पारेषित नियंत्रण नियम/इंटरनेट ‍(अंतरजाळे) नियम. इंटरनेटवरील संदेशन पारेषणाचे नियम. याला इंग्रजीत ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल/इंटरनेट प्रोटोकॉल (Transmission Control Protocol/Internet Protocol) असे म्हणतात. टीसीपी/आयपी हे इंटरनेटवरील पारेषण नियमांचे मानक आहे. यामुळे अंकीय संगणक लांब पल्ल्यापर्यंत संदेशन करू शकतात.

इंटरनेट हे पाकीट-स्विच नेटवर्क आहे. यामध्ये माहिती ही लहान-लहान पाकीटाच्या रूपांत विभागलेली असते. तिला एकाचवेळी अनेक वेगवेगळ्या मार्गांवर वैयक्तिकरित्या पाठविली जाते आणि शेवटी पुन्हा एकत्र केली जाते. टीसीपी हा घटक माहितीचे पाकीट एकत्रित करतो आणि त्यांची जुळवणी करतो तर आयपी हा घटक पाकीट योग्य गंतव्यस्थानावर पाठवले जातात याची खात्री करण्यासाठी जबाबदार असतो. टीसीपी/आयपी याला 1970 साली विकसीत करण्यात आले होते आणि 1983 साली अर्पानेट (ARPANET) साठी प्रोटोकॉल मानक म्हणून स्वीकारण्यात आले.

टीसीपी/आयपी प्रतिकृती : माहिती पाकीटाच्या स्वरूपात विभाजित करून चार वेगवेगळ्या स्तरांद्वारे पारेषण.

टीसीपी आणि आयपी यांना वेगवेगळे परिभाषित करता येते परंतु त्यांना वेगळे परिभाषित करण्यात काहीच फरक नाही कारण ते बहुतेकदा एकत्रित वापरण्यात येतात. यालाच टीसीपी/आयपी प्रतिकृती असेही म्हणतात. टीसीपी/आयपी संपूर्ण माहिती संप्रेषण स्तरांमध्ये विभाजित करते. प्रत्येक स्तराचे वेगवेगळे कार्य असतात. माहिती दुसऱ्या टोकाला मिळण्यापूर्वी ही स्वतंत्रपणे चार स्तरातून जाते. टीसीपी/आयपी माहिती पुन्हा प्राप्तकरण्यासाठी या स्तराच्या उलटक्रमाने माहिती प्रवाहित करते. या स्तरांमध्ये डेटालिंक स्तर (Datalink layer), इंटरनेट स्तर (Internet layer), ट्रान्सपोर्ट स्तर (Transport layer) आणि ॲप्लिकेश स्तर (Application layer) याप्रकारांचे स्तर असतात.

टीसीपी/आयपी यांप्रमाणेच ओएसआय (Open Systems Interconnection) हे सुद्धा संप्रेषण नेटवर्कींगसाठी प्रोटोकॉल म्हणून वापरण्यात येते. परंतु ओएसआय हे संकल्पनात्मक प्रतिकृती असून प्रायोगिकरीत्या त्याचा वापर संप्रेषणाकरिता करण्यात येत नाही. त्याऐवजी नेटवर्कवर ॲप्लिकेशन कार्यरत कसे राहू शकतात याबाबतीत ते परिभाषित करते. ओएसआय या प्रतिकृतीमध्ये सात स्तर असतात.

प्रत्येक संगणकाला/उपकरणाला त्याचा स्वत:चा टीसीपी/आयपी पत्ता असतो. बहुतेकदा उपकरणे एकमेकांशी आपोआप संप्रेषण करतात परंतु कधीकधी तुम्हाला हस्तचलित टीसीपी/आयपी पत्ता टाकावा लागतो. यामुळे संगणकांमध्ये इंटरनेट संदेशन करण्यात सोपेपणा येतो. साधारणतः एक संगणक सर्व प्रकारांचे कामे करू शकतो, परंतु त्या संगणकाची खरी कामे तेव्हा दिसून येतात जेव्हा इंटरनेटवर ते एकमेकांसोबत माहिती संप्रेषित करतात आणि माहिती पारेषित करतांना जी नियमावली दिली जाते किंवा ज्या नियमांना अनुसरून माहिती संप्रेषित केल्या जाते त्या नियमांना पारेषित नियंत्रण नियम किंवा अंतरजाळे नियम म्हणतात. यामध्ये, पारेषित नियंत्रण नियम किंवा अंतरजाळे नियम हे अनुप्रयोग प्रणाली (Application) किंवा सर्व्हर (Server) संगणकामार्फत काही पाकीटामध्ये माहिती घेतात, जी जाळ्यांमध्ये जोडलेल्या इतर उपकरणांद्वारे पुढे (अर्थात ठरलेल्या संगणकापर्यंत) पाठविल्या जाते. पारेषित नियंत्रण नियम पाठवलेले व मिळालेले पाकीट आणि त्यांचा अनुक्रमांक लक्षात ठेवते, जेणेकरून ते संप्रेषित केल्यानंतर पुन्हा एकत्र करताना सोपेपणा येतो व माहिती ही तंतोतंत जुळते. ज्याअर्थी हा एक जोडणी-देणारा (Connection-Oriented) नियम आहे त्यामुळे हे माहितीची देवाण-घेवाण होईपर्यंत जोडणी कायम ठेवते.

