महाराष्ट्रातील पुणे व ठाणे जिल्ह्यांच्या सरहद्दीलगत असलेला अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला. हा किल्ला अहमदनगरपासून १२५ किमी. अंतरावर व अकोले तालुक्यात असून तो समुद्रसपाटीपासून ४६९१ फूट उंचीवर आहे.

हरिश्चंद्रेश्वर मंदिर, हरिश्चंद्रगड, अहमदनगर.

या किल्ल्यावर येण्यासाठी अनेक मार्ग असून तोलारखिंडीच्या व पाचनईकडून येणाऱ्या वाटेचा पर्यटक जास्त उपयोग करतात. पुण्याहून आळेफाटा आणि पुढे खुबी फाट्यावरून खिरेश्वर मार्गे गडावर जाता येते. पाचनई मार्ग हा सर्वांत सोपा मार्ग असून या वाटेवर किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष दिसतात. खुबी फाटामार्गे किल्ल्यावर जाताना वाटेतील खिरेश्वर गावात यादवकाळातील ‘नागेश्वराचे’ प्राचीन मंदिर दिसून येते.

तोलारखिंडीतून वर चढून गेल्यावर डाव्या हाताला असणाऱ्या टेकडीवर हरिश्चंद्रगडाचा तटबंदीयुक्त बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार उद्ध्वस्त स्थितीत असून माथ्यावर अनेक लहान-मोठ्या घरांच्या जोत्यांचे अवशेष, दोन पाण्याची टाकी व काही गुहा आढळतात. या गुहांचा वापर कोठार म्हणून केला जात असे. याच्या बरोबर खालच्या बाजूस दक्षिणेस किल्ल्याचा मुख्य जुन्नर दरवाजा असून या मार्गे येणारी वाट दरड पडल्यामुळे आणि वापरात नसल्याने दुर्लक्षित झाली आहे. दरवाजा उद्ध्वस्त स्वरूपात आहे. किल्ल्याच्या माथ्यावरून कळसुबाई, रतनगड, आजोबा, घनचक्कर, भैरवगड, कुलंग, अलंग, मदन असा उत्तरेकडील, तर माळशेज घाट, भैरवगड, नानाचा अंगठा, जीवधन यांपर्यंतचा दक्षिण- पश्चिमेकडील मुलूख दृष्टिक्षेपात येतो.

किल्ल्याच्या सर्वोच्च माथा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तारामती शिखराच्या खालील बाजूस खडकात कोरलेल्या आठ-नऊ लेण्या आहेत. यातील एका गुहेच्या द्वारपट्टीवर शिव आणि गणपतीच्या मूर्ती कोरलेल्या असून गुहेत असणाऱ्या शिलालेखावरून या गुहा दहाव्या–अकराव्या शतकात कोरलेल्या असाव्यात, तसेच येथील लेणी हिंदू लेणी असावीत, असे अभ्यासकांचे मत आहे. या लेणी समूहातील एक अर्धवट कोरलेल्या गुहेत सहा फूट उंचीची गणपतीची महाकाय मूर्ती कोरलेली आहे. या लेण्यांच्या थोडे खाली उत्तरेला एक कुंड असून त्याला ‘सप्ततीर्थ’ म्हणून ओळखले जाते. कुंडांत चौदा देवळ्या असून त्यात विष्णुमूर्ती ठेवलेल्या होत्या. यांतील काही विष्णुमूर्ती आज अस्तित्वात नसून उरलेल्या मंदिरामागील गुहेमधे ठेवलेल्या आहेत. कुंडासमोर ‘काशितीर्थ’ नावाने ओळखले जाणारे एक छोटे मंदिर आहे. मंदिरासमोर काही अपूर्ण शिल्प आहेत. कुंडाच्या पश्चिमेला ‘हरिश्चंद्रेश्वराचे’ हेमाडपंती बांधणीतील वैशिष्ट्यपूर्ण शिवमंदिर असून पंचावन्न ते साठ फूट उंचीच्या मंदिराच्या पायऱ्यायुक्त कळसापर्यंत आकर्षक व शैलीदार कोरीव काम केलेले आहे. मंदिराला प्रासाद व त्यामध्ये जाण्यासाठी पूर्व व पश्चिम अशा दोन बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. मंदिराच्या दक्षिणेकडील बाजूस कोरीव गणेशमूर्ती असून, मूर्तीच्या वरील बाजूस देवनागरी लिपीत शिलालेख कोरलेला आहे. बांधीव मंदिराच्या प्रांगणाला बंदिस्त भिंत आहे. मंदिराच्या पश्चिमेस दोन गुहा असून त्यांतील एका गुहेच्या तळघरात योगी चांगदेव तपश्चर्येला बसत असल्याचे सांगितले जाते. गुहेलगत पाण्याची दोन टाकी आहेत. सांप्रत मंदिराच्या प्राकाराची भिंत व मंदिराच्या पश्चिम बाजूची बरीच पडझड झालेली आहे. मंदिराच्या उत्तरेला थोडे खालील बाजूस ‘केदारेश्वराचे लेणे’ म्हणून ओळखली जाणारी भव्य गुंफा असून आतील पाण्यातील चौथऱ्यावर भव्य शिवलिंग आहे. चौथऱ्याच्या चार कोपऱ्यांवर छताला आधार देणारे खांब असून त्यांपैकी तीन खांब तुटलेले आहेत. गडावर इतिहासाची साक्ष देणारे आठ शिलालेख आहेत.

