महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला. हा जुन्नर तालुक्यात आहे. जुन्नर शहरापासून सु. १५ किमी. अंतरावरील पेठेची वाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. पर्वतगड म्हणूनही प्रसिद्ध. किल्ल्याची उंची पायथ्यापासून सु. ३०० मी. व समुद्रसपाटीपासून सु. १०२८ मी. आहे. गडाला ताशीव कड्यांचे नैसर्गिक संरक्षण लाभले आहे. गडाचा आकार त्रिकोणी आहे.
गडावर जाण्यासाठी एकूण तीन मार्ग आहेत. पहिला मार्ग हा गडाच्या पूर्वेकडील असणाऱ्या हडसर गावातून जातो. या मार्गावरून गेल्यास सुरुवातीला डोंगर चढून जावे लागते व त्यानंतर गडाच्या कातळकड्याला वळसा घालून पश्चिमेकडे असणाऱ्या घळीतून मार्ग वर जातो. गडावर जाण्याचा दुसरा मार्ग हा गडाच्या पश्चिमेकडे असणाऱ्या पेठेची वाडी येथून थेट बांधलेल्या आणि कोरलेल्या दगडी पायऱ्यांपाशी पोहोचतो. या घळीतून पायऱ्या चढून गेल्यावर गडाचा अखंड कातळात कोरून काढलेला पहिला दरवाजा लागतो. सदर दरवाजा कमानीयुक्त आहे. या दरवाजाजवळ व घळीत आवश्यक तेथे तटबंदीचे बांधकाम करून व गरज भासेल तेथे कातळ तासून तो भाग संरक्षित केलेला आढळून येतो. दरवाजातून आत जाण्याचा मार्गदेखील कातळ कोरून तयार केलेला दिसतो. दरवाजाच्या आतील जागेत सैनिकांसाठी केलेल्या देवड्या कातळात खोदलेल्या आहेत.
कातळातील खोदीव मार्गाने थोडे वर आल्यावर उजव्या बाजूची वाट एका छोट्या टेकडीवर जाते. तर डावीकडील वाट गडाच्या कातळात कोरलेल्या दुसऱ्या प्रवेशद्वाराकडे घेऊन जाते. अखंड कातळात कोरलेली एकापाठोपाठ एक अशी प्रवेशद्वारे व त्यांमधील कातळात खोदलेल्या देवड्या व पायऱ्या हे हडसर किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे.
दुसऱ्या दरवाजातून वर गेल्यावर पाण्याचे एक टाके दिसते. येथून थोडे पुढे एक पाण्याचा तलाव असून त्याच्या काठावर दोन समाध्या आहेत. तलावाच्या पुढे एक महादेवाचे मंदिर असून ते उत्तम अवस्थेत आहे. बाहेर कोरीव नंदीसुद्धा आढळून येतो. मंदिरात गणपती, हनुमान व गरुड यांच्या मूर्ती आहेत. यानंतर गडाच्या पश्चिम भागात कातळात कोरलेल्या तीन उत्तम लेणी दिसून येतात. या लेण्यांमध्ये कातळात एक छोटी गणेशमूर्ती कोरलेली आहे. मध्ययुगीन काळात याचा वापर हा धान्य साठवण्यासाठी किंवा राहण्यासाठी देखील होत असावा. याच परिसरात कातळात खोदलेली पाण्याची काही टाकी आहेत आणि काही वृंदावन सदृश्य बांधकामे आहेत.
गडाच्या ईशान्य टोकावर कातळकडा असून या कातळकड्यावरून गडाचा तिसरा मार्ग येतो. या उभ्या कड्यावर काही खुंट्या रोवल्या असून त्यांना धरून वर यावे लागते. याला खुंटीचा मार्ग असेही म्हणतात. हा मार्ग चढाईस अवघड आहे. या मार्गाने वर आल्यावर एक बुरूज व गुहा आहे. त्यानंतर पुढे घराच्या जोत्यांचे काही अवशेष, तसेच काही कातळात कोरलेली पाण्याची टाकी दिसून येतात. टाक्यांच्या जवळच कातळात खोदलेली एक लेणी व त्यामध्ये असलेले खांब दिसतात. तसेच एक हनुमानाची मूर्ती उघड्यावर ठेवलेली आढळून येते. गडाच्या ताशीव कड्यांमुळे तटबंदी फार कमी ठिकाणी आढळून येते.
निजामशाही संपुष्टात आल्यावर निजामशाहीचे अनेक किल्ले मोगल व आदिलशाह यांनी आपापसांत वाटून घेतले (१६३६). त्यामध्ये हडसर किल्ला मोगलांकडे आला. शिवकाळात हडसर किल्ल्याबद्दलचा उल्लेख पर्णालपर्वतग्रहणाख्यान या संस्कृत काव्यग्रंथात मिळतो. या काव्यग्रंथाचा कर्ता कवी जयराम पिंडे तंजावरच्या व्यंकोजीराजे भोसले यांना छ. शिवाजी महाराजांनी मोगल आणि आदिलशाहीचे कोणकोणते किल्ले कसे जिंकले यांचे वर्णन करताना ग्रंथाच्या पहिल्या अध्यायातील ३७ व्या श्लोकात हडसर उल्लेख करतो.
तथैव चामुण्डगिरी हरिश्चंद्रस्तथैव च।
महिषोष्यड्सरस्तावद गृहीतावतिसंगरात्।।
अर्थ : त्याचप्रमाणे चामुण्डगिरी (चावंड), हरिश्चंद्रगड, महिषगड (?) आणि हडसर हे (किल्ले) सुद्धा (छ. शिवाजी महाराजांनी) निकराने लढून घेतले.
इंग्रजांनी जुन्नर शहर काबीज केले (१८१८), तेव्हा शहरातील सरदार अण्णा रत्तीकर हे हडसर किल्ल्यावर गेले. पण इंग्रजांनी पुढे त्यास पकडले. त्याचे २० घोडे व ४ उंट इंग्रजांच्या हाती लागले व हडसर किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आला.
गडाच्या उत्तरेस सिंदोळा किल्ला, तसेच हरिश्चंद्रगडाचा परिसर सहजतेने दिसतो. कुकडेश्वर धरण, चावंड, निमगिरी यांसारखे किल्ले सहज नजरेस पडतात. गडाच्या ईशान्य दिशेला त्रिकोणी आकाराचे हटकेश्वरचे पठार आहे.
संदर्भ :
- गोगटे, चिं. ग. महाराष्ट्र देशातील किल्ले : भाग १ व २, (पुनर्मुद्रण), शिवसमर्थ सेवा प्रकाशन, पुणे, २०१९.
- जाधव, सुरेश वसंत, जुन्नर शिवनेरी परिसर, पुरातत्त्व वस्तुसंग्रहालये विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९८२.
समीक्षक : जयकुमार पाठक