पारंपरिक पद्धतीने अध्यापन न करता स्वनिर्मित नवीन अध्यापन पद्धतीचा वापर करून अध्यापन करणे म्हणजे अध्यापनातील सर्जनशीलता होय. देशाच्या पुढच्या पिढीची बांधणी करण्यासाठी प्रत्येक देश आपली भौतिक साधनसंपत्ती व मनुष्यबळ या दोहोंचीही व्यवस्थित गंतवणूक करतो. त्यातही मनुष्यबळाचा विकास हा जास्त महत्त्वाचा आणि तो शिक्षणप्रक्रियेद्वारे होतो. प्रत्येक राष्ट्राच्या शैक्षणिक व्यवस्थेची शिक्षणाद्वारे त्या त्या राष्ट्रातील मनुष्यबळाचा विकास घडविणे ही जबाबदारी असते. केवळ बौद्धिक विकास हे शिक्षण व्यवस्थेचा उद्देश नसून सर्जनशीलता विकसित करणे, सर्जनशील विचारप्रक्रिया व प्रकटीकरण हे महत्त्वपूर्ण उद्दिष्टे आहेत.

मनुष्यबळाच्या विकासात ‘शिक्षित समाज’, ‘सुजाण नागरिक’ आणि ‘सर्जनशील संशोधक, कलाकार, विचारवंत’ यांचा समावेश असतो. प्रतिभासंपन्न, सर्जनशील असणे ही फक्त साहित्यिक, कलाकार, संशोधक यांचीच गरज नसते; तर तिची प्रत्येक क्षेत्रातील (शेती, शिक्षण, व्यापार, व्यवस्थापन, उद्योग, राजकारण इत्यादी) व्यक्तींची गरज असते. जेव्हा एखादी व्यक्ती आपले काम मनापासून, व्यवस्थित व वेळेवर पूर्ण करते, तेव्हा त्या व्यक्तीत चिकाटी, प्रामाणिकपणा, जबाबदारीची जाणीव ही वैशिष्ट्ये विकसित झालेली असतात; परंतु जेव्हा तेच काम एखादी व्यक्ती रूढ पद्धतींपेक्षा वेगळी पद्धत वापरून करते, ज्यामुळे वेळ, श्रम, पैसा इत्यादी साधनसंपत्तीचा कमी वापर होतो, तेव्हा त्या व्यक्तीमध्ये सर्जनशीलता गुण असतो. एखाद्या व्यक्तीला एखाद्या समस्येवर रूढ मार्गाने उपाय सापडत नसेल, तर त्या परिस्थितीत तो व्यक्ती समाविष्ट असलेल्या विविध घटकांचा वेगवेगळ्या मार्गांनी विचार व पुनर्मांडणी करते; तेव्हा त्या व्यक्तीत सर्जनशीलता विकसित झालेली आहे असे म्हणता येते.

अध्ययन अंत:स्थ संपत्तीचा शोध : देशाची गरज ही फक्त सांगितलेले काम करत राहणाऱ्या व्यक्तींनी पूर्ण होत नाही, तर नवीन कल्पना राबविणाऱ्या, नवनवीन आव्हाने स्वीकारून उभारणी केलेल्या उद्योगधंद्यांद्वारे, तसेच नवनवीन प्रयोग, नवीन संशोधने यांद्वारे पूर्ण होते. हे करण्यासाठी अध्ययन-अंत:स्थ संपत्तीचा शोध हा डेलोर कमिशनचा अहवाल पूरक ठरतो. डेलोर यांनी १९९९ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक परिषदेचा एकविसाव्या शतकातील भविष्यकालीन शैक्षणिक अपेक्षा व्यक्त करणारा एक अहवाल सादर केला होता. त्यात त्यांनी एकविसाव्या शतकातील शिक्षणाचे चार स्तंभ मांडले.

