सिमला. भारतातील हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी, राज्यातील सर्वांत मोठे शहर व एक प्रसिद्ध थंड हवेचे गिरिस्थान. लोकसंख्या १,६९,५७८ (२०११). लेसर हिमालयाच्या वायव्य

नगर पालिका, शिमला

भागातील एका वनाच्छादित कटकावर, सस.पासून २,२०० मी. उंचीवर शिमला वसले असून त्याचा विस्तार तेथील डोंगराच्या सात सोंडींवर झालेला आहे. हे शहर दिल्लीच्या साधारण उत्तरेस सुमारे ३५० किमी., चंडीगढपासून ईशान्येस सुमारे ११६ किमी., तर प्रसिद्ध पर्यटनस्थळ मनालीपासून दक्षिणेस २४७ किमी. अंतरावर आहे. शिमल्याचे अक्षांश ३१° ६’ १२” उ., तर रेखांश ७७° १०’ २०” पू. असे आहे. शिमल्याचे हवामान समशीतोष्ण कटिबंधीय प्रकारचे आहे. येथे हिवाळ्यातील जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत किमान सरासरी तापमान ६° से., तर उन्हाळ्यातील जूनचे कमाल सरासरी तापमान २०° से. असते. सरासरी पर्जन्यमान १८३ सेंमी. असून पाऊस प्रामुख्याने उन्हाळ्यात पडतो. हिवाळ्यात हिमवृष्टी होत असते.

शिमल्यापासून २ किमी. अंतरावर असलेली जाखू टेकडी हे शिमल्यातील सर्वोच्च (२,४५४ मी.) शिखर आहे. या टेकडीच्या माथ्यावर जुने हनुमान मंदिर आहे. या टेकडीवरून शिमला शहराचे विहंगम दृश्य तसेच सभोवतालच्या हिमालयातील हिमाच्छादित टेकड्यांचे मनोहारी दृश्य दिसते. काली या हिंदू देवतेचा अवतार असलेल्या श्यामला देवीचे मंदिर शिमल्यात आहे. त्यावरूनच या ठिकाणाला शिमला हे नाव पडले असावे. अलीकडे शहराचे नाव शिमलाऐवजी श्यामला करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता; परंतु स्थानिकांनी आणि राज्यातील जनतेने त्याला तीव्र विरोध केल्यामुळे नाव बदलाचा निर्णय रद्द करण्यात आला. शिमल्यास ब्रिटिश लोक ‘क्विन ऑफ हिल्स’ असे संबोधत. गुरखा सैन्याने १८१४ मध्ये येथील प्रदेशावर आक्रमण करून बराच प्रदेश काबीज केला होता; परंतु सगौली करारानुसार गुरखा सैन्याने शिमल्यासह जिंकलेला सर्व प्रदेश ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्वाधीन केला. त्या वेळी शिमला हे ठिकाण श्यामला मंदिरासाठी प्रसिद्ध होते. ब्रिटिशांच्या ताब्यात आल्यानंतर त्यांनी येथील समशीतोष्ण कटिबंधीय हवामान व विलोभनीय सृष्टिसौंदर्याचा विचार करून शिमल्याच्या विकासास सुरुवात केली. शिमल्याचे उपनगर असलेल्या अनाडोल येथे १८२२ मध्ये मृमून हे पहिले ब्रिटिश निवासस्थान (बंगला) बांधण्यात आले. आज ही हिमाचल प्रदेश राज्याची विधानसभा इमारत म्हणून ओळखली जाते. बंगालचे गव्हर्नर जनरल लॉर्ड ॲमहर्स्ट (कार. १८२३ — १८२८) यांनी १८२७ मध्ये येथे एक उन्हाळी शिबिर घेतले होते. त्या

जाखू टेकडीवरील हनुमानाची मुर्ती

वेळी येथे हा एकमेव बंगला होता. इ. स. १८२७ नंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांची वर्दळ येथे वाढू लागली. काही अधिकारी तर आपली सुट्टी येथेच घालवू लागले. त्याअनुषंगाने येथे विविध प्रकारच्या सेवा-सुविधा निर्माण होऊ लागल्या. त्यानंतरच्या दहा वर्षांतच येथे जवळजवळ शंभर, तर इ. स. १८८१ पर्यंत येथे १,१४१ पक्की घरे (बंगले) बांधण्यात आली होती. सुरुवातीला ब्रिटिशांनी यांचा उपयोग सैन्याच्या विश्रांतीसाठी केला होता. थंड हवामान आणि मनोहारी सृष्टिसौंदर्यामुळे अल्पावधीतच हे देशातील एक ख्यातनाम गिरिस्थान व पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्धीस आले. इ. स. १८६५ — १९३९ या कालावधीत हे भारताच्या ग्रीष्मकालीन राजधानीचे ठिकाण होते. ब्रिटिश राजवट असताना इ. स. १९४२ — १९४५ या कालावधीत ही ब्रिटिश बर्माची (म्यानमार) राजधानी होती. पंजाबची राजधानी म्हणून चंडीगढची उभारणी पूर्ण होण्यापूर्वी (इ. स. १९४७ — १९५३) शिमला ही पंजाब राज्याची राजधानी होती. इ. स. १८५१ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली. भारतीय वातावरणविज्ञान खात्याची स्थापना इ. स. १८७५ मध्ये शिमला येथे करण्यात आली होती. राजकीय दृष्ट्या शिमला महत्त्वाचे असून येथे अनेक राजनैतिक करार व परिषदा झालेल्या आहेत व आजही होत असतात. तिबेटचा दर्जा व त्याच्या सरहद्दींबाबत विचारविनिमय करण्यासाठी इ. स. १९१४ मध्ये चीन, तिबेट व ग्रेट ब्रिटन यांच्या प्रतिनिधींची संयुक्त परिषद येथे झाली होती. इ. स. १९४५ मध्ये व्हाइसरॉय लॉर्ड वाव्हेल आणि हिंदुस्थानचे प्रमुख नेते यांदरम्यानची शिमला परिषद येथे झाली होती. १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी १९७२ मध्ये या दोन देशांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक येथे होऊन ’शिमला‘ करार करण्यात आला.

