सृष्टितील पदार्थ आणि तद्विषयक ज्ञान दोन्ही सत्य आहेत, असा या वादाचा कानमंत्र आहे. मानव, पशुपक्षी व भोवतालचा निसर्ग यांचे अस्तित्व स्वयंम आहे, परस्परसापेक्ष नाही. सृष्ट पदार्थांविषयी आपण विचार करू लागलो, म्हणजेच त्यांचे अस्तित्व निर्माण होते, हा युक्तिवाद बरोबर नाही. सृष्ट पदार्थांबद्दल कधीही अभ्यास झाला नसला, तरीही ते पदार्थ विद्यमान असतातच. मनुष्य व त्याच्या देहाबद्दल ज्ञान मिळविणे हे मानवी बुद्धीच्या आवाक्यातील गोष्ट आहे. अशा रीतीने मिळविलेले ज्ञान भासमान नसून प्रत्यक्ष वस्तूविषयी असते व त्याची सत्यता बाह्यसृष्टीतील अस्तित्वाशी ते ज्या प्रमाणात जुळत असेल, त्या प्रमाणात असते. ज्ञानाची सत्यता ज्ञान, सृष्ट पदार्थ व घटना यांचा पडताळा बघून ठरवायचे असते.

नितीनियम ठरविण्याची प्रवृत्ती मानवी स्वभावात जन्मताच असते. या प्रवृत्तीचे समाधान होणे आवश्यक आहे. आपली ध्येये व आपली वर्तणूक निसर्गनियम नितीशी सुसंगत आहेत. असा प्रत्यय प्रत्येक व्यक्तीला झाला पाहिजे. निसर्गसिद्ध नीतीच्या स्वरूपाचे योग्य आकलन होण्यासाठी मानवी स्वभाव व ऐतिहासिक संघटना यांचा विमर्शपूर्वक अभ्यास केला पाहिजे.

कोणत्याही धर्माची तत्त्वे वास्तववाद मान्य करीत नाही; परंतु या वादाचा या श्रद्धेला विरोध नाही. नाशवंत वस्तूंनी भरलेल्या ज्या विश्वात आपण राहतो, त्याला कोणीतरी नियंता असावा, असे या वादाचे अनुमान आहे. वास्तववादाच्या मते, शिक्षणाचे उद्दिष्ट निसर्गसिद्ध नीतीला अनुसरून आचरण करणाऱ्या व्यक्ती तयार करणे, हे आहे. हा हेतू सिद्ध होण्यासाठी इतिहास महत्त्वाचा आहे. शिक्षणाचे उद्दिष्ट बालकांना जीवनाचा हा हेतू समजावून देऊन त्याची साधना करण्यास समर्थ करणे, हे आहे. ज्या शिक्षकाची अशी श्रद्धा आहे, तोच शिक्षक आपले काम दीक्षित वृत्तीने करील. अशी दीक्षित वृत्ती शिक्षणात आदर्श साधण्यासाठी आवश्यक आहे. अशा निष्ठेने काम करणाऱ्या शिक्षकाला मुलांच्या अंत:करणातील चिरज्योती प्रज्वलित केल्याचे समाधान लाभू लागते. मानवी जीवनातून सध्या होणारे हे उच्चतम समाधान आहे. शिक्षण म्हणजे केवळ मौज व गंमत न मानता शिक्षणात शिस्त असावी, असे वास्तवादाचे मत आहे.

वास्तववादी विचारसरणीला पंधराव्या, सोळाव्या व सतराव्या शतकांत वेग मिळाला. शिक्षणक्षेत्रातल्या कृत्रिमतेविरुद्ध झालेली प्रतिक्रिया म्हणून जसा निसर्गवाद जन्माला आला, तसाच अभ्यासक्रमातील पुस्तकी, कृत्रिम व दुर्बोध विषयांना, ज्ञानाला विरोध म्हणून वास्तववाद अवतीर्ण झाला. पुनरुज्जीवनाच्या चळवळीनंतर यूरोपातील देशांना अभिजात ग्रीक साहित्याच्या अभ्यासाला भरती आली; परंतु कालांतराने हा उत्साह, हे चैतन्य मावळले व अभिजात साहित्याच्या रसास्वादाची जागा शाब्दिक, भाषाशास्त्रीय व व्याकरणविषयक चर्चा यांनी घेतली. या परिस्थितीविरुद्ध शैक्षणिक वास्तवाद महत्त्वाचा ठरतो. हे वास्तववादी तत्त्वज्ञान मानवनिष्ठ वास्तववाद, समाजनिष्ठ वास्तववाद आणि इंद्रियनिष्ठ वास्तववाद या तीन प्रकारांतून प्रकट झाले.