  • ज्ञानासाठी शिक्षण :  युनेस्कोने असे मंजूर केले की, मानवाचे अस्तित्व, उद्दिष्टे व कार्ये यांसाठी शिक्षण आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विषय माहित करून घेणे व त्यासंबंधीच्या आकलनात वाढ करणे यांसाठी प्रवृत्त करावे, अशी अपेक्षा ज्ञानासाठी शिक्षण या स्तंभात आहे. तसेच विद्यार्थ्यांनी सतत शिकत राहणे व शोध घेत राहणे या वृत्तीला चालना आणि प्रोत्साहन देत राहावे. विद्यार्थ्यांना तार्किक किंवा चिकित्सक पातळीवर सुसंगत विचार करण्याची सवय लावावी. विद्यार्थ्यांना वैज्ञानिक साधने व पद्धतींची माहिती असावी आणि आवश्यकतेनुसार त्यांचा योग्य वापर करण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण व्हावी.
  • कृतीद्वारे शिक्षण : जॉन ड्यूई यांच्या कृतीद्वारे शिक्षण या मांडणीशी हे सुसंगत आहे. यात प्रत्यक्ष अनुभवांतून शिक्षण यावर भर दिला जातो. शिक्षक प्रायोगिक पद्धती म्हणजेच स्वत: कृती करणे या पद्धतींनी अध्यापन करण्याला अधिक प्राधान्य देतात. यामुळे कोणत्याही परिस्थितीत विशिष्ट घटक, त्यातील संबंध, गरजा ओळखून योग्य ती कृती करून परिस्थितीला व्यवस्थित तोंड देण्यास विद्यार्थ्याला प्रवृत्त केले जाते.
  • अस्तित्वासाठी शिक्षण : बोधात्मक, भावात्मक व क्रियात्मक या तीनही पातळ्यांवर विकास (जाणीव व आकलनक्षमता यांत वाढ) या स्तंभांतर्गत विद्यार्थ्यांचे शरीर व मन यांचा विकास, बुद्धीमत्ता, कला व सौंदर्यविषयक जाणीवा, वैयक्तिक जबाबदाऱ्यांचे भान आणि आध्यात्मिक मूल्ये या पातळीवर विकासाला चालना मिळावी, अशी शिक्षकांकडून अपेक्षा असते. कल्पनाशक्तीची वैशिष्ट्ये आणि सर्जनशीलतेच्या विकासालाही खतपाणी घातले जावे.
  • सामाजिकीकरणासाठी शिक्षण : वेगाने बदलणाऱ्या जगात फक्त स्वतःसाठी विचार करणे पुरेसे नसते. त्यापेक्षा विविध कृती, त्यांचे समाजावर होणारे परिणाम या शक्यतांचा विचार करायला प्रवृत्त करायला हवे. आजची शिक्षणव्यवस्था ही उद्दिष्ट्ये पूर्ण करत नाही; कारण ती डाव्या मेंदूच्या विकासावर अधिक भर देत असून उजव्या मेंदूच्या विकासावर तिचे फारसे लक्ष नसते.

मेंदूच्या अर्धगोलांची कार्ये

डावा  मेंदू उजवा मेंदू
तर्कसंगत विचार प्रक्रिया. उद्गामी विचार प्रक्रिया.
शाब्दिक सूचनांना प्रतिसाद. दिग्दर्शित सूचनांना प्रतिसाद.
परिस्थितील सर्व घटकांचा क्रमाने विचार करून समस्या उकलन. परिस्थितील विविध घटकांची संरचना, मांडणीचा नमुना विचारात घेऊन अंतःप्रेरणेने समस्या उकलन.
भिन्नता किंवा वेगळेपणा असणाऱ्या बाबींकडे लक्ष. साम्य असलेल्या बाबींकडे लक्ष.
विचारप्रक्रिया नियोजित व रचनात्मक. विचारप्रक्रिया उत्स्फूर्त व लवचिक.
पूर्वी संकलित केलेल्या आणि व्यवस्थित मांडणी करून ठेवलेल्या माहितीस प्राधान्य. आभासी किंवा अनिश्चित माहितीस प्राधान्य.
बोलणे व लिहिणे यांवर अधिक भर. रेखाटने, वस्तू हाताळणे, तर्क लावणे यांवर अधिक भर.
निर्णय घेणे व मत व्यक्त करणे यांबाबत श्रेणिबद्ध अधिकार पदांनुसार प्राधान्य. काम करणाऱ्या सर्वांना निर्णय घेण्याचा किंवा मत व्यक्त करण्याचा अधिकार.
भावनांवर नियंत्रण. भावना मोकळेपणाने व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य.

