ऑक्लेव्ह, थॉमस : (१३६८- १४२६). प्रसिद्ध इंग्रजी कवी. ज्याच्या साहित्यास सामाजिक इतिहास म्हणून प्रामुख्याने संबोधले गेले असा १५ व्या शतकातील प्रमुख साहित्यिक. जेफ्री चॉसर या प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिकाचा समकालीन. जन्म साउथविक, इंग्लंड येथे. त्याच्या कुटुंबाबद्दल आणि वैयक्तिक जीवनाबद्दलही फारशी माहिती उपलब्ध नाही. बहुदा तो बेडफोर्डशायरमधील हॉकलिफ या गावातून लंडन येथे आला असावा. त्याच्या संदर्भातील तपशील प्रामुख्याने त्याच्या साहित्यकृतींमधून प्रतिबिंबित झालेला आहे. वयाच्या १८व्या वर्षी त्याने लंडनमधील प्रायव्हे सील ऑफिसमध्ये लिपिक या पदावर सुमारे ३५ वर्षे काम केले होते. नोकरी करत असतांनाच त्याने काव्यरचनेचे कार्यही जीवनभरासाठी अंगिकारले होते.
ऑक्लेव्हची सर्वात पहिली ज्ञात काव्यरचना म्हणजे क्रिस्टीन डी पिसनच्या ‘एल’एपिस्ट्रे औ डियू डी’अमॉर्स’ या काव्याचे ‘द लेटर टू क्युपिड’ (१४०२) हे रूपांतरित काव्य होय. या कवितेत त्याने पुरुषांकडून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध केला आहे. त्यानंतरची त्याची पुढची ज्ञात असणारी कविता ‘ला मेल रेगले’ ही होय. ज्यात मानवास प्राप्त मनोरंजन आणि आनंदाचे चित्र आहे. ‘ला मेल रेगले’ त्याच्या सर्वात तरल आणि सृजनात्मक काव्यापैकी एक विडंबनात्मक कविता आहे. त्याच्या सर्वात मनोरंजक कार्यामध्येही या काव्याची नोंद घेतली गेली आणि याच काव्यात लंडनमधील वास्तववादी जीवन वर्णिले आहे. यातूनच त्या काळच्या लंडनच्या सामाजिक इतिहासाची माहितीही मिळते. १४११ मध्ये थॉमस हॉक्लेव्हने “रेजमेंट ऑफ प्रिन्सेस किंवा डी रेजिमाइन प्रिन्सिपम” हे गुणदोषांवर आधारित इंग्लंडच्या पाचव्या हेन्रीच्या राज्याभिषेकाच्या काही काळ अगोदर लिहिलेले प्रबोधनपर काव्य आहे. हे एक प्रदीर्घ (५४६४ ओळी) आणि काहीसे कंटाळवाणे काव्य असले तरीही त्यात जेफ्री चॉसरला एक हृदयस्पर्शी प्रशंसापर आदरांजली वाहिलेली आहे. त्याच्या आणि जेफ्री चॉसरच्या नात्याचे विस्मरण होऊ नये म्हणून थॉमस ऑक्लेव्हने या काव्याच्या हस्तलिखितावर जेफ्री चॉसरचे चित्र रेखाटले होते. थॉमस ऑक्लेव्ह जेफ्री चॉसरला ओळखत होता आणि जेफ्री चॉसरचा शिष्य असल्याचा दावाही त्याने केला होता. ऑक्लेव्हच्या मते जेफ्री चॉसरने त्याला साहित्याचे धडे, काव्यात्मक ज्ञान व इतर शिक्षणही दिले होते. जेफ्री चॉसरचा उत्तराधिकारी बनण्याची ऑक्लेव्हची आकांक्षादेखील होती. थॉमस ऑक्लेव्हच्या प्रमुख कार्यामध्ये सिरीज (Series) १४१९ – १४२१ मध्ये लिहिलेल्या (सुमारे ३८०० ओळीतील) काव्याचा समावेश केला जातो. सिरीज ही कविता आत्मचरित्रात्मक असून त्या काळाच्या समाजजीवनाच्या वर्णनासह ती सुरू होते. प्रस्तुत कविता म्हणजे थॉमस ऑक्लेव्हचा कविता रचण्याचा पुनर्प्रवास आणि त्यासाठी आवश्यक असणारी शारीरिक, मानसिक आरोग्याविषयी कबुलीजबाब तसेच काव्यात्मक अनुवाद आणि नैतिकतेशी संबंधित आहे.
ऑक्लेव्हच्या बहुतेक काव्यरचना आश्रयदात्यांना उद्देशून राजाश्रयाच्या दृष्टीने लिहिल्या गेल्या आहेत असे दिसते. या काव्यात अधूनमधून त्याच्या दैनंदिन आणि व्यक्तिगत जीवनाची अनपेक्षित झलक दिसते. नंतरच्या साहित्यिक कारकिर्दीत ऑक्लेव्ह त्याच्या अनेक आश्रयदात्यांना उद्देशून लिहिलेल्या काव्यापासून गंभीर, धार्मिक जाणिवांकडे वळला आणि परखड शब्दांत जीवनातील वाईट बाबींविषयी लिहीत गेला. त्याने त्याच्या विविध आश्रयदात्यावर किंवा भावी आश्रयदात्यावर स्तुती करणारे पोवाडे रचले होते. त्या व्यतिरिक्त त्याने लोलार्ड्सचा निषेध करणारे गीत आणि ‘कम्प्लेंट ऑफ द व्हर्जिन’ सारख्या भक्तिमय कविता देखील लिहिल्या आहेत.
ऑक्लेव्हचे साहित्य दुर्लक्षित होते; मात्र १९व्या आणि २०व्या शतकाच्या सुरुवातीस त्याचे साहित्य नव्याने अभ्यासले गेले आणि प्रशंसेस पात्रही ठरले. अभ्यासकांनी त्याच्या साहित्याच्या सामाजिक परिणामांवर तसेच त्याला ज्यांनी राजाश्रय दिला त्या घटितांवरही लक्ष केंद्रित केले. तसेच समीक्षकांनी त्याच्या व्यावसायिक व वैयक्तिक संघर्षांची तसेच साहित्यिक अपयशाची कारणमीमांसा, त्याची दीर्घ उदासीनता, त्याच्या मनोरुग्ण अवस्थेतून आलेली विमनस्कता इत्यादी विषयांवर सखोल अभ्यास केला आहे. मायकेल सेमूर याने ऑक्लेव्हच्या प्रमुख आणि इतर साहित्याचा धांडोळा घेणारे पुस्तक सिलेक्शन्स फ्रॉम ऑक्लेव्ह ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या क्लेरेंडन प्रेसच्या माध्यमातून प्रकाशित केले आहे (१९८१). त्याच्या मृत्यू बाबत नेमकी माहिती उपलब्ध नाही.
संदर्भ :
समीक्षण : लीना पांढरे