भारताच्या गुजरात राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण व प्रमुख शहर. लोकसंख्या १,३०,५०३ (२०११). वडोदऱ्यापासून साधारण ईशान्येस १५९ किमी. वर, तर अहमदाबादपासून पूर्वेस २१४ किमी. दुधीमती नदीच्या काठावर हे शहर वसले आहे. एका आख्यायिकेनुसार दुधीमती नदीच्या काठावर दधीची मुनींचा आश्रम होता. त्यांच्या नावावरूनच या शहराचे नाव दाहोद असे पडले आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांच्या सरहद्दी या शहरापासून जवळ असल्यामुळे दोहाद (दोन सरहद्दी) या नावानेही हे ओळखले जाते. येथे मोगल बादशहा औरंगजेब याचा जन्म झाला आहे (इ. स. १६१८). थोर स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे इ. स. १८५७ मध्ये येथे आले होते, असे म्हटले जाते. इ. स. १८५७ मध्ये हे शहर इंग्रजांच्या अखत्यारित आले. पूर्वी हे पंचमहाल जिल्ह्यात होते; परंतु २ ऑक्टोबर १९९७ पासून दाहोद जिल्ह्याची नव्याने निर्मिती होऊन दाहोद हे त्याचे मुख्यालय बनले.

आसमंतातील शेतमालाची ही बाजारपेठ असून व्यापारी दृष्ट्याही शहराला महत्त्व आहे. हस्तकला वस्तूंसाठी हे शहर विशेष प्रसिद्ध आहे. संपूर्ण गुजरातभर येथील कचोरी पदार्थ प्रसिद्ध आहे. मुंबई-दिल्ली लोहमार्गावरील हे महत्त्वाचे प्रस्थानक आहे. ब्रिटिशांच्या काळात बांधण्यात आलेली येथील रेल्वे कॉलनी (परेल भाग) अजूनही त्याच वास्तूशिल्पात उभी आहे. पश्चिम रेल्वेवरील रेल्वे इंजिन दुरुस्तीची प्रमुख कार्यशाळा येथे असून मूलत: ही कार्यशाळा मुंबईतील लोअर परेल येथे होती. शहरात शासकीय तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यक महाविद्यालय, केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय, आदिवासी विद्यालय इत्यादी शैक्षणिक संस्था आहेत. येथील छाब तलाव, दाउदी बोहरा समाजाची नज्मी मशीद (२००२), लटकेश्वरी माँ मंदिर, केदारनाथ मंदिर, परिसरातील रतनमहाल अस्वल अभयारण्य, रतनमहाल धबधबा इत्यादी पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत.

समीक्षक : वसंत चौधरी