 

भावी पिढी सर्जनशील निर्माण करायची व घडवायची असेल, तर उजव्या मेंदूला चालना मिळेल असे अध्ययन व अनुभव मुलांना लहान वयापासूनच मिळायला हवेत. त्यासाठी शिक्षकांनी अध्यापनाचे व मूल्यमापनाचे रूढ मार्ग सोडून नवीन मार्गांचा स्वीकार करायला हवा. म्हणजेच शिक्षकांनी सर्जनशील बनायला हवे.

पारंपरिक अध्यापन पद्धतीमुळे बहुसंख्यांक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील आशयाचा विविध मार्गांनी विचार करून अर्थ लावायला जमत नाही. विविध मार्गांनी पाठ्यांशाचा सारांश व्यक्त करायला कठीण जाते. एखाद्या घटनेच्या परिणामांचा विचार करणे किंवा तिचे दृश्यीकरण करणे कठीण जाते. दिलेल्या नोंदींचे विविध निकषांनुसार वर्गीकरण करणे कष्टप्रद होते. वर्तमान संदर्भात आलेल्या अनुभवांचा अर्थ लावण्यासाठी पर्यायी उत्तराची जोडणी करणे सहजशक्य होत नाही. रोजच्या जीवनात घडणाऱ्या घटनांचा अध्यापनाच्या आशयाशी संबंध जोडणे कठीण वाटते. कोणताही एखादा प्रयोग यशस्वी झाला नाही, तर त्यामागील कारणांचा अंदाज व्यक्त करता येत नाही. त्यामुळे या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी अध्यापनामध्ये सर्जनशीलतेची नितांत आवश्यकता असते. अशा वेळी अध्यापकाने आपल्या सर्जनशीलतेला जागृत करून विद्यार्थ्यांना समजेल अशा नवीन अध्यापन पद्धतीचा आपल्या अध्यापनात समावेश करावा.

अध्यापनप्रक्रियेचा सुलभक म्हणून काम करताना अध्यापनात सर्जनशीलता आणण्यासाठी पुढील क्षमतांचा योग्य वापर करता यायला हवा.

