स्पष्ट वा वेगळे शिखर असलेल्या जमिनीच्या कमी उंची असलेल्या उंचवट्याला टेकडी म्हणतात. डोंगर टेकडीपेक्षा आणि पर्वत डोंगरापेक्षा उंच असतो. टेकडीच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ व उंची पर्वतापेक्षा खूपच कमी असते. टेकडीच्या उंचीबाबत एकवाक्यता आढळत नाही. टेकडीची उंची सभोवतालच्या क्षेत्रापेक्षा (मैदानापेक्षा) सामान्यपणे सुमारे ३०५ मी. पेक्षा कमी असते. सभोवतालच्या प्रदेशापेक्षा ६०० किंवा ६१० मी. पेक्षा कमी उंचीच्या उंचवट्याला टेकडी म्हणावे, असाही एक मतप्रवाह आहे. पर्वताची उंची नेहमीच यापेक्षा जास्त असते; तथापि टेकडी केवळ लहान पर्वत नसून तिची निर्मिती बऱ्याच वेगळ्या प्रकारे झालेली असते. टेकडीची निर्मिती ज्या द्रव्यांपासून झालेली असते, त्यांवरून त्यांच्या प्रकारांचे वर्गीकरण करता येते.
टेकडीचे संरचनात्मक व विघटनात्मक असे दोन प्रकार आहेत. हिमनद्यांनी व वाऱ्याने साचलेली खडकाची डबर किंवा वाळू यांच्यापासून रचल्या वा उभारल्या गेलेल्या संरचनात्मक टेकड्या तयार होतात. हिमनदीच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारे हिमोढगिरी व ड्रमलिन ही भूमिस्वरूपे, तसेच वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारे वालुकागिरी ही संरचनात्मक टेकड्यांची उदाहरणे आहेत. तसेच काही ज्वालामुखी क्रियांमधून ज्वालामुखी टेकड्या निर्माण होतात. भूकवचामधील विभंगांद्वारे वर उचलल्या गेलेल्या क्षेत्रामध्ये खोलवर झीज वा क्षरण होऊन विघटनात्मक टेकड्यांचा आकार प्राप्त होतो. अशा टेकड्या अधिक सहजपणे झिजून गेलेल्या खडकांच्या थरांवर शिल्लक राहिलेल्या चुनखडकाच्या बनलेल्या असू शकतात.
टेकडीपेक्षा छोट्या, कमी उंचीच्या व गोलाकार उंचवट्याला टेकाड (नोल किंवा हिलॉक) असे म्हणतात. नोल हा ब्रिटिश शब्द असून तो लहान नैसर्गिक टेकडीसाठी वापरला जातो. टेकाडाचा माथा सामान्यपणे गोलाकार असतो. टेकाडांची निर्मिती विदारण किंवा झीजकार्यामुळे किंवा दोन्हींच्या एकत्रित कार्यामुळे, तसेच भरकार्यामुळेही होते. कृत्रिम रित्या तयार केलेल्या टेकडीसारख्या ढीगांना माउन्ड असे म्हणतात. माउन्ड घुमटाकार किंवा शंकुसदृश असतात. त्यांना वेगवेगळ्या स्थानिक नावांनी ओळखले जाते.
पूर्वीच्या काळी पुरापासून किंवा आक्रमणांपासून संरक्षणासाठी टेकडीवर वस्त्या केल्या जात. उंचावर असल्यामुळे चौफेर लक्ष ठेवता येत असे. उदा., प्राचीन रोमची उभारणी सात टेकड्यांवर केलेली होती. लष्करी दृष्ट्याही टेकड्या महत्त्वाच्या असतात. पूर्वीच्या काळात जगातील अनेक लढाया टेकड्यांच्या परिसरात लढल्या गेल्याची अनेक उदाहरणे आढळतात. गिर्यारोहण, हायकिंग यांसाठीही टेकड्यांना महत्त्व असते.
समीक्षक : वसंत चौधरी