सहारा वाळवंटामध्ये प्रामुख्याने विरळ व विखुरलेली वनश्री आढळते. उच्चभूमी प्रदेश, मरूद्यानाच्या द्रोणी आणि वाडींच्या काठांवर गवत, झुडुपे व वृक्ष अधिक आढळतात. वेगवेगळ्या प्रदेशांत सामान्यपणे गवत, विविध फुलझाडे, खजूर, ताड, ओषधी, ऑलिव्ह, सायप्रस, काटेरी वनस्पती, कण्हेर, थायमी (एक सुगंधी वनस्पती) व टॅमॅरिकेसी कुलातील वनस्पती आढळतात. लवणमय द्रोणींमध्ये विविध प्रकारच्या लवण वनस्पती आढळतात. मरूद्यानाचा भाग वगळता इतरत्र तुलनेने जेथे अधिक पाणी उपलब्ध असते, तेथे तुरळक व विखुरलेली वनश्री दिसते. बहुतांश वनस्पतींची, विशेषत: लहान फुलझाडांच्या प्रकारातील वनस्पतींची मुळे अगदी वरच्यावर राहतात आणि ओलाव्यासाठी कधीतरी पडणाऱ्या पावसावर अवलंबून असतात. काही भागात कोरड्या हवामानात टिकाव धरू शकणारे गवत, झुडुपे व इतर वनस्पती आढळतात. काही वनस्पती अल्पजीवी असतात. वनस्पतींचे जमिनीवर पडलेले बी पाऊस पडेपर्यंत अंकुर न फुटता तसेच पडून राहते. हा कालावधी काही वर्षांचा देखील असू शकतो. पाऊस पडल्यानंतर मात्र त्यांची वेगाने वाढ सुरू होऊन सहा ते आठ आठवड्यांत त्यांचा जीवनकाळ संपून जातो. वर्षापेक्षा अधिक काळ जिवंत राहणाऱ्या वनस्पती वेगवेगळ्या मार्गांनी पाणी मिळवितात. मरूद्यानात किंवा वाडीजवळ आढळणाऱ्या वनस्पतींची मुळे जमिनीत खूप खोलवर जाऊन ओलावा शोषून घेतात. यांमध्ये खजूर, टॅमॅरिकेसी कुलातील व इतर वनस्पती आणि वेगवेगळ्या वाळवंटी झुडुपांचा समावेश होतो. काही वनस्पती आपल्या पानांच्या साहाय्याने हवेतील बाष्प शोषून घेतात. दक्षिण अल्जीरियातील तानेझ्रूफ्त या अती कोरड्या प्रदेशात तसेच लिबियाच्या वाळवंटातील काही भागात कोणत्याही प्रकारची वनश्री आढळत नाही. त्यामुळे तेथे मरूद्याने किंवा पशुपालक जमातीही नाहीत. अंतर्गत सहारात पर्जन्य अतिशय कमी असल्याने केवळ तुरळक ठिकाणीच शेळ्या व उंटांसाठी चारा उपलब्ध होतो. तेथे आढळणाऱ्या जमातीही तुरळक व भटक्या आहेत. एकविसाव्या शतकात सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडे होणाऱ्या विस्तारास, अतिक्रमणास आळा घालण्यासाठी सहाराच्या दक्षिण सीमेवर वनस्पतींचे पट्टे निर्माण करण्याचे कार्य आफ्रिकी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या माध्यमातून केले जात आहे.

सहारातील बहुतांश प्राणिजीवन वाळवंटाच्या उत्तर व दक्षिण सरहद्द प्रदेशात आणि मरूद्यानांत आढळते. कुरंग, ॲडॅक्स हे दुर्मिळ हरिण, सिंह, शहामृग, वीझल, साप, सरडे, जर्बिल, जर्बोआ, साळिंदर, तरस, ससे, कोल्हे इत्यादी प्राणी व वेगवेगळ्या प्रकारचे कीटक सहाराच्या वेगवेगळ्या प्रदेशांत आढळतात. खडकाळ पठारी भागात बर्बरी मेंढ्या आढळतात. बरेचसे प्राणी पाण्याशिवाय दीर्घकाळ राहू शकतात. ते खात असलेल्या वनस्पतींपासून काही प्रमाणात पाणी मिळवितात. अनेक लहान प्राणी दिवसा उष्णतेपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी आपल्या बिळात राहतात व रात्री खाद्याच्या शोधार्थ बाहेर पडतात. खडकाळ भागात किंवा वालुकागिरीत सामान्यपणे सरडे व कोब्रा आढळतात. पक्ष्यांच्या स्थानिक व स्थलांतरित ३०० च्या वर जाती पाहायला मिळतात.

समीक्षक : नामदेव स. गाडे