किल्ल्याचा डोंगर फार प्राचीन असून स्कंद, अग्नीमत्स्य पुराणांत त्याचा उल्लेख सापडतो. या किल्ल्याचे बांधकाम कधी केले गेले, हे सांगता येत नाही. इ. स. बाराव्या-तेराव्या शतकात येथे योगी चांगदेव वास्तव्यास असावेत, असे मानले जाते. चांगदेवच्या तत्त्वसार ग्रंथाच्या एका ओवीत शके १२३४ मधे हरिश्चंद्रगडावर हा ग्रंथ पूर्ण केल्याचा उल्लेख आहे. हा किल्ला छ. शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या सुरत लुटीनंतर स्वराज्यात दाखल झाला. सभासद बखरीत छ. शिवाजी महाराजांनी वसवलेल्या किल्ल्यांच्या यादीत या किल्ल्याचा उल्लेख जरी मिळतो. पुढे औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेत हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. १७४७–४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली होती. या किल्ल्याच्या खर्चासाठी २० गावांचे उत्पन्न लावून देण्यात आलेले होते. शाहू रोजनिशीत सुद्धा या किल्ल्याचा उल्लेख सापडतो. पुढे १७७५-७६ मध्ये या किल्ल्याचा हवालदार म्हणून संताजी सावंत याची नेमणूक केलेली तत्कालीन कागदपत्रांतून आढळते. इंग्रजी सैन्यातील अधिकारी कर्नल साईक्सच्या फौजेने मराठेशाहीच्या अखेरच्या युद्धात हा गड काबीज केला (मे १८१८). नंतर अहमदनगरचा जिल्हाधिकारी (कलेक्टर) हेन्री पॉटींजर याच्या हुकमानुसार तत्कालीन शिवनेर तालुक्याचा कमाविसदार रामराव नरसिंह याने बोइट याच्या ताब्यात हा किल्ला दिला (१४ जून १८१८). पुढे १८ डिसेंबर १८१८ मधे हा किल्ला पाडण्यासाठी कॅप्टन इस्टनर या भागात आला. त्याने किल्ल्यावर जाणारे रस्ते, पाण्याची टाकी, तटबंदी उद्ध्वस्त केली. मात्र त्याने हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर व लेण्यांना धक्का लावला नाही. किल्ल्याच्या कोकणकड्यावरून अतिशय दुर्मीळ असे वर्तुळाकार इंद्रधनुष्य ज्याला इंद्रवज्र म्हणतात, ते दिसल्याची नोंद कॅप्टन साईक्स या इंग्रज अधिकाऱ्याने करून ठेवली आहे.

संदर्भ :

  • Abhang, Chandrakant, Unpublished documents of East India Company regarding destruction of forts in Junnar region, Indian History Congress, 2014.
  • गोगटे, चिं. गं. महाराष्ट्र देशातील किल्ले : भाग १ व २ (सुधारित आवृत्ती), शिवसमर्थ सेवा प्रकाशन, नाशिक, २०१९.
  • पारसनीस, द. ब.; वाड, ग. चि. पेशवे रोजनिशी: खंड ३, ५, डेक्कन व्हर्न्याक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी, पुणे, १९०७; १९०८.

                                                                                                                                                                                           समीक्षक : सचिन जोशी