यंग, एडवर्ड : (३ जुलै १६८३ – ५ एप्रिल १७६५). इंग्रज कवी, नाटककार आणि साहित्यसमीक्षक. नव-अभिजाततावाद आणि स्वच्छंदतावाद ह्यांच्या संक्रमणकाळातील यंग हा कवी आणि साहित्यिक होय. हँपशरमधील उप्‌हॅम येथे जन्मला. ऑक्सफर्ड विद्यापीठातील न्यू कॉलेजमध्ये त्याचे शिक्षण झाले. वडिलांच्या धार्मिक कार्यामुळे आणि त्याच्या पालनपोषणामुळे त्याला ऑल सोल्समध्ये रोमन कॅथोलिक चर्चच्या विधी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश देण्यात आला. १७३० मध्ये धर्मोपदेशकाची दीक्षा घेऊन हार्टफर्डशरमधील वेल्‌विन येथे तो ‘रेक्टर’ (धर्मोपदेशकाचे एक पद) म्हणून काम करू लागला. १७३१ मध्ये, लिच्‌फील्डचा अर्ल दुसरा ह्याची कन्या लेडी एलिझाबेथ हिच्याशी त्याने विवाह केला.

त्याच्या सुरुवातीच्या बहुतेक साहित्यकार्याची रचना अनेक शाही व्यक्तींच्या स्तुतीसाठी केली गेली होती. यंगची कीर्ती आज मुख्यतः ‘द कंप्लेंट ऑर नाइट थॉट्स ऑन लाइफ, डेथ अँड इमॉर्‌टॅलिटी’ ह्या त्याच्या बोधवादी काव्यावर अधिष्ठित आहे. सु. १०,००० ओळींचे हे काव्य निर्यमक छंदात रचिले असून ते एकूण नऊ भागांत प्रसिद्ध झाले आहे (१७४२-४५). कवितेतील उदासीनता, आत्मपरता, भावाकुलता तसेच मृत्यू, गूढता आणि अंधःकार ह्यांचे यंगला वाटणारे आकर्षण ह्यांमुळे हे काव्य इंग्रजीतील स्वच्छंदतावादी संप्रदायाचे पूर्वसूरी मानले जाते. यंगच्या या मुख्य कार्याला नाईट थॉट्स असे मानले जाते. यंगने कंजेक्‌चर्स ऑन ओरिजिनल काँपोझिशन  हे साहित्यसमीक्षात्मक लेखनही केले आहे. पोएम्स ऑफ द लास्ट डे (१७१३), ब्यूसिरीस, किंग ऑफ ईजिप्त (१७१९), रिव्हेंज (१७२१), द इंस्टालमेंट (१७२६)आणि ब्रदर्स (प्रकाशित १७५३) ही नाटकेही त्याने लिहिली आहेत. पुढे स्वच्छंदतावादी साहित्यिकांनी जी भूमिका स्वीकारली, तिच्याशी मिळतेजुळते असे विचार यंगच्या ह्या लेखनातही दिसतात.

वेल्‌विन येथे तो निधन पावला.

संदर्भ :

  • Wicker, Cecil V. Edward Young and the Fear of Death : A Study in Romantic Melancholy, Albuquerque, N. Mex., 1952.
  • https://www.gutenberg.org/files/33156/33156-h/33156-h.htm