पूर्वी अस्तित्वात असलेला विषुववृत्तीय महासागर (किंवा भूमध्य समुद्र). लॉरेशिया हा उत्तरेकडील महाखंड व गोंडवनभूमी हा दक्षिणेकडील महाखंड मध्यजीव महाकल्पात (सुमारे २४.५ ते ६.६४ कोटी वर्षांपूर्वीच्या मोठ्या कालखंडात) टेथिसमुळे अलग झालेले होते. उत्तर अमेरिका व आल्पाइन-हिमालयीन पर्वतरांगांच्या उत्तरेचा यूरेशिया यांचा मिळून लॉरेशिया महाखंड बनला होता; तर दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारतीय द्वीपकल्प, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका व आल्पाइन-हिमालयीन पर्वतरांगांच्या दक्षिणेकडील यूरेशियाचे प्रदेश यांचा मिळून गोंडवनभूमी हा महाखंड बनला होता. खंडांचे एका केंद्राकडे वळणे (केंद्राभिसरण) आणि खंडांमधील आघात (टकरी) यांच्यामुळे शेवटी टेथिस नाहीसा झाला. तसेच आल्पाइन-हिमालयीन पर्वतीय पट्टा तयार झाला. टेथिस हे नाव ऑस्ट्रियन भूवैज्ञानिक एडूआर्ट झ्यूस (स्वेस) यांनी दिले (इ. स. १८९३). प्राचीन ग्रीक महासागर देवता औसिॲनसची बहीण व सखी हिच्यावरून हे नाव दिले आहे.

सध्याच्या आल्पाइन-हिमालयीन पर्वतप्रणालीच्या ठिकाणी पूर्वीचा मध्यजीवकालीन सागरी प्रदेश अस्तित्वात होता, हे एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी जर्मन भूवैज्ञानिक मेल्चिओर न्यूमायर यांनी ओळखले होते. त्यासाठी त्यांनी सागरी (व काही ठिकाणी पूर्णतया महासागरी) गाळाच्या खडकांच्या खूप जाड थरांची झालेली वाटणी व त्या खडकांमधील जीवाश्मरूप प्राण्यांमधील प्राणिजातीविषयीचा सामाईक प्रभाव यांचा आधार घेतला होता. आल्प्स, कार्पेथियन व तुर्कस्तान व इराणमधून थेट हिमालय व म्यानमारपर्यंतच्या खडकांतील हे जीवाश्म आहेत. झ्यूस यांनी इ. स. १८९३ मध्ये हा सागरी प्रदेश पूर्वी महासागर असल्याचा अर्थ लावला. विसाव्या शतकाच्या शेवटी भूपट्ट सांरचनिकी हा सिद्धांत पुढे आला व त्याद्वारे याची खातरजमा होऊन पुढील गोष्ट मान्य झाली. पर्मियन-ट्रायासिक कालखंडात लॉरेशिया व गोंडवनभूमी यांच्यातील आघातामधून पॅन्जिया निर्माण झाल्यापासून टेथिस अस्तित्वात असणे शक्य आहे.

लॉरेशिया व गोंडवनभूमी या दोन महाखंडांमधील क्षेत्र किमान दोन टेथियन महासागरांनी मध्यजीव महाकल्पात लागोपाठ व्यापले असण्याची शक्यता आहे, असे विसाव्या शतकातील अध्ययनावरून उघड झाले. पॅलिओ टेथिस (म्हणजे आधीचा वा जुना टेथिस) पुराजीव महाकल्पाच्या अखेरीस (सुमारे ३२ कोटी वर्षांपूर्वी) पॅन्जियाबरोबर अस्तित्वात आला. पर्मियन व ट्रायासिक कालखंडात (२८.६ ते २०.८ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) पॅलिओ टेथिस पॅन्जिया महाखंडाची पूर्वेकडील प्रचंड मोठी खाच वा प्रवेशद्वार बनले. हा महासागर उत्तरेच्या गोंडवनभूमीपासून अलग झाल्याने आणि सिम्मेरियन खंड या नावाने ओळखण्यात येणार्‍या खंडीय पट्ट्याचे उत्तरेकडे वळण्याची क्रिया यांच्यामुळे विलुप्त झाला. जुरासिक कल्पाच्या सुमारे (२०.८ ते १८.७ कोटी वर्षांपूर्वीच्या कालखंडाच्या) आधीच्या काळात सिम्मेरियन खंडाची शेवटी लॉरेशिया खंडाच्या दक्षिणेकडील काठाबरोबर टक्कर झाली. पॅलिओ टेथिस समुद्राच्या खाणाखुणा व अवशेष पुढील प्रदेशांत आढळतात. उत्तर तुर्कस्तानातील पर्वतरांगा, तसेच ट्रान्स कॉकेशिया (म्हणजे कॉकेशस व पामीर), उत्तर इराण व अफगाणिस्तान व तेथून उत्तर तिबेट (कुनलून पर्वत) आणि तेथून चीन आणि इंडोचायना प्रदेशापार्यंत या खाणाखुणा आढळतात.