राज्यातील हे प्रमुख व्यापारी, सांकृतिक व शैक्षणिक केंद्र आहे. शहरात हलक्या वस्तूंची निर्मिती, मद्यार्क निर्मिती, हस्तव्यवसाय, हातमागावर कापड विणणे हे उद्योग चालतात. पाइन, देवदार, ओक, ऱ्होडोडेंड्रॉन इत्यादी वृक्षांच्या दाट अरण्यांनी वेढलेला परिसर, सभोवतालची हिमाच्छादित शिखरे, स्केटिंग क्लब, बाजारपेठ, रिज भाग, अनाडोल परिसर, राज्य वस्तुसंग्रहालय, समर हिल, काली बाडी मंदिर, गुरुद्वारा, वनस्पती उद्यान, हिमालयीन पक्षी उद्यान, वसाहतकालीन देखणी वास्तुशिल्पे, ख्रिस्ती चर्च, जाखू हे पहाडी शिखर ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. पर्यटकांसाठी सुखसोयींनी युक्त उपाहारगृहे, निवासस्थाने व क्लब आहेत. येथे ब्रिटिश धाटनीच्या तसेच नवगॉथिक वास्तुशिल्पातील अनेक इमारती आढळतात. येथील राष्ट्रपती भवन (पूर्वीचे ब्रिटिश व्हाइसरॉयचे निवासस्थान) प्रसिद्ध आहे. १९६४ पासून या वास्तूत प्रगत अध्ययनासाठी ‘द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडी’ या संस्थेचे संशोधनात्मक कामकाज चालते. शहरात आरोग्यभुवने, रुग्णालये, हिमाचल प्रदेश विद्यापीठ (स्था. १९७०), महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालय, कॉन्व्हेंट स्कूल्स, इंग्रजी माध्यमाची अनेक विद्यालये, केंद्रीय बटाटा संशोधन संस्था इत्यादी आहेत. अनाडेल येथे आर्मी हेरिटेज म्यूझीयम आहे. अनाडेलचा परिसर लष्करी क्षेत्र म्हणून ओळखला जातो. एक स्वास्थ्य केंद्र म्हणूनही या शहरास विशेष महत्त्व आहे. येथील बाजारपेठ शाली, गालिचे, रजया इत्यादी वस्तुंसाठी प्रसिद्ध आहे.

हिमालयाच्या उतारांवर पायऱ्यापायऱ्यांचे टप्पे तयार करून त्यांवर शहर वसविले आहे. शिमला येथील पर्वतीय प्रदेशाच्या पायथ्यालगत कालका हे ठिकाण आहे. इ. स. १९०३ मध्ये कालका ते शिमला यांदरम्यान ९६ किमी. लांबीचा लोहमार्ग सुरू झाला. त्यामुळे शिमल्याची सुगमता व लोकप्रियता खूपच वाढली. या लोहमार्गावर ८०६ पूल आणि १०३ बोगदे आहेत. या लोहमार्गाने प्रवास करणे, हेही पर्यटकांचे आकर्षण असते. २००८ मध्ये हा डोंगरी लोहमार्ग जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आला आहे. लोहमार्गाला समांतर असा रस्ताही आहे. दिल्लीवरून कालकापर्यंत रस्ते व लोहमार्गाने जाता येते. शिमला शहरापासून २३ किमी. वर विमानतळ आहे. दक्षिण आशियातील सर्वांत मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी वार्षिक पर्वतीय सायकल स्पर्धा येथे होते. मुसळधार पावसात येथे भूमिपाताच्या घटना वारंवार घडतात. येथून २१ किमी. वरून सतलज नदीचा प्रवाहमार्ग जातो. वाढत्या प्रदूषणामुळे येथील पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. राज्याच्या प्लॅस्टिक बंदी कायद्याची येथे कडक अंमलबजावणी केली जाते. हॉटेल व पर्यटन व्यवसाय हा येथील अर्थकारणाचा प्रमुख आधार आहे.

समीक्षक : माधव चौंडे

https://www.youtube.com/watch?v=0ehX58xGxTc


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.