समुद्रकिनारी वाहणारे हे स्थानिक वारे असून समुद्राकडून जमिनीकडे वाहणार्‍या अशा वार्‍यांना खारे वा सागरी वारे, तर जमिनीकडून समुद्राकडे वाहणार्‍या वार्‍यांना मतलई वारे म्हणतात. सर्वसाधारणपणे हे वारे एकानंतर दुसरा म्हणजे आळीपाळीने वाहतात.

दिवसा सूर्यकिरणांमुळे जमीन तापते. सूर्योदयानंतर अनेक तासांनी म्हणजे दुपारनंतर दोन तासांनी जमिनीचे तापमान जास्तीत जास्त होते. त्या वेळी जमिनीलगतची हवा तापून हलकी झालेली असते आणि ती वर जाते. यामुळे जमिनीवर हवेचा दाब कमी झालेला असतो. याउलट किनार्‍यापलीकडील समुद्रपृष्ठ जास्त तापलेले नसते. यामुळे तेथील हवेचा दाब जमिनीवरील हवेच्या दाबापेक्षा बराच जास्त असतो. वारा नेहमी जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाकडे वाहत असतो. यामुळे साधारणपणे दुपारी दोन वाजल्यानंतर वारा समुद्रावरील जास्त दाबाकडून जमिनीवरील कमी दाबाकडे वाहू लागतो. अशा रितीने समुद्रपृष्ठ व जमीन यांच्या तापमानांतील फरकामुळे खारा वारा निर्माण होतो. हा वारा गार असल्याने आल्हाददायक असतो. संध्याकाळनंतर या वार्‍याची गती बरीच कमी होते. समुद्र सापेक्षत: शांत असताना उन्हाळ्याच्या दिवसांत खारा वारा वाहतो. अनेक उष्ण कटिबंधीय समुद्र किनार्‍यांवर जवळजवळ रोज हा वारा वाहताना आढळतो. मध्यम अक्षांश असलेल्या समुद्र किनार्‍यांवर उबदार हवामान असताना हा नियमितपणे वाहतो, तर प्रसंगी आर्क्टिक किनार्‍यावरही हा वाहताना आढळतो. मोठी सरोवरे, रुंद नद्या व नदीमुखखाड्या यांच्या किनार्‍यांवरही या प्रकारचे वारे वाहतात. त्यांना सरोवरी वा नदी वारा म्हणतात.

जमिनीवरून उष्णतेचे उत्सर्जन होऊन गेल्याने पहाटे जमीन थंड झालेली असते व तिच्यावरील हवेचा दाब वाढलेला असतो. त्यामानाने समुद्रपृष्ठावरील हवेचा दाब कमी असतो. यामुळे जमिनीवरील जास्त दाबाकडून समुद्रावरील कमी दाबाकडे वारा वाहू लागतो. त्याला मतलई वारा म्हणतात. एवढ्या लहान क्षेत्रावरील वार्‍यांवर कोरिऑलिस परिणामाचा प्रभाव पडत नाही. मतलई वार्‍यांमुळे १ किमी. उंचीपर्यंतच्या हवेच्या अभिसरणावर परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारे खार्‍या वार्‍याच्या विरुद्ध दिशेत वाहणारा मतलई वारा अधिक दुर्बल असून तो रात्री वाहतो. या लहान वातावरणीय आविष्काराचे सर्वाधिक अध्ययन झाले आहे; कारण भौगोलिक दृष्टीने मतलई वार्‍याचे स्वरूप स्थिर (ठरलेले) आहे, तसेच तो वरचेवर निर्माण होत असतो. शिवाय वातावरणीय अभिसरणातील मतलई वारा ही साधी प्रणाली आहे. मतलई वार्‍याची दिशा अगदी भिन्न म्हणजे समुद्रकिनार्‍याला लंब ते समांतर दिशेत असू शकते. जमीन व सागरी पृष्ठ यांच्या तापमानांतील फरक, स्थानाचे अक्षांश व वर्षातील हंगाम यांच्यावर मतलई वार्‍यांची निर्मिती व जोर अवलंबून असतात.

खार्‍या व मतलई वार्‍यांचे अनेक वातावरणीय परिणाम होतात. त्यांच्यामुळे किनारी क्षेत्रविभागातील वार्‍यांची दिशा व गती यांत बदल होऊ शकतात. कमी उंचीवरील स्तराकार व कपासी प्रकारच्या ढगांवर यांचा परिणाम होतो. विशेषत: उष्ण कटिबंधात खार्‍या वार्‍याने गडगडाटी वादळनिर्मितीला चालना मिळते. सागरी वार्‍याच्या गडगडाटी वादळांमुळे फ्लॉरिडातील सुमारे ४० टक्के पर्जन्यवृष्टीला मदत होते व इतर अनेक किनारी प्रदेशांत त्यांची याहून अधिक मदत होते. शहरांमधील प्रकाशरासायनिक ओझोन प्रदूषणात वाढ करणार्‍या खार्‍या वार्‍याचे अभिसरण हा प्रमुख घटक आहे. लॉस अँजेल्स, शिकागो, ह्यूस्टन, ऑस्लो, अथेन्स, टोकिओ यांसारख्या निराळ्या शहरांत हे लक्षात आले आहे.

समीक्षक : वसंत चौधरी