इंग्लंडमधील जगप्रसिद्ध मध्याश्मयुगीन (मेसोलिथिक) पुरास्थळ. ते उत्तर यॉर्कशायर परगण्यात स्कारबोरो या गावाच्या  दक्षिणेस ७ किमी. अंतरावर असून कुजून रूपांतर झालेल्या पीट (च्मंज) प्रकारच्या दगडी कोळशाने (अतिप्राचीन वनस्पतिजन्य पदार्थ) व्याप्त प्रदेशात आहे. या सपाट जागी शेवटचे हिमयुग संपल्यानंतर इ. स. पू. ९००० ते ८००० या काळात एक मोठे सरोवर (अंदाजे पाच गुणिले दोन किमी.) होते. रेडिओकार्बन कालमापनानुसार स्टार कार येथे सु. तीनशे वर्षांच्या कालावधीत (इ. स. पू. ८७०० ते ८४००) मध्याश्मयुगीन मानवी वस्ती होती. या वस्तीचे अवशेष पीटमध्ये अतिशय चांगल्या अवस्थेत मिळाले आहेत.

स्टार कार येथील उत्खनन.

स्टार कारचे स्थळ शोधण्याचे श्रेय स्थानिक हौशी पुरातत्त्वज्ञ जॉन मूर यांना जाते. १९४७ पासून या परिसरात फिरताना त्यांना दहा प्राचीन स्थळे सापडली. त्यांनी १९४८ मध्ये स्टार कार येथे त्यांच्या परीने जमेल तसे एक छोटेसे उत्खनन केले. त्यात फ्लिंटचे काही तुकडे, हाडे आणि हरिणांची शिंगे असे अनेक अवशेष सापडले. केंब्रिज विद्यापीठातील प्रागैतिहासिक पुरातत्त्वाचे व्याख्याते ग्रॅहम क्लार्क यांच्याशी मूर यांनी संपर्क साधला. जेथे हाडे, शिंगे आणि लाकूड यांसारख्या सेंद्रिय पदार्थांचे अवशेष चांगल्या अवस्थेत टिकून आहेत, अशा एखाद्या मध्याश्मयुगीन स्थळांचे उत्खनन करण्याची क्लार्क यांची इच्छा होतीच. त्यांनी १९४९ ते १९५१ दरम्यान स्टार कारचे उत्खनन केले आणि १९५४ मध्ये त्याचे निष्कर्ष प्रकाशित केले.

क्लार्क यांना प्राचीन सरोवराच्या काठावर माणसांनी मुद्दाम बनवलेले सपाट भाग (प्लॅटफॉर्म) आढळून आले. या सपाट भागाचे उत्खनन केल्यावर त्यात लाल हरीण (Red deer), रो हरीण (Roe deer), रानडुक्कर, एल्क (Elk), जंगली गायबैल-ऑरोख (Auroch), बीव्हर, हेजहॉग (Hedgehog), ससे आणि बॅजर (Badger) अशा अनेक प्राण्यांचे अवशेष सापडले. तसेच उत्खननात काही लांडग्यांचीही हाडे मिळाली; तथापि ती पाळीव कुत्र्यांची हाडे असल्याचे पुढे दिसून आले.

स्टार कार येथील हाडांची अवजारे.

स्टार कार उत्खननात अनेक आश्चर्यकारक पुरावशेष आढळले. त्यात लाल हरणांच्या कवट्यांपासून व शिंगांपासून बनवलेल्या एकवीस शिरोभूषणांचा समावेश होता. कदाचित शिकार करताना किंवा कदाचित कोणत्यातरी धार्मिक समारंभांमध्ये ती परिधान केली जात असावीत, असा निष्कर्ष लोकजीवनशास्त्रीय निरीक्षणांच्या आधारे काढण्यात आला आहे. या शिरोभूषणांचा वापर भगतांनी (Shaman) केला असावा, असे मानले जाते. यूरोपात इतर स्थळांवर अशी शिरोभूषणे फारच कमी प्रमाणात मिळाली आहेत.

उत्खननात फ्लिंटची अनेक अवजारे व ती बनवताना वाया जाणारे छिलके (Debitage) मिळाले. फ्लिंट अवजारांमध्ये बहुधा प्राण्यांची चामडी साफ करण्यासाठी वापरलेल्या तासण्या (Scrapers), लाकूडकामासाठी लागणाऱ्या कुऱ्हाडी आणि बाणांची टोके म्हणून वापरलेली सूक्ष्मास्त्रे (Microliths) यांचा समावेश होता. स्टार कार येथे मध्याश्मयुगीन लोकांनी प्राण्यांच्या हाडांचा आणि हरिणांच्या शिंगांचा (Antlers) मोठ्या प्रमाणात अवजारे व हत्यारे बनवण्यासाठी उपयोग केलेला होता. त्यात काटेरी तीराग्रे (Barbed points) महत्त्वाची होती. ती भाल्यांच्या टोकांना बसवून प्राण्यांच्या शिकारीसाठी व मासेमारीसाठी वापरली जात असत.

