाते व ही स्थिती थोडावेळ धरून ठेवल्याने मणक्यांना, त्यांच्या भोवतीच्या स्नायूंना चांगला ताणयुक्त व्यायाम मिळतो. तेथील मज्जासंस्थेसही चालना मिळते. पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते. पोटावर डाव्या व उजव्या बाजूने मांड्यांचा दाब पडतो. श्वसन थोडे उथळ व जलद होते. बद्धकोष्ठ व अग्निमांद्य यांसाठी हे आसन परिणामकारक आहे. हे आसन केल्याने उत्साह वाढतो. मानेचा त्रास असणारे लोकही हे आसन सहजतेने करू शकतात व यामुळे मानेचा त्रास कमी होतो.

विधिनिषेध : उभा ठेवलेला गुडघा नीट सरळ उभा ठेवावा. त्याला डावी-उजवीकडे झुकू देऊ नये. मागे वळताना वाकू नये. मागचा हात ताठ ठेवावा. त्याचे कोपर वाकवू नये. मागे ठेवलेला हात फार दूर ठेवल्यास धड मागे झुकते, म्हणून मागचा हात ६ ते ९ इंच इतकाच दूर ठेवावा. आसन सहजतेने व शांततेने करावे. घाई करू नये, तसेच खूप प्रयत्न करण्याचेही टाळावे.

                        समीक्षक : विनोद जोशी