विदर्भातील वाकाटक कालखंडातील एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्थळ. हे स्थळ नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात जिल्हा मुख्यालयापासून ४५ किमी. अंतरावर ईशान्येस वसले आहे. या स्थळाची समुद्रसपाटीपासूनची उंची २८५ मी. इतकी आहे. सातपुडा आणि अंबागड पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे पसरलेल्या कमी उंचीच्या नैसर्गिक टेकाडावर प्राचीन काळातील स्थापत्याचे अवशेष विखुरलेले दिसतात. वा. वि. मिराशी यांच्या मते, या स्थळाच्या उत्तरेस असलेल्या तलावाच्या ‘मणीकालसरʼ या नावावरून या स्थळाला मनसर असे संबोधले जाते. रामटेकच्या लक्ष्मण मंदिरातील यादव राजा रामचंद्रांच्या शिलालेखात या स्थळाचा उल्लेख मणीकालकुंड असा येतो, तर सिंदूरगिरी माहात्म्य आणि महानुभावांच्या स्थान पोथीमध्ये यास अनुक्रमे मणीकाल आणि माणसील असे संबोधले जात होते.
ऐतिहासिक व पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून मनसर या स्थळाचे सर्वप्रथम सर्वेक्षण टी. वेलस्टेड याने १९२८ मध्ये केले. बंगालच्या रॉयल एशियाटिक सोसायटीमधील १९३३ च्या संशोधन प्रपत्रात मनसर येथील वाकाटककालीन पुरावशेष, स्थापत्य आणि हिंदू व बौद्ध धर्माशी निगडित वास्तू इत्यादीचे वर्णन वेलस्टेडने केले आहे. या स्थळाचे सर्वप्रथम उत्खनन १९८९ मध्ये नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभागाने केले. या नंतर १९९४-९५ मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, उत्खनन शाखा क्र. १, नागपूरतर्फे आणि अलीकडील उत्खनन बोधिसत्व नागार्जुन स्मारक संस्थेच्यावतीने जगत पती जोशी आणि अरुण शर्मा यांच्या संयुक्त निर्देशनाखाली १९९७ पासून नऊ सत्रामध्ये विस्तृत प्रमाणात करण्यात आले.
उत्खननांती मनसर येथे सातवाहन, वाकाटक आणि विष्णूकुंडीन राज्यकर्त्यांनी शासन केल्याचे पुरावे प्राप्त झाले आहेत. मनसर येथे स्थापत्य परंपरेची सुरुवात सातवाहन काळात झाली (इ. स. पू. २०० ते इ. स. २५०) असावी. मनसरच्या टेकाड क्र.१ मधील उत्खननात सर्वांत खालच्या स्तरात राजप्रासादाचे अवशेष मिळाल्याचे उत्खननकर्त्यांचे मत आहे. विटांनी बांधलेल्या या विस्तीर्ण राजप्रासादाचा आकार पूर्व-पश्चिम ५१ मी. तर उत्तर-दक्षिण ४४ मी. इतका होता. प्रासादात राहण्याकरिता अनेक लहान-मोठ्या खोल्या होत्या. राजप्रासादाच्या सुरक्षेकरिता चारही बाजूंनी विटांची संरक्षक भिंत देखील बांधली होती. राजप्रासादाच्या पश्चिमेकडे भव्य मंडप असून याचे आकारमान लांबी २३ मी. आणि रुंदी १९.५० मी. इतके आहे. या विशाल मंडपात विटांनी निर्मित ४२ चौकोनी स्तंभ एकमेकांशेजारी (२.२० मी. अंतरावर) स्थित आहेत. मंडपाच्या सभोवताल विटांच्या भिंतीचे पुरावे उत्खननात मिळाले आहेत. तसेच मनसर येथील हिडिंबा टेकडी (उत्खनन स्थळ क्र.३) परिसरात दोन बौद्ध स्तूपाचे आणि एका चैत्याचे अवशेष प्राप्त झाल्याचे उत्खननकर्त्यांनी नमूद केले आहे. स्थापत्याच्या अवशेषाव्यतिरिक्त सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णीचे नाण्याचे साचे, लाल चकाकीयुक्त खापरे, काळी चकाकीयुक्त खापरे, रोमन मद्यकुंभ (अम्फोरा), लज्जागौरी आणि कार्तिकेय यांचे शिल्प आणि लोह उपकरणे आदी प्राप्त झाली आहेत.
