नाईल नदीचे खोरे वगळता सहारा वाळवंट प्रदेशाची लोकसंख्या सुमारे २.५ द. ल. आहे. दर चौ. किमी.स एका व्यक्तिपेक्षाही कमी इतकी लोकसंख्या विरळ आहे. साधारणपणे अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशाएवढे विस्तृत भौगोलिक क्षेत्र असूनही इतकी विरळ लोकसंख्या आहे. बराचसा भाग निर्मनुष्य आहे. केवळ वनस्पती व पाण्याची उपलब्धता असलेल्या भागातच लोकसंख्या केंद्रित झालेली आढळते. कायम वस्ती केवळ मरूद्यानातच आढळते. मरूद्यानातील बहुतांश वस्तींमधील लोकसंख्या २,००० पेक्षा कमी असते. मूर, तुआरेग, बर्बर, अरब, टिबू हे येथील प्रमुख रहिवासी आहेत. बहुतांश लोक इस्लामधर्मीय असून अरबी ही त्यांची मुख्य भाषा आहे. सहारातील बहुतेक लोक अरब किंवा बर्बर किंवा अरब-बर्बर यांच्या मिश्र वंशपरंपरेतील आहेत. मूर, अरब-बर्बर यांच्या मिश्र गटांची संख्या बरीच असून ते प्रामुख्याने पश्चिम व वायव्य सहारात राहतात. मूळ बर्बर वंशातील व बर्बरभाषिक तुआरेग हे भटके पशुपालक सर्वत्र व सर्वाधिक आढळतात. त्यांचे केंद्रीकरण आयर व अहॅग्गर या मध्यवर्ती उंचवट्याच्या प्रदेशांत झालेले आहे. मध्य सहारापासून पश्चिम सहारापर्यंत ते भटकत असतात. अल्जीरियातील एम्झाब प्रदेशात बर्बर लोकांचे आधिक्य असून ते खडकाळ टेकड्यांच्या किंवा ‘मेसा’ प्रदेशात वसलेल्या नगरांत राहतात. उत्तर सहारात सर्वाधिक संख्या कॉकेसॉइड लोकांची असून अरब व बर्बर त्यांचे प्रतिनिधी आहेत. तिबेस्तीमध्ये आढळणारे टिबू व टेबू हे भटके पशुपालक आहेत. ते मिश्रवंशीय असून निग्रोंसारखे दिसतात. काहींच्या मते ते सहारातील मूळ रहिवाशांचे वंशज आहेत. दक्षिण सहारात हेमेटिक व निग्रो यांच्या मिश्र वंशाचे लोक राहतात. सूफ द्रोणी प्रदेशात अरब लोक राहात असून तेथे त्यांनी खजुराच्या वृक्षांची लागवड केली आहे. दक्षिण लिबियातील फेझान या रेतीयुक्त प्रदेशात स्वतंत्र वंश परंपरेतील फेझानी लोक राहतात. ईशान्य लिबियातील सायरेनेइका या खडकाळ पठारी प्रदेशाच्या किनारी भागात, तसेच अंतर्गत कुरणांच्या प्रदेशात सानूसी लोक राहतात. काही निग्रो वंशाचे लोक असून त्यांचे दक्षिण भागात आधिक्य आहे. ग्रेट वेस्टर्न अर्ग व अल्जीरियातील दगडगोट्यांचे तानेझ्रूफ्त मैदान यांसारख्या विस्तीर्ण वाळवंटी पदेशात कायमस्वरूपी वस्ती नाही.

सहारातील बहुतेक लोक भटके जीवन जगतात. शेळ्या, मेंढ्या व गुरांचे कळप पाळतात. पाणी व चाऱ्याच्या शोधार्थ ते वाळवंटी प्रदेशातून भटकत राहतात. हिवाळ्यात जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा भटक्या जमातीचे लोक शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी सहारामध्ये येतात; परंतु उन्हाळ्याचा कोरडा ऋतू सुरू झाला की, त्यातील बहुतांश जमाती ॲटलास पर्वताच्या किंवा उंच पठारी प्रदेशाच्या उत्तरेस जातात. दक्षिण सरहद्द प्रदेशात उन्हाळी पर्जन्याच्या काळात भटके पशुपालक शेळ्या-मेंढ्या व गुरे चारतात. हिवाळ्याच्या कोरड्या काळात ते दक्षिणेकडे स्थलांतर करतात. काही लोक खजूर, बार्ली, गहू व इतर पिकांचे उत्पादन घेतात. काही मरूद्यानांत हजारो खजुराची झाडे असतात; परंतु जेथे पाण्याचा तुटवडा असतो, तेथे एक झाड अनेकांच्या मालकीचे असते. काही प्रदेशातील मरूद्यानांत आढळणाऱ्या विहिरी व झऱ्याच्या पाण्यावर खजूर, बार्ली व भाजीपाल्याची लागवड केली जाते.

समीक्षक : संतोष ग्या. गेडाम