क्रिटेशस (सुमारे १४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या) कालखंडानंतर समुद्राचे पाणी खंडांच्या जमिनीवर पसरत जाऊन खंडांची विस्तीर्ण क्षेत्रे समुद्राने झाकली गेली. या घटनेला सिनोमॅनियन सागरी अतिक्रमण म्हणतात. आफ्रिकेच्या उत्तर किनार्‍यालगतचे आल्प्स व हिमालय पर्वतरांगा असलेले प्रदेश टेथिस समुद्राच्या पाण्याखाली होते. उत्तर हिमालय व तिबेट या समुद्राने व्यापला होता. भारताचे द्वीपकल्प टेथिसच्या दक्षिणेस व आशियाच्या मुख्य भूमीपासून वेगळे होते. अशा प्रकारे टेथिसचा विस्तार झाल्याने त्याचे व त्याच्या फाट्यांचे पाणी शेजारच्या जमिनीवर पसरले होते. त्याचा एक फाटा सहारावर पसरून दक्षिणेकडे गेला होता. तो तसाच पुढे जाऊन अटलांटिक सागराला मिळाला आणि आफ्रिका खंडाचा वायव्य भाग मुख्य खंडापासून अलग झाला असावा.

भारताच्या उत्तरेकडील टेथिस समुद्रांत तयार झालेले खडक उत्तर हिमालय व स्पिती, कुमाऊँ येथे आढळतात. स्पितीचे खोरे एक विस्तृत भूद्रोणी असून तिच्यात हिमालय पूर्व जुन्या (पॅलिओ) समुद्रातील स्तरयुक्त स्तर साचलेले आढळतात. टेथिसचा एक उपसागर द्वीपकल्पाच्या वायव्य भागावर पसरला होता. त्यात साचलेले खडक मिठाच्या डोंगराच्या (सॉल्ट रेंजच्या) प्रदेशात व सिंधच्या पश्चिम भागात आढळतात. उपसागराचा एक फाटा नर्मदेच्या खोर्‍यात व आजच्या समुद्रकिनार्‍यापासून सुमारे ३८० किमी. पर्यंत आत गेला होता.

निओ टेथिस (अधिक तरुण टेथिस समुद्र म्हणजे टेथिस) मध्यजीव महाकल्पाच्या सुरुवातीच्या काळात निर्माण व्हायला सुरुवात झाली. ही सुरुवात सिम्मेरियन खंडाच्या परिभ्रमणानंतर झाली. पॅन्जियाचे खंडविप्लवाद्वारे लॉरेशिया व गोंडवनभूमी या महाखंडांमध्ये विभाजन होणे आणि अटलांटिक व हिंदी महासागरांची एककालिक वाढ होणे यांमुळे टेथिस समुद्र निर्माण झाला. क्रिटेशस काळात आफ्रिकन आणि यूरेशियन भूपट्ट एकमेकांकडे सरकू लागल्याने हा टेथिस समुद्र मागे सरकण्यास सुरुवात झाली आणि अखेरीस तो नवजीव महाकल्पात (६.६४ कोटी वर्षांपूर्वीपासून ते आतापर्यंतच्या काळात) संपुष्टात आला. तेव्हा भारत, अरबस्तान व ॲपुलिया (म्हणजे इटलीचे भाग, बाल्कन राष्ट्रे, ग्रीस व तुर्कस्तान यांचा बनलेला भूप्रदेश) उर्वरित यूरेशियावर आदळून आल्पाइन-हिमालयीन पर्वतरांगा वर उचलेल्या गेल्या. या पर्वतरांगा स्पेन (पिरेनीज), वायव्य आफ्रिका (ॲटलास), भूमध्य समुद्राची उत्तर सीमा (आल्प्स, कार्पेथियन) येथून दक्षिण आशिया (हिमालय) ते इंडोनेशियापर्यंत पसरल्या आहेत. भूमध्य समुद्राचा पूर्वेकडील भाग हा टेथिस समुद्राचा अवशिष्ट भाग आहे.

टेथिस समुद्राचा अंत झाल्याचे गंभीर परिणाम होऊन पृथ्वीच्या भूरूपात अतिशय गंभीर असे फेरबदल झाले. आधीच्या अशा परिणामांपेक्षा हे परिणाम इतके वेगळे होते की, पॅलिओ टेथिस समुद्राचे अस्तित्व १९८० – १९९० या दशकापर्यंत भूवैज्ञानिकांच्या लक्षातच आले नाही. उत्तर आफ्रिका व मध्यपूर्व प्रदेश येथील हायड्रोकार्बनयुक्त (खनिज तेल व नैसर्गिक वायू असलेल्या) महाप्रचंड द्रोणी हा टेथिस समुद्राच्या उत्क्रांतीचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम आहे.

समीक्षक : वसंत चौधरी