टीसीपी आणि आयपी हे जरी दोन स्वतंत्र संगणकीय नेटवर्क प्रोटोकॉल असले तरी माहिती ज्याला पाठवावयाची असते त्याच्या पत्त्याचा भाग हा आयपी असतो तर एकदा का आयपी पत्ता मिळाला तर त्याला माहिती पाठविण्याची जबाबदारी टीसीपी यांची असते. थोडक्यात, आयपी म्हणजे तुमच्या स्मार्टफोनला दिलेल्या फोन नंबरसारखा आहे. टीसीपी हे असे तंत्रज्ञान आहे जे फोनला रिंग करते आणि ते आपल्याला दुसऱ्या फोनवर कोणाशीही बोलण्यास सक्षम करते. म्हणूनच टीसीपी आणि आयपी हे एकमेकांपेक्षा वेगळे आहेत, परंतु ते एकमेकांशिवाय निरर्थक देखील आहेत.

टीसीपी/आयपी या मध्ये साधारणपणे पुढील नियम वापरले जातात : हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल (Hyper Text Transfer Protocol; http) अर्थात हायपरटेक्स्ट हस्तांतरण नियम. याद्वारे जाळ्यांमधील सर्व्हर (Web Server) आणि वेब-ब्राउजर (Web Browser) यामध्ये माहिती संप्रेषित केल्या जाते. साधारणतः हा नियम वेब-साइट आणि त्यावरील मजकूर पाठवण्याकरिता वापरल्या जातो. (वेबसाइट बनवताना एच.टी.एम.एल. (HTML – Hyper-Text Markup Language) भाषा वापरली जाते.

हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर्ड (Hypertext Transfer Protocol Secured) : हायपरटेक्स्ट हस्तांतरण नियम सुरक्षित. वरीलप्रमाणेच हा नियम जाळ्यांमधील सर्व्हर (Web Server) आणि वेब-ब्राउजर (Web Browser) यामध्ये माहिती संप्रेषित करण्यासाठी अतिसुरक्षितपणे वापरल्या जातो.

फाइल ट्रान्सफर प्रोटोकॉल (File Transfer Protocol) : फाइल हस्तांतरण नियम याद्वारे माहितीचा संच उदा., फाइल (Files) संप्रेषित केल्या जातात.

पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल 3 (Post Office Protocol 3) : याद्वारे अद्यावत आणि आधुनिक पद्धतीने इलेक्ट्रॉनिक संदेश (Electronic Mail – eMail) पाठवण्याकरिता वापरल्या जातो.

टीसीपी/आयपीचे महत्त्व : ह्या नियमांना बनवणारी कोणी एक कंपनी/व्यक्ती नाही. त्यावर कोणीही कंपनी/व्यक्ती अधिकारिक प्रमाण ठेवू शकत नाही (Non-Proprietary), या नियमांमध्ये किंवा संचामध्ये बदल करता येऊ शकतो. हे नियम सर्व प्रकारांच्या परिचालन प्रणाली (Operating System) मध्ये एकसारखे काम करतात म्हणून वेगवेगळ्या परिचालन प्रणालींसाठी  वेगळे नियम लिहिण्याची किंवा तत्सम वापरण्याची गरज भासत नाही. याद्वारे विंडोज परिचालन प्रणाली (Windows Operating System) असलेले संगणक हे लिनक्स परिचालन प्रणाली (Linux Operating System) किंवा युनिक्स परिचालन प्रणाली (Unix Operating System) कुणासोबतही अगदी सहजरीत्या माहिती संप्रेषित करू शकतात किंवा जोडणी करू शकतात. हे नियम सर्व प्रकारांच्या नेटवर्कसाठी आणि उपकरणांसाठी (Hardware’s/Devices) वापरता येतात. हे नियम पाहिजे तेवढ्या प्रमाणात बदलता येतात, वाढवता येतात आणि साधारणपणे इंटरनेटमध्ये (Internet) वापरले जातात.

कळीचे शब्द :#पारेषित #नियंत्रण #अंतरजाळे #टीसीपी #आयपी #एचटीटीपी #एचटीएमएल #वेब-सर्व्हर #वेबब्राउजर #वेबसाइट #प्रोटोकॉल.

संदर्भ :

समीक्षक : रत्नदीप देशमुख