ध्येय : वास्तववादी शिक्षण हे सतत जीवनाभिमुख, व्यवहारापयोगी, वास्तवतेला धरून, परिस्थितीसापेक्ष, कालांचित, बदलत्या गरजांनुसार असावे. हर्बर्ट स्पेन्सर यांच्या मते, चारित्र्यनिर्मिती करणे व सभोवतालच्या जगाचे योग्य ज्ञान प्राप्त करणे, प्रत्येकास अर्थार्जनाचे शिक्षण देणे, यांसाठी व्यावसायिक शिक्षणाची सोय करणे, मानवाचा सर्वांगीण संतुलित विकास होण्यासाठी मदत करणे, मुलांमध्ये चैतन्य, कार्यशिलता, जबाबदारीची भावना निर्माण होणे, धैर्यशील बनविणे, बुद्धीचा विकास, विकासाची इच्छा निर्माण होणे, संवेदनशील होण्यास मदत करणे, इतरांच्या हक्कांची जाणीव निर्माण करणे इत्यादी वास्तवादी शिक्षणाची ध्येय होत. मुलांमध्ये आज्ञाधारकपणा, वक्तशीरपणा, नियमितपणा, स्वावलंबन, स्वप्रयत्न, मित्रभाव, चिकाटी, उद्योग, अभ्यास, विनय, सौजन्य, गोड भाषा, स्वच्छता, स्वाभिमान, शालाभिमान, शिक्षकांबद्दल आदर इत्यादी गुण यायला हवेत.

अभ्यासक्रम : वास्तववादी शिक्षणानुसार धर्म, नीतिशास्त्र, तत्त्वज्ञान इत्यादी विषयांना कमी महत्त्व द्यावे; परंतु वैज्ञानिक प्रगतीला धर्म व अध्यात्माची जोड द्यावी. आधुनिक जगातील समस्या सुटणार नाहीत, या मताकडे आज सगळेच विचारवंत झुकलेले आहे. त्याच प्रमाणे सांस्कृतिक अभ्यासक्रम यात अभिजात वाङ्मयाच्या अभ्यासावर भर असून हे अभिजात वाङ्मय सुसंस्कृत मानव निर्माण करण्याचे एक साधन समजले जाते. वास्तववादी शिक्षण हे विज्ञान विषयांना अभ्यासक्रमात महत्त्वाचे स्थान देतो. वास्तववादी अभ्यासक्रमात व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षित कारागीर, तंत्रज्ञ, यंत्रज्ञ यांच्याशिवाय उद्योगधंद्यांचा विकास होऊ शकत नाही, हे वास्तववादी अभ्यासक्रमाचे महत्त्वाचे वैशिष्ट होय. थोडक्यात, शिक्षण हे आज उदरनिर्वाहाचे एक साधन समजले जाते. म्हणून वास्तववादी शिक्षणात व्यावसायिक विषयांचे महत्त्व फार वाढले आहे. सांस्कृतिक व व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारांचा सुयोग्य समन्वय अभ्यासक्रमात असावा, असे वास्तववादी शिक्षणाचे मत आहे.

वास्तववादी शिक्षणानुसार कोणाला, कोणत्या व्यवसायाचे किंवा कोणत्या विषयाचे शिक्षण द्यावे, हे विद्यार्थ्यांच्या अभियोग्यतेवर अवलंबून असावे. प्रत्येकाला आपापल्या योग्यतेप्रमाणे अभ्यासक्रम मिळावा म्हणून वैकल्पिक अभ्यासक्रम निर्माण झाले आहेत. बहुउद्देशीय शाळांची स्थापना झाली आहे. राष्ट्रांच्या गरजा लक्षात घेऊन शिक्षणाची ध्येय-धोरणे आखली जात आहेत. व्यावहारिक उपयुक्तता हेच वास्तववादी अभ्यासक्रम निर्मितीचे सूत्र मानले आहे.