सातवाहनांच्या अस्तानंतर मनसर येथे विदर्भातील आद्य नरेश वाकाटकांनी प्रत्यक्ष शासन केल्याचे पुरावे मिळाले आहेत (इ.स. २५० ते ५५०). सातवाहन काळातील काही स्थापत्य अवशेषांवर वाकाटक काळात बांधकाम करण्यात आले आणि उर्वरित बांधकामाला भर टाकून समतल करण्यात आले. उत्खननकर्त्यांच्या मते, वाकाटक काळातील राजप्रासादाचे अवशेष हे वाकाटक नृपती प्रवरसेन द्वितीय (इ.स. ४१०–४४०) याच्या काळातील असावे, कारण या राजाने नंदीवर्धन (सध्याचे नगरधन) येथून राजधानी प्रवरपूर येथे स्थलांतर केली होती. उत्खननकर्त्यांनी मनसरची ओळख प्राचीन ‘प्रवरपूरʼ म्हणून केली आहे. वाकाटक काळातील राजप्रासाद तीन मजली असून आकाराने भव्य होता. यामध्ये पश्चिमेकडून पायऱ्याद्वारे प्रवेश करता येत होता. राजप्रासादामध्ये अतिथी कक्ष, सभागृह व त्याला परस्पर जोडलेल्या खोल्या अशी एकूण राजप्रासादाची रचना होती. तसेच प्रासादात लहान-मोठ्या अनेक खोल्या एकमेकांशेजारी बांधलेल्या होत्या. राजप्रासाद आणि त्यामधील कोनाडे व अर्धस्तंभ, चुन्याचा गिलावा आणि चित्रांनी अलंकृत केला होता. राजप्रासादाच्या बाहेर देखील अनेक खोल्यांचे अवशेष आढळले आहेत. इ. स. ४९३ मध्ये नल राजांनी वाकाटक साम्राज्यावर केलेल्या आक्रमणात प्रवरपूर येथील प्रासादाला जाळल्याचे आणि नष्ट केल्याचे पुरावे मिळाल्याचे उत्खननकर्त्यांचे म्हणणे आहे. उत्खननकर्त्यांना याच स्तरात कूर्मचिती, श्येनचिती व त्या संबंधित पुरुषमेध यज्ञाचे अवशेष आढळले आहे. उत्खननात वाकाटक काळातील अनेक मुद्रा आणि मुद्रांके प्राप्त झाली असून त्याद्वारे वाकाटकांच्या इतिहासात मोलाची भर पडली आहे. प्रवरसेन द्वितीयची पेटिका-शीर्षक लिपीत लिहिलेली ‘प्रवरस्यʼ मुद्रांक विशेष महत्त्वपूर्ण असून वाकाटक राजा प्रवरसेन द्वितीयने राजधानी प्रवरपूर येथे स्थलांतरित केल्यानंतर या मुद्रांकाचा वापर केला असावा. वाकाटक काळातील अभ्रकयुक्त लाल रंगाची, लाल चकाकीयुक्त आणि साधी लाल रंगांची खापरे उत्खननात मोठ्या प्रमाणात मिळाली आहेत.
वाकाटकांनंतर मनसरवर विष्णूकुंडीन राज्यकर्त्यांनी काही काळ शासन केल्याचे पुरावे मिळाले आहेत. विष्णूकुंडीन काळातील स्थापत्य अवशेष मनसर येथील वाकाटक काळाच्या अवशेषांवर मिळाले. या काळातील बौद्ध स्तूप आणि विहाराचे अवशेष सर्वांत वरच्या स्तरात प्राप्त झाले आहेत. वाकाटकांच्या भव्य राजप्रासादाचे रूपांतर नंतर बौद्ध स्तूप आणि विहारात झाले असावे. राजप्रासादाच्या खोल्यांचा उपयोग बौद्ध भिक्खुंच्या निवासाकरिता होत होता. विष्णूकुंडीन नरेश महेंद्रवर्मन द्वितीयची तांब्याची नाणी हिडिंबा टेकडी परिसरात मिळाली आहेत. लाल रंगाची खापरे, अभ्रकमिश्रित लाल रंगाची खापरे, काळी चकाकीयुक्त खापरे, दगडी पाटे-वरवंटे, लोह आणि ताम्र उपकरणे इ. मिळाली आहेत.