  • प्रवाहीपणा : प्रवाहीपणा म्हणजे विविध कल्पना, प्रतिसाद, प्रश्न, शाब्दिक/अशाब्दिक सूचना यांची मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्याची क्षमता असणे होय. प्रवाही व्यक्तीकडे विचार व कल्पना यांचा ओघवता प्रवाह असतो. अभ्यास किंवा समस्याविषयाशी संबंधित आशय, कल्पना, प्रतिक्रिया यांची मोठी संख्या त्या व्यक्तीकडे असते.
  • लवचिकता : लवचिकता म्हणजे विविध समस्या, त्यामागील कारणे आणि त्यासाठीचे उपाय सूचविण्याची व स्पष्ट करण्याची, तसेच यासंदर्भात विविध कल्पनांना जन्म देण्याची क्षमता असणे होय. यात विविध निकषांनुसार विविध प्रतिक्रियांची मोठी संख्या असते. जे जुने आहे, ते तसेच वापरणे व स्थिर ठेवणे या निकषांनुसार त्यात बदल करण्यासाठी विचारांची लवचिकता असणे व कल्पना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्यही अभिप्रेत आहे.
  • मौलिकता : मौलिकता म्हणजे असामान्य कल्पना व्यक्त करणे, कृती करण्याचे विविध नवनवीन मार्ग सूचणे, वैविध्यपूर्ण प्रश्न पडणे, कोणतीही कृती नेहमीपेक्षा भिन्न व वेगळ्याप्रकारे करण्याची क्षमता असणे होय.
  • विस्तार : विस्तार म्हणजे आपल्या विषयातील एखादी मूळ संकल्पना, तसेच एखादी वस्तू किंवा घटना आणि आकृती-नकाशा-प्रतिकृती यांच्याशी संबंधित अधिक तपशील पुरविणे व कल्पनांच्या प्रकटीकरणाचे परिणाम तपासणे होय.
  • प्रश्नांची संवेदनशीलता : प्रश्नांच्या संवेदनशीलतेमध्ये पाठ्यविषयाशी संबंधित मुद्द्यांच्या मांडणीकडे बारकाईने लक्ष दिलेले असते. त्यातील फरक, साम्य, विरोधाभास, कमतरता, सूक्ष्म विसंगती इत्यादी माहित करून घेतले जाते. समस्येतील विविध घटकांमधील परस्परसंबंध प्रस्थपित करणे, जर प्रश्न तसाच राहिला, तर त्या प्रश्नाच्या उत्तराचे भविष्यातील परिणाम कोणते होतील, याचा विचार महत्त्वाचा ठरतो.
  • पुनर्व्याख्या किंवा पुनर्मांडणी : जेव्हा परिचित वस्तूचा किवा व्यक्तीचा वापर अपरिचित कामासाठी करण्याची वेळ येते, तेव्हा परिचित व्यक्ती, प्रसंग, घटना यांच्याशी संबंधित बाबींचा अर्थ लावण्याची जुनी किंवा प्रचलित विचारपद्धती कटाक्षाने टाळणे आणि त्यात सहभागी असलेल्या घटकांचा भिन्न परंतु योग्य दिशेने प्रयत्न करण्याची क्षमता असते. यात नेहमीच्या प्रस्थापित बाबींपेक्षा फार वेगळेपणा असतो. तसेच चिन्हे-आकृत्या-आलेख या स्वरूपांत मांडणीवर भर असतो.
  • मनाचा खुलेपणा किंवा मोकळेपणा : यात कोणताही पूर्वग्रह न ठेवता नवनवीन कल्पना, विचार, मते स्वीकारण्याची तयारी असणे होय. यामध्ये विविध क्षेत्रे, अभ्यासविषयांत रुची असणे, सर्वांच्या भावनांना किंमत देणारी वृत्ती असते. व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या भावनांना किंमत दिली जाते. स्वीकारलेल्या मूल्यांचेही पुनर्परीक्षण करण्याची संधी असते.
  • चातुर्य : स्पष्ट व वैशिष्ट्यपूर्ण धोरण किंवा उपाय वापरून विविध प्रश्नांवर किंवा समस्यांवर भिन्न व नवीन मार्गाने उपाय वापरून मात करण्याची क्षमता असणे होय.

शिक्षकांमध्ये गुणात्मक बदल दिसून येण्यासाठी वरील सर्व वैशिष्ट्यांपैकी किमान काही वैशिष्ट्ये तरी शिक्षकांकडे असायला हवीत.

सर्जनशील शिक्षक परिस्थितीतील सर्व घटकांचा योग्य विचार करून समस्येच्या उत्तरासाठी नवीन पद्धत तयार करतो. तो वैयक्तिक पातळीवर मूलगामी विचार करून आणि प्रसंगाला अनुसरून बदल करूनही समस्या उकलनासाठी जी पद्धत वापरतो, ती सर्जनशील असते. तो स्वत:च्या कल्पना व्यवस्थितपणे व्यक्त व स्पष्ट करतो. त्याच्याकडे विविध समस्यांना तोंड देण्यासाठी विविध नवीन मार्ग हाताळण्याची क्षमता असते. प्रसंगनिष्ठ व व्यक्तिनिष्ठ प्रतिक्रिया तो सहसा देत नाही. भारतरत्न ए. पी. जे. अब्दुल कलाम म्हणतात की, ‘देशाचे नागरिक जेव्हा सर्जनशील विचारप्रक्रिया सहजतेने वापरू लागतील, तेव्हा देशाच्या विकासाला उचित चालना मिळेल’.

समीक्षक : एच. एन. जगताप