वैशिष्ट्यपूर्ण शोध, शिस्तबद्ध उत्खननाचा आदर्श म्हणून आणि बहुविद्याशाखीय तज्ज्ञांचा सहभाग असल्याने स्टार कार पुरातत्त्वीय जगात प्रसिद्ध झाले; परंतु १९८०-९० दशकाच्या मध्यापर्यंत तेथे पुढील संशोधन झाले नाही. मध्याश्मयुगातील पुरापर्यावरणाचा (Palaeoenvironment) शोध घेण्याच्या उद्देशाने १९८५ मध्ये क्लार्क यांनी केलेल्या मूळ उत्खननाच्या पूर्वेस सु. ३० मी. अंतरावर यॉर्क येथील व्हेल ऑफ पिकरिंग ट्रस्टच्या वतीने उत्खनन सुरू करण्यात आले. या भागात फारसे काही मिळणार नाही, असे वाटत असताना तेथे भरपूर पुरावशेष आढळले. इंग्लिश पुरातत्त्वज्ञ टिम स्काडला-हॉल आणि पॉल मेलर्स यांनी पुढे १९९७ पर्यंत हे संशोधन चालू ठेवले. या उत्खननात लाकूडकाम केल्याचा पुरावा मिळाला व हा यूरोपातील लाकूडकामाचा सर्वांत जुना पुरावा ठरला.

व्हेल ऑफ पिकरिंग ट्रस्टच्या वतीने निकी मिल्नर (यॉर्क विद्यापीठ), चंताल कॉनेलर (मँचेस्टर विद्यापीठ), आणि बॅरी टेलर (चेस्टर विद्यापीठ) यांनी स्टार कारचे २००४ नंतर पुन्हा उत्खनन सुरू केले असून ते २०२१ पर्यंत चालू होते. स्टार कारला राहणारे मध्याश्मयुगीन लोक शिकार करून व अन्न गोळा करून उपजीविका करणारे असल्याने तेथील वस्तीचे स्वरूप तात्पुरते असावे, असे निष्कर्ष पूर्वीच्या कामानंतर काढण्यात आले होते. तथापि या नवीन संशोधनात मात्र अशा तात्पुरत्या वस्तीच्या अपेक्षेपेक्षा ऐंशी पटीने विस्तृत अशा वस्तीचा शोध लागला. तसेच प्राचीन सरोवराच्या काठाजवळ कोरड्या जागी जवळजवळ दोन हेक्टर इतक्या मोठ्या क्षेत्रात अवजारे तयार करण्यासाठी फ्लिंटचा वापर केल्याचे स्पष्ट झाले. कोरड्या जागेतील उत्खननात लाकडांपासून बनवलेल्या घराचे पुरावे मिळाले. पीटमध्ये गाडलेल्या अवस्थेत असल्याने लाकडे व इतर वनस्पतिजन्य वस्तूंचे अतिशय चांगले जतन झाल्याचे दिसले. मोठ्या ओंडक्यांपासून अतिशय कुशलपणे फळ्या (८० सेंमी. रुंद व ३ मी. लांब) पाडून त्या जमिनीवर पसरलेल्या होत्या आणि त्यात खांब रोवून घर बनवले होते.

स्टार कार येथे मध्याश्मयुगीन काळात माणसांनी तात्पुरती वसाहत केली असावी, असे जे अनुमान पूर्वी काढण्यात आले होते त्याला छेद देणारे काही पुरावे नवीन उत्खननात मिळाले. येथे मिळालेल्या स्थलांतरित पक्ष्यांच्या हाडांवरून, शिकार केलेल्या हरिणांच्या दातांच्या अभ्यासाने आणि तेथे मिळालेल्या परागकणांच्या अभ्यासामधून असे दिसले की, शिकार करणारे मध्याश्मयुगीन लोक कित्येक दशके पण फक्त हिवाळ्यात (ऑक्टोबर ते एप्रिल) येऊन वस्ती करत असावेत. तथापि केवळ हिवाळ्यातच नव्हे, तर वर्षभरात वेगवेगळ्या काळात, परंतु अल्पकाळासाठी स्टार कारमध्ये लोक राहत होते हे नवीन संशोधनातून दिसून आले. अर्थात स्टार कारची वसाहत कायमस्वरूपी मात्र नव्हती. नवीन संशोधनात क्लार्क यांनी केलेल्या मूळ जागी पुन्हा उत्खनन केले गेले. त्याचा उद्देश १९५० पासून अवशेषांचा कितपत ऱ्हास झाला आहे, याचे मोजमाप करणे हा होता. त्यातून या स्थळाचे जतन-संवर्धन करण्यासाठी आवश्यक ती महत्त्वाची माहिती मिळाली.

संदर्भ :

  • Clark, J. Grahame D. Excavations at Star Carr: An Early Mesolithic Site at Seamer Near Scarborough, Cambridge University Press, Yorkshire, 1954.
  • Legge, Anthony & Rowley-Conwy, Peter, Star Carr Revisited: A Reanalysis of the Large Mammals, Birkbeck College, London, 1988.
  • Milner, Nicky; Conneller, Chantal & Taylor, Barry, Star Carr:  A Persistent Place in a Changing World, White Rose University Press, York, 2018.
  • https://www.encyclopedia.com/humanities/encyclopedias-almanacs-transcripts-and-maps/star-carr
  • http://www.starcarr.com/

                                                                                                                                                                                           समीक्षक : शंतनू वैद्य