अध्ययन-अध्यापन निर्मिती : वास्तववाद कोणत्याही निश्चित अशा पद्धतीचा पुरस्कार करीत नाही. पद्धती या विषयपरत्वे निश्चित होतील. मानवीय शास्त्रांच्या अभ्यासात वैचारिक पद्धतींचा अवलंब केला जातो. विज्ञानमय विषयांच्या अभ्यासात इंद्रीयानुभव उद्गामी-अवगामी पद्धती, प्रयोग पद्धती इत्यादींचा वापर आवश्यक ठरतो; तर व्यावसायिक शिक्षणात कृतीपर पद्धतींचा अवलंब होतो. प्रत्यक्ष वा वस्तूनिष्ठ अनुभव मिळावा, ज्ञानाचे व्यवहारी जीवनात उपाययोजना करण्याची क्षमता निर्माण व्हावी, माणूस सुसंस्कृत तर व्हावाच; परंतु तो स्वावलंबी व कार्यक्षम व्हावा, हे शिक्षणाचे उद्दिष्ट व अध्ययन-अध्यापनासाठी जे जे विषय व तद्नुरूप ज्या ज्या पद्धती उपयुक्त ठरतील, आवश्यक वाटतील त्यांचा अवलंब वास्तववादी शिक्षणात केला जातो.

शिक्षकाचे स्थान : वास्तववादानुसार शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. अध्ययन व अध्यापन पद्धतीत शिक्षक व विद्यार्थी यांच्यात सहकार्याची भावना असावी. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कार्यप्रवृत्त करावे, त्यांना प्रेरणा द्यावी, विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य द्यावे; परंतु शिक्षण प्रक्रियेपासून पूर्णपणे अलिप्त राहू नये. योग्य ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. विद्यार्थी शालेय नियमांचे पालन करतात की, नाही याकडे लक्ष द्यावे. शिक्षकाची भूमिका पूर्णपणे वस्तूनिष्ठ हवी. व्यक्तिगत मते, भावना, दृष्टीकोन यांचा प्रभाव विद्यार्थ्यांवर होणार नाही, याची शिक्षकाने दक्षता घ्यावी. निष्ठा किंवा वैज्ञानिक दृष्टीकोन शिक्षकांनी अंगी  बाणावा. वास्तववादानुसार शिक्षक हा मानवीय गुणांनी युक्त, सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न असायलाच हवा. त्याशिवाय तो उत्कृष्ट व प्रभावी शिक्षक होऊच शकणार नाही. व्यावसायिक कार्यक्षमता व सांस्कृतिक वृत्ती या दोहोंचाही समन्वय शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वात असावा.

स्वातंत्र्य व शिस्त : वास्तववादानुसार मानवास त्याच्या आंतरिक शक्तीनुसार विचार व कृती करण्याचे स्वातंत्र्य आहे; मात्र हे स्वातंत्र्य अबाधित नाही. विशिष्ट शिस्तीतच त्यांनी या स्वातंत्र्याचा उपभोग घ्यावा. रशियाच्या सरकारने वास्तववादाचा पुरस्कार केल्याने तेथील शिक्षणाचा दर्जा वाढला. त्यांनी शिस्तीचे कडक नियम करून आज्ञाधारक, मैत्री, अभ्यासवृत्ती, नियमितता, आत्मनिर्भरता, श्रमनिष्ठा इत्यादी गुणांवर भर दिला. त्यामुळे तेथील नागरिकांची कार्यक्षमता वाढली.

वास्तववादी शिक्षणामुळे माणूस शिस्तप्रिय, कार्यक्षम होतो व देशाची प्रगती होण्यास आणि समाजिक स्वातंत्र्य अबाधित राहण्यास मदत होते. त्यामुळे शिक्षणपद्धतीमध्ये वास्तवादी शिक्षण असणे महत्त्वाचे आहे.

समीक्षक : अनंत जोशी