मनसर येथील उत्खननात वाकाटक काळातील अनेक मंदिराचे अवशेष मिळाले आहेत. येथील मंदिरे प्रामुख्याने शैव पंथीय असून केवळ एक वैष्णव (नरसिंह) मंदिर होते. हिडिंबा टेकडीवरील मंदिराला विद्वानांनी प्रवरसेन द्वितीयच्या ताम्रपत्रात उल्लेखित प्रवरेश्वरदेवकुलस्थान ‘प्रवरेश्वरʼ मंदिर मानले आहे. मनसर येथील नैसर्गिक गुहेत विटांचे बांधकाम करून शिवलिंग प्रस्थापित केले होते, तसेच जाडजूड संरक्षण भिंतीच्या पश्चिम आणि उत्तर-दक्षिणेस लघु आकारांच्या अनेक देवकुलिकात शिवलिंगे मिळाली आहेत. मनसर येथे आणखी एका विटांनी बांधलेल्या ताराकृती आकाराच्या शैव मंदिराच्या जोत्याचे अवशेष प्राप्त झाले आहेत.
मनसर हे वाकाटक काळातील शिल्प परंपरेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. वाकाटकांच्या काळातील अन्य कोणत्याही स्थळापेक्षा जास्त प्रमाणात शिल्पे मनसर येथून प्राप्त झाली आहेत. यात प्रामुख्याने शैव देव-देवता यांची शिल्पे असून गण, यक्ष, किन्नर, प्राणी, साधू आणि स्त्री-पुरुष इत्यादींचे अनेक शिल्पे सुद्धा मिळालेली आहेत. भारताच्या राजधानीच्या ठिकाणी असलेल्या राष्ट्रीय संग्रहालयामधील प्रवेशद्वाराच्या मुख्य कक्षात प्रदर्शित ‘शिव-वामनʼ चे अद्वितीय शिल्प मनसर येथील शिल्प कलेचा परमोच्च बिंदू आहे. मनसर येथील यक्ष, विद्याधर, किन्नर इ. शिल्पांचे अजिंठा येथील चित्रांशी समरूपता दिसून येते, म्हणूनच प्रसिद्ध विद्वान हान्स बाकर यांच्या मते, मनसरची कला आणि अजिंठा येथील चित्रकला यांमध्ये विलक्षण साम्य आहे.
मनसर हे वाकाटक काळातील राजधानीचे ठिकाण म्हणून विशेष महत्त्वाचे असल्याचे उत्खननात प्राप्त झालेल्या विविध पुराव्यांवरून सिद्ध होते. मनसर येथून प्राप्त ताम्रपत्र, शंख लिपीतील लेख, धार्मिक पुरावशेष, सुंदर शिल्पे आणि भव्य स्थापत्यावरून वाकाटक काळातील राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक परिस्थिती तसेच कला, स्थापत्य आणि धर्म इत्यादींविषयी नवीन माहिती समोर आली; तथापि उत्खननकर्त्यांनी येथील उत्खननाबाबतीत नमूद केलेल्या कालानुक्रमातील आणि काही अवशेषांवरील स्पष्टीकरणासंदर्भात इतर विद्वानांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
संदर्भ :
- Bakker, Hans, ‘Religion and Politics in the Eastern Vakataka Kingdomʼ, South Asian Studies, Vol. 18, pp. 1-25. 2002.
- Indian Archaeology: A Review, Archaeological Survey of India, New Delhi, 1994-95.
- Joshi, Jagat Pati & Sharma, A. K. ‘Excavations at Mansar, Distt. Nagpur, Maharashtra-1997-2000ʼ, Puratattva : Bulletin of the Indian Archaeological Society, no. 30, 127-131, 1999-2000.
- Sharma, A. K. Further Excavations at Mansar, B. R. Publishing Corporation, Delhi, 2013.
समीक्षक : श्रीकांत गणवीर